चांगल्या सवयींची बेरीज ही चारित्र्य घडवते | Yashacha Password (Part 59) - सवयी (Habits)

यशाचा पासवर्ड (भाग :59) -सवयी (Habits)

 अयोग्य सवयी सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो चांगल्या सवयी लावून घेणं..!

विचार कृती घडवतात आणि त्या कृतीचा सराव सवय घडवत जातो. एखादी गोष्ट वारंवार केली की ती सवयीत रूपांतरित होते. ही सवय माणसाला घडवतही जाते आणि बिघडवतही जाते.

Change habits | Yashacha Password (Part 58) - सवयी (Habits)


आवडत नाही म्हणून माणसं अनेक गोष्टी करण्याचं टाळतात. काम करण्याचा कंटाळा येतो म्हणून माणसं निवांत राहाणं पसंत करतात. त्याचाच सराव होतो आणि निवांत राहाणं, हीच माणसाची सवय बनून जाते. याउलट काही माणसं जे काम आवडत नाही, ते जाणीवपूर्वक करतात. करत राहातात. परिणामी, ते काम त्यांच्या अंगवळणी पडतं. लवकर उठणं कुणालाच आवडत नाही. पण काही माणसं पहाटे उठतात. कामाला लागतात. त्याचीच सवय लावून घेतात. तीच यशस्वी होतात. तुम्ही खरं बोलत राहिलात, तर तेच अंगवळणी पडेल. खोटं बोलणं सहजपणे घडणार नाही. सबब ती सवय होणार नाही.

जोपर्यंत एखाद्या सवयीचा आनंद त्यातून घडणाऱ्या नुकसानापेक्षा मोठा असतो, तोपर्यंत माणूस सवयीचा गुलामच असतो. सिगारेट ओढणं आरोग्याला अपायकारक आहे, हे माहिती असूनही त्यातल्या क्षणिक आनंदापोटी माणसं त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्यामुळे एखादी गंभीर शारीरिक समस्या निर्माण झाली नि डॉक्टरांनी सांगितलं, सिगारेट ओढत राहिलात तर मात्र तुम्ही जिवंत राहाणार नाही. मग तो माणूस झटकन् ती सवय सोडतो. एखादा असा अंतर्बाह्य उन्मळून टाकणारा फटका बसल्याशिवाय माणसं शहाणी होत नाहीत. चुकीची सवय सोडत नाहीत. मात्र तोपर्यंत झालेल नुकसान भरून निघत नाही. लांब गेलेलं यश जवळ आणणं मग शक्य होत नाही. लागलेली सवय सोडण्यासाठी धडपड करण्यापेक्षा ती सवय लागूच नये, म्हणून घेतलेली खबरदारी नेहमीच योग्य !

तुम्ही धाडस करत राहा. म्हणजे धाडसाची सवय लागेल. मग अशा धाडसी माणसांच्या सावलीतही संकटं उभी राहात नाहीत, याचा अनुभव  तुम्हाला येईल. सातत्याने उद्ध्वस्त परिस्थितीतही आनंदी राहाण्याची स्वतः ला सवय लावा, म्हणजे निराशा जवळपास फिरकणार नाही. कितीही संकटं कोसळली तरीही खंबीर राहा म्हणजे मोडून पडण्याची वेळ येणार नाही. अडथळे शोधण्याची नव्हे; तर त्यातून संधी शोधण्याची सवय लावून घ्या, म्हणजे अडथळ्यांशी झगडत बसण्याची वेळ येणार नाही. साध्या साध्या, लहान-सहान गोष्टीतही प्रामाणिकपणा सोडू नका म्हणजे अप्रमाणिकपणाचा स्पर्शही होणार नाही. जे सत्य आहे, जे सुंदर आहे, अशा विचारांचीच सवय लावून घ्या म्हणजे अविचार घडणारच नाही.

तुम्हाला तुम्ही कसे हवे आहात, त्याचाच सराव करा. ती तुमची सवय होऊन जाईल. मग कृती आपोआप घडेल. सवय लागलेल्या माणसांना ती कृती करण्यापूर्वी विचार करावा लागत नाही. ती सहज होऊन जाते. सबब कार्य वेगाने होतं. वेळ वाया जात नाही. इतरांपेक्षा यशाच्या दिशेने तुम्ही पुढे असता. लवकर पोहोचता! तुमच्या सवयी याच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवणाऱ्या सर्वात मोठ्या शक्ती असतात.

माणसांच्या सवयी चांगल्या नसतील, तर तो चारित्र्यहीन ठरतो. चांगल्या सवयींची बेरीज ही चारित्र्य घडवते. सवयी जाणीवपूर्वक लावता येतात, घडवता येतात. चुकीच्या सवयी बदलताही येतात.

एका मुलाला नखं खायची सवय होती. तो सारखा दातांनी नखं कुरतडत राहायचा. ही सवय मोडण्यासाठी त्याच्या आईने युक्ती केली. काही दिवस त्याचा लेंगा कमरेत ढिला केला. सबब नखं कुरतडण्याची त्याची सवय गेली. त्याचे हात आता कमरेतून घसरणारा लेंगा सावरण्यासाठी कार्यरत राहिले.

अयोग्य सवयी सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो. चांगल्या सवयी लावून घेणं. त्याच यशाकडे नेतात ! 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने