स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांच्या भल्यासाठी हरणं, हेच जेतेपण असतं! | Yashacha Password (Part 57) - देणं

यशाचा पासवर्ड (भाग :57) - देणं

 घेणाऱ्यांना कधीच पुरत नाही. पण देणाऱ्याचं मात्र कधीच सरत नाही..!


एक खेडेगाव. जिथे पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य! पिण्याच्या पाण्यासाठी पाच कोस लांब एका झऱ्यावर जावं लागे. एक माऊली डोक्यावर हंडा आणि हातात एक कॅन घेऊन निघाली. भर उन्हात पायाला बसणारे चटके सोसत पाच कोसांची वणवण पायपीट करून ती झऱ्यावर पोहोचली. हंडा व कॅन भरून घेतले. परतीला निघाली. वाटेत एक गृहस्थ भेटला. घोटभर पाणी दे म्हणाला. तिने जराही विचार न करता त्याला पाणी दिलं. पुढे निघाली. पुढे आणखी एकजण भेटला. त्यालाही तिने पाणी दिलं. पुढे चालत राहिली. वाटेत माणसं भेटत राहिली. तिच्याकडे पाणी मागत राहिली. तीही पाणी वाटत राहिली. ती घराजवळ आली, तेव्हा तिच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता. हातातला कॅन मात्र भरलेला होता. तिच्या मुलाने दारातून हे बघितलं. त्याला कळलं. कॅन भरलेला आहे म्हणजे आई झऱ्यावरून जाऊन आली. पण हंडा रिकामा आहे, याचा अर्थ ती येता-येता पाणी वाटत आली. तो भडकला. आईला म्हणाला, 'एवढी पाच कोस वणवण करून पाणी आणलंस ते काय दुसऱ्यांना वाटायला? नसतं वाटलंस तर हे पाणी आपल्याला दिवसभर पुरलं असतं ना. कशाला वाटलंस ?'

तशी ती शांतपणे मुलाला म्हणाली, 'बाळा तुला जगण्याचा मोलाचा नियम सांगते- दुसऱ्याला देत राहिलं ना की, आपल्या डोक्यावरचं ओझं कमी होतं ! वघ, मी पाण्याने भरलेला हंडा डोक्यावर घेतला, तेव्हा त्याचं कितीतरी ओझं होतं. येता-येता मी पाणी वाटत आले. आता बघ माझ्या डोक्यावरचं ओझं किती कमी झालंय. बाळा, जगणं घेण्याने नव्हे तर देण्यानेच समृद्ध होतं. इतरांची तहान भागवल्यावर मिळणारा आनंदच आपली तहान भागवत असतो!'

मदतीचा हात | Nitin Banugade Patil


प्रत्यक्षात काय घडतं? माणसं वाटत नाहीत; तर साठवत राहातात आणि प्रचंड साठवूनही पुन्हा तहानलेलीच असतात. त्यांना समजत नाही की किती साठवल्यावर समाधान लाभेल? ते आणखी मिळवण्यासाठी तडफडत राहातात. त्यांना हे उमजत नाही की, साठवल्यावर नव्हे; तर वाटल्यावरच सम धान लाभतं. साठवून फक्त ओझं वाढतं !

स्वतःपुरतं कमावण्याच्या नादात माणसं आपल्या सामाजिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. मिळवणारे अधिकाधिक साठवत राहून श्रीमंत होत राहातात, तर कुणी देणारे वा पाहाणारे नसल्याने गरीब अधिक गरीब होत राहातात. ज्ञान मिळवणारे मिळवतात, ज्ञानाचा साठा करतात. पण लोकांना ज्ञान वाटत नाहीत. सबब अज्ञानी कायमचे अज्ञानीच राहातात. मग समाजव्यवस्था ढासळते. समता कोसळते. वर्गवारी तयार होते. भेद जन्माला येतात. देण्या-घेण्यातूनच युद्धे पेटतात. हिसकावणे, लुटणे, ओरबाडणे अशा वृत्ती फोफावतात.

मोटार रेसमध्ये नेहमी पहिला येणारा यावेळी सर्वात शेवटी आला. त्याला विचारलं, असं का? तो म्हणाला, 'माझ्यापुढेच एका मोटारीचा अपघात झाला. तो ड्रायव्हर रक्तबंबाळ झाला होता. मी त्याच्या मदतीसाठी थांबलो. मी थांबलो नसतो, तर पहिलाच आलो असतो, पण प्रथम क्रमांकापेक्षा मला ड्रायव्हरला वाचवणं महत्त्वाचं वाटलं.' स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा इतरांच्या भल्यासाठी हरणं, हेच जेतेपण असतं! काही पराभव हे विजयापेक्षाही मोठे असतात.

तुमच्याकडे जे असेल ते देत राहा. ज्ञान द्या. आनंद द्या. सुख द्या. वेळ द्या.. कष्ट द्या. पैसे द्या. तुमचं आजचं देणं ही उद्यासाठी केलेली पेरणी असते. त्यातून कित्येक पटीने अधिक मिळते. सॉक्रेटिसने प्लेटोला, प्लेटोने ॲरिस्टॉटलला, ॲरिस्टॉटलने अलेक्झांडरला शिकवलं. एक पिढी पुढच्या पिढीला ज्ञान देत राहिली. त्यातूनच पिढ्यान् पिढ्यांचं जगणं नवनव्या शोधाने, ज्ञानाने सुंदर अतिसुंदर होत गेलं. हे झालं नसतं, तर ज्ञान नष्ट झालं असतं आणि जगाचं आजचं सुंदरपणही!

एखादा आनंदी माणूस आनंद वाटल्यानंतरही दुःखी झालेला दिसणार नाही. एखादा दानशूर दान दिल्याने कफल्लक झालेला भेटणार नाही. घेणाऱ्यांना कधीच पुरत नाही, पण देणाऱ्यांचं मात्र कधीच सरत नाही. म्हणून देणारे व्हा! कारण जगात सन्मान घेणाऱ्यांचा नाही; तर देणाऱ्यांचाच होतो. इतिहास घेणाऱ्यांचा नाही; फक्त देणाऱ्यांचाच लिहिला जातो! 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने