आशेतून आकांक्षा आणि आकांक्षातूनच महत्त्वाकांक्षा जन्माला येते | Yashacha Password (Part 53) - आशा (Hope)

यशाचा पासवर्ड (भाग :53) - आशा ( Hope)

जिथं 'आशा' प्रबळ असते तिथं समस्या कधीच प्रबळ ठरु शकत नाही..!

वादळी तडाख्यानं फुटलेल्या जहाजातून कसाबसा वाचून एका निर्जन बेटावर अडकून पडलेल्या खलाशाची अखेर कित्येक दिवसांनंतर सुटका झाली. त्याच्या अथक प्रयत्नांमुळे त्याची हालचाल एका जहाजाला जाणवली आणि ते त्याच्याकडे वळाले. त्याची सारी गोष्ट ऐकल्यावर त्या जहाजातील लोकांनी त्याला विचारलं, 'अरे पण या निर्जन आणि भयाण बेटावर तू इतके दिवस जिवंत राहिलासच कसा?" त्यावर तो खलाशी उत्तरला, 'आशेच्या बळावर! माझी इथून सुटका होईल ही माझी आशा मी मरू दिली नाही. बस्स! त्या आशेनेच मला जगवलं. सातत्याने प्रयत्नशील ठेवलं. '

माणूस अन्नाशिवाय चाळीस दिवस जगू शकतो. पाण्याशिवाय तीन दिवस जगू शकतो. हवेशिवाय आठ मिनिटं जगू शकतो, पण आशेशिवाय तो एक सेकंदही जगू शकत नाही. आशा हेच जगण्याचं, जिवंत राहाण्याचंही कारण बनतं. आज कसाही असला तरी आपला उद्या चांगला असेल, ही आशा मणसाला पुढे नेत असते. आशावादी माणसं रडताना दिसत नाहीत. ती तक्रार करीत नाहीत. ती प्रत्येक प्रसंगाला, समस्येला सामोरी जातात. चांगलं वेचतात आणि आणखी चांगलं मिळवण्यासाठी पुढे चालत राहातात. आशावादी माणसं कायम यशस्वी; तर निराशावादी कायम अयशस्वी ठरतात. कारण जिथं आशा प्रबळ असते तिथं समस्या कधीच प्रबळ ठरू शकत नाही. आपण जिंकणार ही आशाच समोरच्या संकटावर मात करून जय मिळवून देत असते. जेव्हा सारी सांगत असतात, हार मान्य कर. पराभव स्वीकार. तेव्हा आशाच मनाशी कुजबुजत असते. अजून एकदा प्रयत्न तर कर! प्रत्येक प्रयत्नामागे आपली आशा उभी असते. आशा आपली साथ कधीच सोडत नाही; आपणच तिला सोडून देतो. पराभव तेव्हा होतो!

ज्याच्यात योग्यता असते, त्याच्यातच आशा निर्माण होते. मात्र आशापूर्तीसाठी गरज असते, प्रयत्न करण्याची! प्रयत्न न करणारी माणसं निव्वळ आशेवर राहातात; आणि केवळ आशेवर जगणारा नेहमी उपाशीच मरतो.

Job Motivation  | Nitin banugade Patil


नोकरीसाठी वणवण करणारा एक तरुण सततच्या नकारामुळे निराश झाला. पुरता खचला. त्याच्या आशा संपल्या आणि मन निराशेने भारलं. त्या अवस्थेतच त्याने जगण्याचे दोर कापले आणि गळ्यात दोर अडकवून  मृत्यूकडे धाव घेतली. त्याच्या लटकत्या निष्प्राण देहाकडे बघत त्याच्या सग्यासोयऱ्यांनी हंबरडा फोडला. आईच्या व्याकुळ काळजाच्या चिरफाळ्या उडाल्या. नोकरी न मिळाल्याने त्याने आत्महत्या केली, ही चर्चा अंत्ययात्रेच्या तयारीतच होऊ लागली. त्याचवेळी दाराशी एक पोस्टमन आला. त्याच तरुणाच्या नावाचं पत्र घेऊन! ते एका जाणत्या माणसाने घेतलं. नीट वाचलं त्याला धक्काच बसला. त्या तरुणाला नोकरी मिळाल्याची आणि लगेच कामावर हजर होण्याची ऑर्डर त्यात होती! डोळे भरून आलेला जाणता माणूस त्या तरुणाच्या निष्प्राण देहाकडे बघत पुटपुटला, जरा थांबला असतास तर !

माणसाने आशा ठेवली की त्याच्या पूर्तीअभावी कधीकधी निराशा येणारच! पण निराशेच्या ढगामागे सूर्य असतोच. निराशेच्या काळोखापुढे हार पत्करून अंधारात गुडूप होऊ नये. आशेच्या किरणांना धरून यशाच्या सूर्योदयापर्यंत चालत राहावं. लक्षात ठेवावं, प्रत्येक रात्रीनंतर दिवस येतच असतो. ज्याला प्रकाश गाठायचा आहे, त्याने रात्र पार करायलाच हवी. आपल्यासाठी जागा नाही असं समजून प्रवास थांबवू नका. शिखरावर नेहमीच जागा असते, हे ध्यानी ठेवा आणि तिथे पोहोचण्यासाठी ज्याला उंच उडी मारायची आहे, त्याने लांबची धाव घ्यायलाच हवी. आशा ही धाव घेण्यासाठी बळ देते.

मानसशास्त्रज्ञ सांगतात, आजारी माणसं औषधापेक्षा आपण बरे होणारचयातीव्र आशेनेच लवकर बरी होतात. केवळ निराशेपोटी कितीही चांगली औषधं दिली, तरी माणसं कायम आजारीच राहातात. आशेचे किरण माणसाला कायम चिंतामुक्त, दुःखमुक्त ठेवतात. या आशेच्या किरणांचे व्यापारी व्हा. कारण जग अशा माणसांनीच आनंदी आणि सुंदर केलं आहे. तुमच्या आशेची कष्टांशी भागीदारी झाली की यश पूर्णत्वाला जातं. आशेतून आकांक्षा आणि आकांक्षातूनच महत्त्वाकांक्षा जन्माला येते. तीच महान यश देते. जगाला महान बनवते. 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने