अविश्वासाने संपत्ती कमावण्यापेक्षा अशी विश्वासू माणसं कमवा | Yashacha Password (Part 52) - विश्वास (Believe)

यशाचा पासवर्ड (भाग :52) -  विश्वास ( Believe)

अविश्वसनीय यश स्वतःवरील विश्वासावरच लाभते..!

शत्रूचं अफाट सैन्यबळ पाहून खचून गेलेल्या आपल्या सैन्यापुढे येऊन सेनापती म्हणाला, 'माझ्या हातात हे नाणं आहे. त्याच्या एका बाजूला मुद्रा तर दुसऱ्या बाजूला सिंह आहे. हे नाणं मी उंचावर फेकतो. जर सिंहाची बाजू वर पडली तर विजय निश्चित आपल्यालाच मिळणार आणि जर मुद्रा पडली, तर मात्र आपण माघार घेऊ या!' साऱ्यांनी यावर मान डोलावली... सेनापतीने नाणं वर फेकलं आणि सिंहाची बाजू वर आली. तसा तो म्हणाला, 'विजय आपलाच होणार. निश्चिंत चला!' आणि विजयाच्या त्या विश्वास सारी फौज बलाढ्य दुश्मनावर तुटून पडली. त्यांच्या अफाट शौर्याने विजय मिळाला. राजाने सेनापतीचं कौतुक केलं. विचारलं, जर नाण्याची मुद्रेची बाजू वर पडली असती, तर आपल्याला हा विजय गमावून माघार घ्यावी लागली असती.

तसा सेनापती म्हणाला, 'माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता!' त्याने वर फेकलेलं नाणं राजाला दाखवलं. नाण्याच्या दोन्ही बाजूला सिंहच होते!

सैन्यबळ | Yashacha Password (Part 52) - विश्वास (Believe)

चकित झालेल्या राजाला सेनापती म्हणाला, 'आपण जिंकण्यासाठी आपल्या सैनिकांत क्षमता निर्माण करण्याची गरजच नव्हती. क्षमता त्यांच्यात होतीच. गरज होती ती आपण जिंकू शकतो हा विश्वास निर्माण करण्याची. या नाण्याने मी तेच साधलं! ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास असतो, ती गोष्ट तुमच्याकडे येतेच. ज्या गोष्टीवर तुमचा विश्वास नसतो, ती थांबून राहाते. आपली पात्रता, योग्यता, क्षमता आपल्या विश्वासावरच अवलंबून असतात. योग्यतेहूनही अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे, योग्यतेवरचा विश्वास! तो विश्वास ज्याच्याकडे असतो तोच आपल्या योग्यतेचा उपयोग करू शकतो.

जे स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाहीत, ते काही करण्यास स्वतःला प्रेरितच करू शकत नाहीत. स्वतःवरचा अविश्वास अडचणींवरचा विश्वास दृढ करतो आणि माणसं लढण्याआधीच पराभूत होतात. स्वतःवर विश्वास असणारी माणसं मात्र अडचणींवर विश्वास न ठेवता त्यावर मात करीत यशाच्या दिशेने झेपावत जातात. यशस्वी व्हायचं, तर स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. स्वतःच्या यशावर इतका ठाम विश्वास ठेवा, की ते प्रत्यक्षात येऊ शकेल. सर्वोत्तम यश संपादन केलेल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीचं एकच रहस्य ते सांगतात मी जिंकणारच, यावर माझा विश्वास होता !

अपयश देणारा एक महत्त्वाचा घटक आहे-अंधविश्वास! परीक्षा घेतल्याशिवाय विश्वास ठेवू नये, किंवा जिंकायचं तर लढावंच लागेल, हे माहिती असूनसुद्धा माणसं आंधळेपणाने स्वतःच्या योग्यतेपेक्षा दुसऱ्यांच्या अयोग्य गोष्टींमागे धावतात आणि आपलं जगणं पोळून घेतात. या सृष्टीत तुमच्याशिवाय दुसरी कोणतीही शक्ती नाही, जी तुम्हाला हवं ते मिळवून देईल. मान्यता विश्वासाने मिळवता येते. अंधविश्वासाला मान्यता नसते.

विश्वास हा परस्परसंबंध असतो. तुमचा आणि तुमच्या योग्यतेचा किंवा तुमचा आणि तुमच्या सहकाऱ्यांचा एकमेकांवर एकाच वेळी विश्वास असावा लागतो, तरच मोठी कार्य सिद्धीस जातात. रयतेचा शिवरायांवर विश्वास होता आणि शिवरायांचा रयतेवर. म्हणून त्या रयतेतून तानाजी बाजीसारखे जिवाची बाजी लावणारे नरवीर उभे राहिले. त्यातून स्वराज्य घडलं. अविश्वास हा वेळ, पैसा, श्रम खर्ची घालणारा अत्यंत नुकसानकारक घटक ठरतो. त्यामुळे खात्री करून घेणं, चौकशी करणं हे नको ते दुसरेच उद्योग वाढीस लागतात. अविश्वासातूनच शंका, संशय हे जन्म घेतात.. अविश्वासात काम करणंच कठीण होतं.

विश्वास मानसिक आधार देतो; तर अविश्वास मानसिक अस्वास्थ्य वाढवतो. आपल्यावर कोणी लक्ष ठेवून आहे, ही अविश्वासाची भावना माणसांना जाचते; तर आपली कोणी काळजी करतं आहे ही विश्वासाची भावना माणसाला सुखावते. अविश्वासाने कार्यक्षमता मंदावते; तर विश्वासाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

अविश्वासाने संपत्ती कमावण्यापेक्षा अशी विश्वासू माणसं कमवा. ती सर्वात मोठी संपत्ती! विश्वासार्हतेपेक्षा यश वेगळं नि मोठं नसतंच! 


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने