ध्येयवाटेवर निंदेचे खड्डे येणारच, उडी मारून पुढे चला यश समोरच आहे. | Yashacha Password (Part 47) - निंदा (Criticize)

यशाचा पासवर्ड (भाग :47) -निंदा (Criticize)

आपली निंदा घडणं ही आपला प्रभाव आणि प्रभावक्षेत्र वाढत चालल्याचीच खूण असते..!

काम करणाऱ्या माणसांचीच समीक्षा होते. त्याच्यावरच टीका होते आणि निंदाही अशांच्याच वाट्याला येते. मात्र संवेदनशील वा हळवी माणसं अशा टीकेने कोसळतात. निंदेने उन्मळून पडतात. अशांनी लक्षात ठेवावं की टीकेत काही निकषानुसार तुमच्या कार्याची तटस्थतेने चिकित्सा केली असेल तर ती मार्गदर्शक ठरते.

मात्र बऱ्याचदा टीका ही प्रासंगिक नि उथळ असते. विरोधी मतप्रवाहातून ती निर्माण होते. अशी टीका करणारे आपण सर्वज्ञ आहोत, या भ्रमातूनही टीका करत असतात. त्यांची मतं कट्टर असतात. विचार कर्मठ असतात. नावीन्याचं वा वेगळेपणाचं त्यांना वावडं असतं. अशावेळी कुणी काही नव्याने निर्मिलं, स्वीकारलं की ते जुन्याचा सोस धरतात. जे चाललं आहे ते असंच चालू राहावं, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे कुणी परिवर्तनाच्या वाटेवर चालू लागला, की ते त्याच्या वाटेवर टीकेचे काटे पसरण्यात धन्यता मानतात, अशी टीका, निंदा मात्र विकृतीच असते. ती विषारी नि विखारी असते. त्यात व्यक्तिद्वेष ठासून भरलेला असतो.

Criticize | ध्येयवाटेवर निंदेचे खड्डे येणारच, उडी मारून पुढे चला यश समोरच आहे. | Yashacha Password (Part 47) -  निंदा (Criticize)

ज्याच्या वाट्याला निंदा आली नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. आपले विचार, आपली मतं आपलं जगणंवागणं किंवा कार्यपद्धत ज्याला पटत नाही, त्याने दिलेला प्रतिकूल अभिप्राय म्हणजे निंदा ! ती वाट्याला येतेच. आपल्या कार्याची थट्टा होते, निंदा घडते, ही आपला प्रभाव आणि प्रभावक्षेत्र वाढत चालल्याची खूण असते. आपल्याबद्दलच्या अपुऱ्या ज्ञानातून कधी ती निर्माण होते; तर कधी इतरांच्या प्रभावक्षेत्राला आपल्यामुळे हादरे बसू लागले की ती सुरू होते.

संत ज्ञानेश्वरांची पालखी आज त्यांचा गजर करत चालत असली, तरी ज्ञानदेवांवर हयातीत चिखलफेक करणारे कमी नव्हते. संत तुकोबांची गाथा आज गर्जत असली, तरी त्याकाळी त्यांची गाथा बुडवणारे नि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे होतेच ना! तुम्ही कसले राजे? असं शिवरायांना विचारणाराही वर्ग होताच. स्त्रीशिक्षणाचा जागर मांडणान्या सावित्रीबाई फुलेंना अपशब्दांचे प्रहार नि शेणामातीचा मार झेलावा लागला होताच. स्वामी विवेकानंदांच्या चारित्र्यहननाची मोहीम चालवणारे होतेच.

जेव्हा कुणापुढे झुकणे पटत नाही, आपल्या विचारांशी द्रोह घडत नाही. कुणाला शरण जाणं जमत नाही, आपल्याकडून आपल्याच विचार-आचार स्वातंत्र्याचं वागणं घडत जातं, तेव्हा ज्यांचा जळफळाट होतो, अशी माणसं निंदा करत राहातातच. जे काही करायचं ते आम्ही करू. जर तुम्हाला काही करायचं असेल, तर आमच्या मताप्रमाणे व आमच्या अनुमतीनेच करा! अशा कर्मठांच्या अहंकारातून निंदानालस्ती घडत राहाते. खरं तर, ते आपल्या प्रगतीने अस्वस्थ झालेल्या जीवांचं रुदन असतं.

कोणी कौतुक करणं जितकं स्वाभाविक तितकंच निंदा होणंही! निंदला तोंड द्यावं, पण निंदकाचं तोंड धरायला जाऊ नये. आपलं कार्य सोडून या नव्याच कार्याकडे वळणे म्हणजे आपण आपली प्रगती रोखून धरणे. माणसं बोलणारच. तुम्ही खर्च केला तर उधळे म्हणणार नाही केला तर कंजूष म्हणणार! मंदिरात गेलात तर धार्मिक म्हणणार नाही गेला तर नास्तिकच आहे म्हणणार! तुम्ही काहीही करा, हे असं बोलणं घडणारच! लक्षात घ्या, हा सुमार बुद्धीच्या कोत्या मनाच्या व्यक्तींचा उद्योग आहे. अशा निंदकांना उत्तर देण्याचा, त्यांच्या समाधानासाठी कशाची शहानिशा करण्याच्या भानगडीत पडूच नये. तो आपल्या शक्तीचा अपव्यय आहे. जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील? याचा विचार करूच नये. आपली विवेकबुद्धी काय म्हणते तेच करावं। निंदेच्या प्रसंगी स्थिरबुद्धीने, स्थिरचित्ताने अगदी सोशिकतेने आपल्या कार्यविश्वात कार्यरत राहावं. 

शेवटी, हत्ती चालू लागला की...... ध्येयवाटेवर निंदेचे खड्डे येणारच. त्याच्याजवळ रेंगाळू नका. उडी मारून पुढे चला. यश समोरच आहे. 

Yashacha Password Nitin Bangude Patil

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने