यशाचा पासवर्ड (भाग :38) - ऐकणे (Listen)
उत्तम 'कानसेन' झाल्याशिवाय सर्वोत्तम 'तानसेन' होताच येत नाही..!
आपल्या कानावर अनेक गोष्टी पडतात, पण आपण त्या ऐकतोच, असं नाही. पण ज्या जाणीवपूर्वक ऐकतो, त्या थेट मनात शिरतात. विचार होऊन तेथेच स्थिरावतात. संस्कार बनून पुढे आचरणातही येतात. शब्दांची, भाषेची ओळख घडते, ती ऐकण्यातून! ऐकण्याच्या सातत्यातूनच पुढे बोलणं जन्म तं. आपण जे जे ऐकलं त्याचं ते प्रकटन असतं. जे उत्तमपणे ऐकू शकतात, तेच सर्वोत्तमपणे बोलू शकतात. उत्तम 'कानसेन' झाल्याशिवाय सर्वोत्तम 'तानसेन' होताच येत नाही !
नीट ऐकून घेण्याची शक्ती ज्यांच्या ठायी असते, अशी माणसं बुद्धिमान, हुशार आणि चतुर बनतात. अशा माणसांमध्ये इतरांपेक्षा अधिक वेगाने ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असते. निव्वळ अचूकतेने ऐकण्याच्या, श्रवणशक्तीच्या बळावर अशी माणसं स्वतःला लवकर परिपक्व, परिपूर्ण बनवतात. त्यांना पुनःपुन्हा त्याच विषयांचा अभ्यास करावा लागत नाही. शंभर पुस्तकं वाचून जे ध्यानात येतं, ते एक तासाचं व्याख्यान ऐकण्याने तुम्हाला समजू शकतं. एखाद्या गायकाचं गाणं ऐकणं हा आपल्या गाण्याचा रियाजच असतो. इतर शक्तीपेक्षा श्रवणशक्ती आपला प्रचंड वेळ आणि श्रम वाचवत असते. फक्त ज्या अधीरतेने, उत्कटतेने आपण आपल्या परीक्षेचा निकाल ऐकत असतो; तशाच उत्कटतेने प्रत्येक गोष्ट ऐकली गेली, तर आपलं ज्ञानविश्व विलक्षण समृद्ध होतं.
आपलं 'ऐकणं' ही 'पेरणी' असते. ज्ञानाची, विचारांची, अनुभवांची..! ही पेरणी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक केली, तरच यशाचं पीक उत्तम उगवेल! हल्ली श्रवणप्रदूषणही वाढलं आहे. जे महत्त्वाचं, व्यक्तिमत्त्वासाठी गरजेचं असं ऐकणं दुर्मिळ झालं आहे. जे उथळ, जे नको ते कानांवर पडू लागलं आहे.
अवधानाने किंवा अनावधानाने कानावर येणारे असे अनावश्यक आघात मानवी मनांना विघातक बनवू लागले आहेत. मानसशास्त्रज्ञ सांगतात, आवाजांमुळे मानसिक प्रक्रिया आणि प्रतिक्रिया उद्दीपित होतात. त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणामही उद्भवतात. चांगलं ऐकणं जसं मन घडवतं; तसं चुकीचं ऐकणं सारं बिघडवू शकतं. म्हणूनच काय नि कसं ऐकावं याची मनाला शिस्त लावणं महत्त्वाचं ठरत आहे! आजूबाजूचा प्रचंड गोंगाट, गजबज आणि कल्लोळातून नेमकं ते वेचून घेता यायला हवं! प्रवाहित रहाचा संदेश देणारा निर्झराचा खळाळता आवाज. धावपळीत शांतता, विश्रांती हवीच, असं सांगणारी मध्यरात्रीची नीरवता... नव्या उत्साहाने दिवसाचं स्वागत करा, असं सांगणारं कोंबड्याचं आरवणं. कोवळा आनंद देणारी पहाटेची भूपाळी. हे सारं ऐकणं कसं जगावं हेच जणू सांगत असतात. वडिलधाऱ्यांचं संस्कारधन, शिक्षकांचं अध्यापन, विद्वान-व्यासंगी तज्ज्ञाचं संभाषण, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन हे सारं व्यक्तिमत्त्वाला आकार देणारं असतं. म्हणून ते सारं ऐकायला हवं.
दृक-श्राव्य माध्यमं श्रवणमूल्यं, विचारमूल्यं देतात. त्यावरील विविध भाषांतील बोलणं ऐकणं भाषांचा अभ्यास घडवते. संस्कृत शब्दोच्चार किंवा शुद्ध शब्दोच्चार वारंवार ऐकणं आपली वाणी शुद्धता घडवतं. शब्द संवेदना ऐकण्यातून जागी होते; ती वक्तृत्व फुलवते. उत्तम संगीत मनाला नादमयता प्रदान करीत चैतन्याचे, प्रसन्नतेचे रोमांच फुलवते. आयुष्य घडवणारी अशी एखादी संधी अगदी हळू आवाजात आपलं दार ठोठावत असते. म्हणूनच पूर्ण एकाग्रतेने ऐकायला शिका!
कमीत कमी मोजकं बोलणं आणि पुष्कळ ऐकून घेणं, हे सर्वोत्तम यश मिळवण्याचं सूत्र! मात्र माणसांची श्रवणक्षमता कमी झाली आहे. समोरच्याचं अगत्याने ऐकून घेणं दुरापास्त झालं आहे. इतरांचं न ऐकता स्वतः चंच ऐकवत राहाणारी माणसं लोकमानसात नावडती बनतात. स्वतःबद्दल सांगत राहाणं हा गुण तुमचा अहंकार दर्शवत असतो. इतरांना बोलूच न देणं, हा गुण तुम्ही त्यांना क्षुल्लक समजत असण्याची जाणीव करून देतो. याउलट, इतरांचं ऐकून घेणं, हा गुण तुमची विनम्रता प्रकट करतोच, पण समोरच्याला तुम्ही सन्मान बहाल करत असल्याचीही खात्री देतो.