यशाचा पासवर्ड (भाग :68) -नवी वाट
जे कुणीच कधी केलं नाही ते तुम्ही केलं तरच जे कुणालाही कधी मिळालं नाही ते तुम्हाला मिळेल..!
'ज्या मार्गावरून आधीच लोक चालत आले आहेत, त्या मार्गावरून मी चालणार नाही,' असं म्हणत या देशाच्या मुक्ततेसाठी हिंसेऐवजी अहिंसेचा मार्ग निवडणारे महात्मा गांधीजी निव्वळ यशस्वीच नव्हे, तर जगाला मार्गदर्शक ठरले.
नाकासमोर चालावे हा समाजमान्य नियम धुडकावून चालतानाही आभाळाकडेच नजर ठेवणारे, रात्रीच्या निरव शांततेत चमचमणाऱ्या ताऱ्यांच्या जीवनमरणाचा विचार करणारे, ताऱ्यांचा मृत्यू कसा होतो? या तत्कालीन शास्त्रज्ञांनी दिलेल्या उत्तरामागे न जाता स्वतःचं नवं उत्तर शोधणारे सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचा स्वतःच्या या नव्या संशोधनावर इतका ठाम विश्वास होता की, तब्बल पन्नास वर्षं त्यांच्या उत्तराची जगाने कदर केली नाही. मात्र तरीही त्यांनी आपलं उत्तर बदललं नाही. अखेर त्यांच्या या नव्या मताने जग बदललं. नोबेल पुरस्काराने त्यांना माळ घातली.
माणसं आहे तेच खरं मानतात. रूढ गोष्टी सत्य समजतात. जुन्या परंपरेच्या मागे मुकाट चालतात. पण जी चिकित्सक वृत्तीने शोध घेतात, जुन्याची साथ सोडतात, ती नवं निर्माण करतात. स्वतःला नि जगालाही बदलतात. परीक्षानळीतून गूढ, अद्भुत प्रकाश सारीकडे पसरताच विज्ञानाने भुतांचं अस्तित्व सिद्ध झालं असं म्हणत अनेकांनी अंधश्रद्धेपुढे शरणागती पत्करली. पण पूर्वसूरींच्या या शोधावर भाबडेपणाने विश्वास न ठेवता, त्याच प्रकाशाच्या शोधाची नवी वाट निर्मिणाऱ्या रॉट जेन यांच्या वृत्तीमुळे त्यांना त्याच गूढ प्रकाशात एक्स-रेचा प्रत्यय आला आणि जगाला एक्सरेचा महत्त्वाचा शोध लागला.
नवी वाट सोपी नसते. जुन्या वाटेवरून चालताना त्रास होत नाही, म्हणून माणसं नव्या वाटेवर जातच नाहीत. पण यश एका जागी मुक्कामाला कधीच थांबत नाही; ते नेहमी जागा बदलत राहातं. जिथे अजून कुणीच पोहाचलेलं नाही, तिथेच ते लपलेलं असतं. जे अशी नवी वाट शोधतात त्यांनाच ते गवसतं.
पण या नव्या वाटेवर पोहोचण्यासाठी हवी असते चिकाटी, दृढ आत्म विश्वास, कठोर श्रम करण्याची तयारी, शांतपणे विचार करून धाडस करण्याची धडाडी. चिकित्सक विज्ञाननिष्ठ बुद्धी आणि वेळेची पर्वा न करता अगदी वेधडकपणे त्यात झोकून देण्याची वृत्ती!
एकजण रात्रीच्या काळोखात नव्या भूमीच्या शोधात समुद्रातून प्रवासासाठी निघाला. रात्रभर तो नौका वल्हवत राहिला. सकाळी उजाडल्यावर त्याच्या लक्षात आलं, आपण जिथून सुरुवात केली अजून तिथेच आहोत. पुढे गेलेलोच नाही! त्यान शोध घेतला आणि त्याच्या लक्षात आलं, त्याने प्रवास सुरक्षित होईल का या विचारात रात्री बोटीचा नांगरच काढलेला नव्हता!
नवं काहीतरी करण्याची इच्छा जरूर असते, पण जुन्या वाटेत रुतलेला पावच आपण उचलायला तयार नसतो. सुरक्षिततेची तिथली भावना आपल्याला ते करूच देत नाही. ज्यांनी असुरक्षिततेलाच आव्हान दिलं, मर्यादा झिडकारल्या, समोर येईल ते सोसण्याची हिंमत ठेवली, मृत्यूलाही पराभूत करण्याची जिगर राखली, आणि संकटांना संधी मानली, त्यांनीच मानवजात सुखी नि समृद्ध केली. तीच माणसं अजरामर झाली.
जे कुणीच कधी केलं नाही ते तुम्ही केलं, तरच जे कुणाला कधीच मिळालं नाही, ते तुम्हाला मिळेल. निव्वळ ठरलेल्या मार्गानेच धावणाऱ्या रेसच्या घोड्याप्रमाणे तोंडाला फेस येईपर्यंत धावणारे रेस जिंकू शकतात; पण यश नाही!