निष्ठा आपल्या कार्याशी आणि कर्तव्याशी | Yashacha Password (Part 56) - निष्ठा (Loyalty)

यशाचा पासवर्ड (भाग :56) -निष्ठा (Loyalty)

कडवट निष्ठावंताची मांदियाळी जिथे निर्माण होते, तिथेच इतिहास घडतो..!


स्वदेशीचा स्वीकार आणि विदेशीवर बहिष्कार हे स्वातंत्र्यसंग्रामाचं अभियान प्रभावीपणे कार्य करीत होतं. मुंबईत आंदोलन चालू होतं. विदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रकना विरोध करण्यासाठी त्यांच्यासमोर उभा होता बाबू गेनू नि त्याचं तानाजी पथक! ते ट्रक पुढे नेऊच देत नव्हते. इंग्रज भडकले. त्यांनी तसेच ट्रक पुढे नेण्याचे आदेश दिले, पण तानाजी पथक जुमानेना. ट्रकना रोखण्यासाठी बाबू गेनू स्वतःच रस्त्यावर आडवा झाला. संतापलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने ट्रक चालवण्याचा आदेश दिला. पण ट्रकचालक बलवीरसिंहने नकार देताच इंग्रज अधिकाऱ्याने ट्रक स्वतःच चालवण्यास घेतला. ट्रक पुढे पुढे येत होता. पण स्वदेशीचा अभिमान आणि स्वातंत्र्य अस्मितेचा स्वाभिमान उरात पेरलेला बाबू भारत माता की जय म्हणत ठाम उभा राहिला. त्याच्या आवेशाने चिडलेल्या इंग्रजाने त्याच्या अंगावरून ट्रक नेला. स्वदेशीवरच्या निष्ठेपोटी बाबू गेनू स्वदेशीचा पहिला शहीद ठरला.

राष्ट्राचं व संघटनेचं मोठेपण हे त्यांच्या लोकसंख्येवर अवलंबून नसतं, ते अवलंबून असतं त्यात असणाऱ्या लोकांच्या निष्ठेवर! देशासाठी, मातीसाठी सर्वस्व समर्पित करणाऱ्या कडव्या निष्ठावंतांच्याच बळावर स्वराज्य-स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्र मोठं झालं. हे आपलं आहे या आपलेपणातून प्रेम निर्माण होतं. प्रेमातून विश्वास, विश्वासातून आदर उदयास येतो. आदरातून श्रद्धा आणि श्रद्धेतून निष्ठेचा जन्म होतो. ही कडकडीत निष्ठा मग उदात्त, उच्च कार्य करण्यास प्रेरित करते. निष्ठा म्हणजे पूर्ण समर्पण! तिथे फायद्यातोट्याचा, नफा-नुकसानीचा विचारच नसतो. तिथे हातचं राखून काही करणंच नाही. बेभानपणे झेपावत जाणं, बस्स... अशा निष्ठावंतांची मांदियाळी जिथे निर्माण होते, तिथे 'इतिहास' घडतो. जो पिढ्यान् पिढ्या प्रेरणा देतो. 

गांधीजींची सत्य - अहिंसा निष्ठा, विवेकानंदांची ज्ञाननिष्ठा, फुले-शाहू आंबेडकरांची समाजनिष्ठा, यातूनच तर ही माणसं मोठी झाली. या लोकांनी निष्ठेशी कधीही प्रतारणा केली नाही. तत्त्वनिष्ठ नि विचारनिष्ठ असणारी ही माणसं त्यापासून कधी ढळली नाहीत. अनेक वार नि प्रहार वाट्याला येऊनही त्यापासून वाचण्यासाठी वा काही लाभ मिळवण्यासाठी ती त्यापासून बाजूला सरली नाहीत.

26 11 taj hotel attak shahid

 

२६/११च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात गोळ्यांचा वर्षाव होत असतानाही अतिरेक्याला आपल्या मगरमिठीत जखडून तुकाराम आँबळेंची कर्तव्यनिष्ठा ही अशीच तेजोमयी..! निष्ठा म्हणजे पुरतं झोकून देणं. आपल्या कार्याशी, कर्तव्याशी एकरूप होणं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात का असेना, तुमचं काम तुम्ही पराकोटीच्या समर्पण वृत्तीने निष्ठेने केलं तर यश मिळतंच. तुमच्या अशा यशावरच राष्ट्राचं समाजाचं यश अवलंबून असतं. 

निष्ठा आपल्या कामाशी प्रामाणिक राहाणं शिकवते. त्यां प्रामाणिकपणात शंका किंवा अविश्वास नसतो. तिथे स्वार्थीपणाला धारा नसतो. पण जिथे स्वार्थ येतो तिथे निष्ठा डळमळते. कामात टंगळमंगळ करणारी माणसं, राजकारणात इकडे-तिकडे उड्या मारणारी माणसं, लाभ दिसताच विचार बदलणारी माणसं, ही तत्त्व-विचारनिष्ठेलाच स्वार्थापोटी खुंटीवर अडकवतात. यातून त्यांना क्षणिक लाभ होतातही. पण चिरंतन नि सर्वोत्तम यश लाभत नाही. अशी माणसं समाजाची नि राष्ट्राचीही हानी करत असतात. पण जी माणसं आपल्या आदशांवर, तत्त्वांवर, विचारांवर ठाम असतात ती कितीही आकर्षण समोर आलं. कितीही लाभ दिसला तरी आपल्या कर्तव्यनिष्ठेपासून ढळत नाहीत. जी निष्ठेपोटी सोपा मार्ग न निवडता अवघड चढण स्वीकारतात. कोणत्याही संकटापुढे न झुकता. निष्ठेने चालत राहातात, अशी माणसं समाज आणि राष्ट्राच भूषण ठरतात. अनेकांना 'ती' वेडी वाटतातही; पण 'शहाणे' फक्त इतिहास वाचतात. आणि 'वेडे'च इतिहास घडवतात !

'हे 'वेड' निष्ठेतूनच जन्माला येते !

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने