यशाचा पासवर्ड (भाग :48) - विनम्रता (Humility)
मोठी माणसं नम्र असतात आणि नम्र माणसंच मोठी होतात..!
ज्ञानाचा, मिळवलेल्या ध्येयसिद्धीचा अभिमान जरूर असावा, पण त्याचा अहंकार नसावा. आपल्याला जे येतं, ते इतरांना येत नाही म्हणून त्यांना कमी लेखू नये. कदाचित दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात ते सर्वोत्कृष्ट असू शकतात! पण अहंकार निर्माण झाला की, दुसऱ्याचं कर्तृत्व छोटं करण्याची आणि स्वतःचेच ढोल वाजवण्याची वृत्ती सुरू होते. त्या दुराभिमानामुळे कमावलेलं गमावलं जाण्यास वेळ लागत नाही.
तुम्ही कोण आहात? कसे आहात? तुम्ही काय साध्य केलं आहे? हे इतरांच्या लक्षात येतच असतं. त्यासाठी तुम्ही बढाया मारण्याची गरज नसते. आपल्याबद्दल अभिमान असावा, पण वागणुकीत तितकीच विनम्रताही असावी. एखादा विषय आपल्याला ज्ञात जरी असला, तरी आपलं सांगण्यापेक्षा इतरांचं ऐकून घेणं; आपला सन्मान वाढवण्यापेक्षा इतरांना आपल्या वागण्या बोलण्यातून सन्मान देणं; आपला वरिष्ठ असो वा कनिष्ठ; त्याला तितकंच प्रेम आणि आपुलकी देणं म्हणजे विनम्रता! आपल्याठायी असणारी विनम्रताच आपल्याबद्दलचा आदर वाढवत जाते.
तुमचं यश हे तुम्ही मिळवलेल्या पदावर, पैशावर, ज्ञानावर, स्थानावर अवलंबून नसतं. तुम्ही किती विनम्रता नि विनयशीलता जोपासता यावरच ते ठरत असतं. मोठी माणसं नेहमी नम्र असतात आणि नम्र माणसंच मोठी होतात. महानतेचं सर्वोच्च परिमाण म्हणजे विनम्रता, विनयशीलता !
विनम्रता म्हणजे लाचारी नव्हे. विनम्रता म्हणजे कणखरपणा! विनम्रता म्हणजे लाळघोटेपणा नव्हे, तर स्वाभिमानी सभ्यता! विनम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणं, दुबळं समजणं नव्हे. विनम्रता म्हणजे कठोरपणा. मेणाहून मऊ असणारे विष्णुदास प्रसंगी वज्राहन कठोर होतातच. विनयशीलतेची विटंबना ते सहन करीतच नाहीत. नाठाळांच्या माथी काठी हाणायलाही ते सिद्ध असतातच! विनम्रता म्हणजे निष्कपटपणा, निष्कलंकपणा, निराग्रहीपणा! विनम्रता म्हणजे सहज स्वाभाविक सरळ वागणे. संयमित, शांत, समतोल जगणे!
विनयशील माणसं स्वत:ला मिरवत नाहीत किंवा ती आपल्या विनम्रतेचा देखावाही करत नाहीत. आपण किती विनम्र आहोत, हे दाखवणं म्हणजे पुन्हा नम्रतेचा अहंकार धारण करणं! म्हणजे त्यागाचाही भोग घेणं! आपण अहंकारी नाही; याचाच अहंकार बाळगणं; अशा विनम्रतेचा उपयोग नाही! विनम्र माणसांच्या ठायी प्रेम आणि आपुलकी वसत असते. द्वेष, राग, स्वार्थ, हेवेदावे यांना त्यांच्याठायी स्थान नसतं. सातत्याने त्रास देणाऱ्या एकावर एक सदगृस्थ अजिबात रागवत नाही, हे पाहून दुसऱ्याने विचारलं, तुम्ही त्याच्यावर रागावत का नाही ?
यावर तो सद्गृहस्थ म्हणाला, 'कारण त्याला तेच तर हवं आहे. मी रागावलो की तो जिंकला. त्याला जिंकू न देणं हाच माझा विजय आहे! त्याने काय करावं, ही त्याची निवड आहे. पण मी काय प्रतिसाद द्यावा, ही माझी निवड 'आहे?' विनम्र माणसं आपल्यावरील टीकाही सकारात्मकतेने घेतात. त्यावर आकांडतांडव करण्यापेक्षा त्या टीकेतून आपल्यातील काय कमी आहे ते शोधतात. जे नाही ते शिकण्याचा प्रयत्न करतात. विनम्रता तुम्हाला कायमच समृद्ध करत राहाते. ती कमीपणा देत नाही. कमीपणा घालवते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी एका कवितेत लिहितात, केळीचं पान बाभळीच्या पानाला हिणवतं. मी मोठे, मी श्रेष्ठ म्हणून मिरवते. पण जेव्हा सोसाट्याचा वारा येतो. तेव्हा मोठेपणाच्या कैफातील केळीचं पान त्याला अडवू पाहाते आणि स्वतःच्याच चिरफाळ्या करून घेते. याउलट बाभळीचं पान मात्र त्या बेभान वाऱ्याशी मस्त खेळत राहाते. ताठरता मोडून टाकते. विनम्रता टिकवून ठेवते!
संत बसवेश्वर म्हणतात, 'पाठीवर बसणाऱ्यांना गाय दूध देत नाही. दूध हवं असेल तर गायीच्या पायापाशीच बसायला शिकलं पाहिजे.' यशाचंही तसंच आहे. तुम्ही विनम्रतेच्या पायाशी बसा. यश तुमच्या पायाशी लोळण घेईल!