श्रीमंतीने विचार कमावता येत नाहीत मात्र विचारांनी श्रीमंती कमावता येते..! | Yashacha Password (Part 70) - नवविचार

 यशाचा पासवर्ड (भाग :70) -नवविचार

श्रीमंतीने विचार कमावता येत नाहीत मात्र विचारांनी श्रीमंती कमावता येते..!

शंभर सामान्य माणसांचं काम एक यंत्र करू शकतं. पण एका असामान्य माणसाचं कामं कोणी करू शकत नाही. कारण यंत्र विचार करू शकत नाही. पण विचारातून माणूस यंत्राचा शोध लावू शकतो. विचारपूर्वक केलेली कृती यशाचं दार उघडणारी ठरते, तर कृतीनंतर होणारा विचार हा पश्चात्तापाचं प्रकटीकरण करणारा असतो. विचार कृतिशीलतेचा संस्कार करतो, तर संस्कार विचारांची पेरणी करत जातो. त्यातून निर्माण होणारी विचारशक्ती ही आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासाचं मार्गदर्शन करते. कुणासोबत जावं, कुणाच्या पाठीमागून चालावं, कुणाच्या विचारांचं बोट धरावं, हे तीच सांगत असते.

Nitin Banugade Patil Thoughts

माणसं व्यक्तींचं नव्हे तर त्यांच्या विचारांचं शिष्यत्व पत्करत असतात. माणसं विचारांनी मोठी होतात. विचार त्यांना मोठे करतात. त्या विचारांचं अनुकरण करत इतर माणसं पाठीमागून चालतात. अशी विचार निर्मिणारी, विचार देणारी माणसं आदर्श म्हणून लोकसमूहाच्या पुढे उभी राहातात.. त्यांच्या विचारांवरच उद्याच्या पिढ्या पोसल्या जात असतात.

एका महान विचारांच्या निर्मात्यापासून प्रेरणा घेऊन नवा विचार निर्मिणारे नवे महात्मा तयार होत असतात. राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यामागे विचार होता. विचारांमागे कार्य होतं. पिढ्यानपिढ्या ह्यातून घडल्या. समाज घडवत राहिल्या.

अशी विचारांचे संस्कार करणारी माणसं आपल्या अवतीभोवती हवीत. त्यांच्या संगतीत विचारांच्या पंगती उठवीत जगणं घडायला हवं. लहानपणी आंघोळ झाल्यावर पाय खराब होतील म्हणून छोटा श्याम आपल्या आईला म्हणाला, आई तुझा पदर खाली जमिनीवर पसर म्हणजे माझे पायाचे तळवे मातीने खराब होणार नाहीत. आपल्या मुलाचा हा हट्ट पुरवीत ती आई श्यामला म्हणाली, श्याम, पायाच्या तळव्यांना घाण लागू नये म्हणून जमा जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो।

आईने दिलेला हा विचार श्यामने मनावर कोरून ठेवला. मोठेपणी सानेगुरुजी झाल्यावरही आपल्याच नव्हे, तर इतरांच्याही मनाला घाण लागू नये म्हणून सदविचारांची पेरणी करत राहिला.

एक विचार आयुष्याला वळण देतो. एक विचार आयुष्य घडवतो. वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक आणि राष्ट्रीय यशही विचारांतूनच घडतं. पण दुर्दैवाने आता विचार निर्माण करणारी मनं कारखान्यांच्या जगात दुर्मिळ झालीत. परिसराच्या स्वच्छतेचं आग्रही प्रतिपादन होतं, पण मनाची स्वच्छता ठेवणाऱ्या विचारांचं होत नाही. ज्यांच्या विचारांचं आचरण करावं, असे आदर्श भेटत नाहीत, ही हळहळ आहे. कळकळ आणि तळमळ असणारी, विचार देणारी चरित्रं आता पुस्तकांतून शोधावी लागतात ही वस्तुस्थिती आहे. मुळात विचारांची निर्मिती करणारी मनं तयार करावीत, असा विचार करणारी माणसंच भेटत नाहीत, ही शोकांतिका आहे. पूर्वी माणसं सद्विचारांनी मोठी व्हायची. आता माणसं पैशांनी मोठी होतात. वास्तविक, विचारांनी श्रीमंती कमावता येते, पण श्रीमंतीने विचार कमावता येत नाहीत, अविचाराने श्रीमंती मात्र गमावता येते. विचारच महत्त्वाचे हा विचारच आता हरवला आहे.

विचार यश देतो. अतिविचार अकार्यक्षम बनवतो. तर अविचार कार्यनाश घडवतो. विचार दिशा दाखवतो. कृतिशील बनवतो. विचारी व्हावे. विचार ऐकावे. विचार वे. विचार शोधावे, विचारांचे निर्माते बनावे.

तत्त्वचिंतक कार्ल मार्क्सने जगाला विचार दिले. तो हयात असताना त्याचं मोल कळलं नाही. मार्क्सचं मोठेपणही समजलं नाही. त्याच्या अंतयात्रेला अगदी चार माणसंही नव्हती. पण पुढे त्याच्या विचारांचा मार्क्सवाद जगभर पसरला. बाढला. सारं जग त्याचं अनुयायी झालं. तुमचा नवा विचार कदाचित आज कुणाला पटणार नाही. पण उद्या तोच क्रांतिविचार ठरू शकतो. म्हणून विचार कराच!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने