यश मिळवण्यासाठी किती धावावे | Nitin Banugade Patil Thought | Yashacha Password (Part 75) - धावणे ( Run)

यशाचा पासवर्ड (भाग :75) -धावणे (Run)

तुम्ही किती धावता याहीपेक्षा तुम्ही कुठे थांबता हे कळणं महत्वाचं..!

सध्या माणसं धावतात खूप; पण पोहोचत कुठेच नाहीत. मिळवतात खूप, पण त्यांना सापडत काहीच नाही. ऊर फुटेस्तोवर नुसतंच पळत राहाणं, हेच आता जगणं होत आहे. पळणं हे साध्य बनत आहे. मात्र या गतीला विचारांची दिशा असेल, तर ती प्रगती ठरते आणि नसेल तर मात्र हीच गती अधोगतीला नेते.

एक सद्गृहस्थ परीस शोधण्यासाठी निघाला. वाटेत दिसेल तो दगड घ्यायचा आणि गळ्यात असणाऱ्या लोखंडी साखळदंडाला लावून बघायचा. हेतू हा की तो दगड परीस असेल, तर गळ्यातला साखळदंड सोन्याचा होईल आणि परीस सापडेल. तो फिरत राहिला. परीस शोधत राहिला. वर्षानुवर्षं त्याचा एक उद्योग सुरू राहिला, दगड घ्यायचा साखळदंडाला लावायचा टाकून द्यायचा.

काही दिवसांनी त्याला त्याचा मित्र भेटला. त्याने निरखून बघितलं आणि आनंदाने म्हणाला, 'अभिनंदन! अखेर तू परीस मिळवण्यात यशस्वी झालास. तुझ्या गळ्यातला साखळदंड सोन्याचा झालाय!'

तसा तो चमकला, त्याने स्वतःच्या गळ्याकडे बघितलं. खरंच तो साखळदंड सोन्याचा झाला होता. त्याला काही सुचेना, काय करावं समजेना. तो स्वतःवरच विलक्षण चिडत म्हणाला, परीस सापडला पण; आणि गेला पण! अरे, गेली काही वर्ष एकच सवय लागली. दगड हातात घायचा, साखळदंडाला लावायचा आणि टाकून द्यायचा. या नादात परीस हातात आला कधी, साखळदंडाला लावला कधी आणि टाकून दिला कधी, कळलंच नाही!

जीवनाच्या स्पर्धेत माणसांची अवस्था अशीच आहे. फक्त पळणं हीच सवय झाली. वेग हाच ध्यास झाला. परीस हाताशी येऊनही पळण्याच्या नादात तो नकळत फेकला गेला. मिळवायचं काय आणि किती याचा विचारही त्याच वेगात मागे पडला. अधिक, आणखी अधिक हवं, यासाठी वेग वाढत राहिला.

यश मिळवण्यासाठी किती धावावे  | Nitin Banugade Patil | Yashacha Password (Part 75) - धावणे ( Run)

वेगाच्या नादात नियंत्रण सुटतं. ताबा हरवतो. प्रवास सैरभैर होतो. चित्ताची व्यग्रता वाढते. त्यामधून ताण वाढतो. हे ताणतणाव सत्व आणि स्वस्थता हिरावून घेतात. अतिवेग इच्छित स्थळी पोचण्यापूर्वीच अंत घडवून आणतात. मग या वेगाचा उपयोग काय? आपलं समृद्ध जीवन शांतपणे, समरसतेने अनुभवता यायला हवं. त्याचा मनस्वी आस्वाद घेणं हे जमायला हवं. त्यासाठी वेग मर्यादित हवा. जशी क्रिया तशी प्रतिक्रिया घडत राहाते. चेंडू जेवढ्या वेगात वर जातो, तेवढ्याच वेगात खाली येतो. माणसांचंही तसंच आहे. नुसतंच उंचीवर जाणं घडायला नको. त्या उंचीवर टिकता आलं पाहिजे. उंची टिकवता आली पाहिजे.

झर्रकन वेगात निघून जाणारी माणसं लक्षात राहात नाहीत. लक्षात ती राहातात, जी योग्य वेगात आणि योग्य मार्गाने चालतात. पण हल्ली वेगाइतकाच लवकर पोहोचण्यासाठी शॉर्टकट हा शब्दही परवलीचा झालाय. माणसं शॉर्टकट पटकन स्वीकारतात. पण यशाकडे नेणारा कुठलाही शॉर्टकट नसतो, हे ते विसरतात.

शॉर्टकटने मिळवलेलं यश, मिळवलेला मोठेपणा किंवा पैसा चिरकाल कधीच टिकत नाही. असा पैसा परत जाण्यालाही शॉर्टकटच निवडतो. पूर्वी माणसं कष्ट जास्त करायची; कमी कमवायची. पण तरीही जगणं सुंदर करायची. आता कमीत कमी कष्टांत जास्तीत जास्त कमावतात, तरीही सैरभैरच राहातात. पूर्वी माणसं निवांत जेवायची. धिप्पाड, बलदंड व्हायची. आता फास्ट फूड खातात आणि प्रकृतीनेही शॉर्ट शॉर्ट होत कशीबशी अलवार जगतात. पण जे चाललं आहे, ते कुणासाठी नि कशासाठी?

आपलं धावणं आपल्याच फायद्याचं ठरणार नसेल, ते आपल्याला आरोग्यसंपन्न, कृतार्थपणे जगवणार नसेल, तर उपयोग काय? थोडं चालावं. थोडं पळावं. थोडं थांबावं. मागं वळून बघावं. काय गवसलं ते ठरवावं. ते उपभोगावं, मग पुन्हा पुढे चालावं. जगण्याचं समर्थपण मिळवावं.


तुम्ही किती धावता यापेक्षाही तुम्ही कुठे थांबता, हे कळायला हवं. कारण यश तिथेच थांबलेलं असतं. 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने