यशाचा पासवर्ड (भाग :74) -पूर्णत्व (Completeness)
संकुचितपणा विनाशाकडे तर पूर्णत्वाचा ध्यास विकासाकडे नेतो..!
एखादी गोष्ट जोपर्यंत पूर्णत्वात असते, तोपर्यंत तिच्यात सामर्थ्य असतं. ती तुटली, फुटली, तिचं तुकड्यांत रूपांतर झालं की, ती संपते. तिची कृतिशीलता, सामर्थ्यशीलता लयाला जाते.
साऱ्या सृष्टीचेही आम्ही तसेच तुकडे केले. अवकाशगंगेचे तुकडे केले. त्या अवकाशगंगेचेही परत तुकडे केले. हा ग्रह; तो ग्रह, ही पृथ्वी; तो चंद्र. त्या पृथ्वीचेही परत तुकडे केले. हा खंड; तो खंड, आफ्रिका- अमेरिका, हा आशिया खंड; या आशिया खंडाचेही परत तुकडे झाले. तो जपान; हा भारत. तुझा देश; माझा देश. या देशाचेही परत तुकडे केले. हे राज्य; ते राज्य, तुझं राज्य; माझं राज्य. त्या राज्याचेही परत तुकडे केले. तुझा जिल्हा; माझा जिल्हा. त्या जिल्ह्याचेही परत तुकडे हा तालुका; तो तालुका. तालुक्याचे परत तुकडे तुझं गाव; माझे गाव, याचं गाव; त्याचं गाव. गावाचे परत तुकडे हा वॉर्ड; तो वॉर्ड. त्या वॉर्डाचेही परत तुकडे, तुझं घर; माझं घर. घराचेही परत तुकडे, तुझी खोली; माझी खोली. खोलीचेही परत तुकडे हा कोपरा; तो कोपरा. कोपऱ्याचेही तुकडे हा दगड; तो दगड, तुझा दगड; माझा दगड. दगडाचेही परत तुकडे हा खडा; तो खडा. त्याच खड्याचेही परत तुकडे, हा कण; तो कण. त्या कणाचेही परत तुकडे हा रेणू; तो रेणू. त्या रेणूचेही परत तुकडे, हा अणू; तो अणू...
आणि जिथे अणूचा शोध लागला, तिथे अणुबॉम्बच तयार झाला. तुकडे तुकडे करत राहिलो, तर ते विनाशाकडे नेतात. पूर्णत्वात जात राहिलो, की ते विकासाकडे पोहोचवतात. भाग-विभाग पाडावे लागतात. ते कार्यसोयीसाठी, व्यवस्थापनासाठी असतात. खोलवर जात, सूक्ष्मतेचे शोधही गरजेचे असतात. विधायक सुविधा देतात. मात्र हेच जेव्हा भाग-विभाग भेद निर्माण करण्यासाठी वापरले जातात, शोध विनाश करण्यासाठी चालवले जातात, तेव्हा ते घातक ठरतात. अध्यात्माने अद्वैत दिलं. विचारांनी एकत्व प्रदान केलं. विकासाने पूर्णत्व बहाल केलं. दुर्दैवाने आता हे अद्वैत, एकत्व, पूर्णत्व पुरतं उद्ध्वस्त करणारं संकुचितपण प्रत्येकाच्या मनात तयार झालं आहे.
वर्धिष्णू विश्ववंदिता असं सांगणारी शिवरायांची मुद्रा. हे विश्वची माझे ध्यास घर ही संकल्पना मांडणारे ज्ञानेश्वर, विष्णूमय जग म्हणणारे तुकोबाराय, विलक्षण मोठ्या झालेल्या या माणसांनी विश्वव्यापक पूर्णत्वाचा प्रांता-जातीपुरतं धरला. जगात मोठी माणसं तीच झाली ज्यांनी संकुचितपणा झटकला. व्यापक विचार दिला. ही माणसं स्वतःपुरतं स्वतःच्या वाटप पाहात बसली नाहीत. त्यांनी विश्वकल्याणाचा प्रयत्न चालवला. मात्र त्यांच्या या विचारांचं विचारपूर्वक विसर्जन करून या महापुरुषांचंच करून आपापले वर्चस्व वाढवण्याचा, इतरांना कमी लेखण्याचा विलक्षण संकुचितपणा आता वाढतो आहे.
साऱ्यांच्या समान सहभागाने पूर्णत्व तयार होतं. मात्र एक मोठा; एक छोटा याने समतोल बिघडून जातो. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अपवे, हे माहिती असूनही धर्मालाच द्वेषाचं माध्यम बनवलं जातं. द्वेष हाच धर्म होऊन जातो. आपलेच देव्हारे कसे मोठे म्हणत अवडंबर माजवलं जातं.
संकुचितपणा हे कोत्या मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं लक्षण! ज्ञानाने पूर्णत्व येतं. तिथे अविचार नसतो. तिथे विचार असतो व्यापकतेचा! तुम्ही जमिनीवर असाल, तर तुम्हाला आसपासचं दिसेल. तुम्ही घराच्या गच्चीवर गेलात, तर सारा परिसर दिसेल. तुम्ही आणखी उंचीवर गेलात, तर अक्खा शहर दिसेल. तुम्ही विमानातून पाहिलं, तर आणखी प्रचंड विस्तीर्ण भूभाग दिसेल. तुम्ही जसंजसे वर जाल; तसंतसं खालचं जग जवळ येताना आणि छोटं होताना दिसेल. जग तेवढंच असतं, फरक तुम्ही किती उंचीवर आहात. यावरून पडतो. तुमच्या विचारांची-ज्ञानाची उंची कमी असेल; तर तुम्ही तुकड्यांसाठी भांडाल. जर विचारांची उंची अफाट असेल, ज्ञान उंची विलक्षण असेल, तर तुम्ही पूर्णत्वासाठी झटाल-झगडाल. म्हणूनच उंचीवर पोहोचा, जमेल तेवढं अधिक उंचीवर जा, यश तिथे कळेल.