यशाचा पासवर्ड (भाग :54) -महत्वाकांक्षा (Ambition)
भव्य महत्वाकांक्षा ठेवणारी माणसंच असामान्य ठरतात..!
एक दुर्गम खेडेगाव. जिथं दळण-वळणाची कुठलीच सुविधा नव्हती. मधे प्रचंड मोठा डोंगर होता. कुणी आजारी झाला, तर डोंगरापर्यंत बैलगाडीने आणि नंतर त्याला पाठीवर घेऊनच डोंगर चढावा नि उतरावा लागे. गावात एकाच्या पत्नीचे दिवस भरत आलेले. अचानक तिला वेदना सुरू झाल्या. ती प्रचंड तळमळू लागली. तिला दवाखान्यात नेण्यासाठी बैलगाडीतून रात्रीच्या काळोखातून तो लगबगीने निघाला. वाटेत तो प्रचंड डोंगर! तिच्या वेदना प्रचंड वाढल्या. तो तिला धीर देत म्हणाला, जरा वेळ फक्त. बघ, हा डोंगर चढून उतरला की आलंच दवाखान्याचं गाव! त्याने तिला सरळ पाठीवर घेतलं नि तो भरभरा डोंगर चढू लागला. ती वेदनेने विव्हळत होती. तिच्या ओझ्याने तो विलक्षण घामेजला होता. अखेर तो डोंगरावर पोहोचला. तो म्हणाला, बघ, आलोच. आता डोंगर उतरायला वेळ नाही लागणार! बायको वेदनेने भयाण तळमळत होती. अचानक त्याच्या लक्षात आलं. बायकोचं विव्हळणं पूर्ण थांबलं आहे. तो स्तब्ध झाला. त्याने हाका मारल्या. पण उत्तर आलंच नाही. एका अनामिक भीतीने त्याचं अंग शहारलं. वेदनेची वीज मस्तकात सण्णकन् चमकून गेली. त्याने बायकोला खाली उतरवलं. अगं, आलोय आपण पोहोचलोय बघ. म्हणत तिला गदागदा हलवलं. पण ती केव्हाच गतप्राण झाली होती. तो सुन्न झाला. बायकोचा असा करुण अंत त्याला अंतर्बाह्य थिजवून गेला. राक्षसासारख्या उभ्याआडव्या पसरलेल्या त्या अक्राळविक्राळ डोंगराकडे पाहात तो चीत्कारला. जीव घेतलास म माझ्या बायकोचा. ज्यानं जगही बघितलं नाही, त्या माझ्या बछड्याचा! माझं जगणं उद्ध्वस्त केलंस तू.
दोन दिवसांनी अत्यंत शांत मुद्रेने तो त्याच डोंगराजवळ उभा होता. काही ठरवून. जणू तो त्या डोंगराला सांगत होता, मी पराभूत करीन तुला! आणि सोबत आणलेल्या टिकावं, फावड्याने त्याने तो राक्षसी डोंगर फोडायला सुरुवात केली. अखंडपणे तो एकटा काम करू लागला. येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याच्यावर हसायला सुरुवात केली. लोक टर उडवत होते. चेष्टा करत होते. पण तो मग्न होता. डोंगर फोडत होता. दिवस सरले. महिने, वर्ष उलटली. लोक गंभीर झाले होते. आता त्याचं विलक्षण कौतुक करत होते. डोंगर अर्धा फोडला गेला होता. अनेक वर्ष सरली होती. त्यांच्या अंखड कष्टाने डोंगराचा पराभव झाला होता. सारा डोंगर फोडून त्याने पूर्ण रस्ता तयार केला होता. त्या पूर्ण झालेल्या रस्त्याकडे बघत तो समाधानाने एका दगडाला टेकून बसला. म्हणाला, आता कुणाची प्रिय पत्नी उपचाराअभावी दगावणार नाही. आता कुणाचं बछडं आयुष्याची वाट सुरू होण्यापूर्वीच मरणार नाही. कुणाचं जगणं अर्ध्या वाटेत संपणार नाही. त्याची नजर त्या रस्त्यावर स्थिर झाली आणि समाधानाचा निःश्वास आणि अखेरचा श्वास त्याने एकदमच घेतला. त्या अविरत कष्टांसोबत त्याच्या आयुष्याचाही शेवट झाला. लोकांनी तिथेच त्या दगडापाशी त्याचं स्मारक उभारलं आहे. त्यावर लिहिलं आहे. 'साऱ्यांच्या आयुष्याचा प्रवास सुखकर करणारी ही वाट निर्माण करणारा एक महत्त्वाकांक्षी वाटाड्या इथं विसावला आहे!'
या जगात ज्यांनी काही विशेष केलं आहे, ती सारी माणसं अशी विलक्षण महत्त्वाकांक्षी होती. छोट्या-छोट्या आकांक्षेत गुंतून राहाणारी माणसं सामन्य असतात, तर भव्य महत्त्वाकांक्षा ठेवणारी माणसं असामान्य ठरतात. अशी माणसं विश्वाच्या सामर्थ्याची केंद्र ठरतात. स्वराज्य ही शिवरायांची महत्त्वाकांक्षा होती. स्वातंत्र्य ही नेताजी-भगतसिंहाची महत्त्वाकांक्षा होती. बहुजन समाजातून अज्ञानाचा अंधकार दूर करण्याच्या महत्त्वाकांक्षेपायी कर्मवीर भाऊराव पाटील आयुष्यभर अनवाणी पायाने हिंडत राहिले.
स्वामी विवेकानंद म्हणतात, 'जगाचा आणि संस्कृतीचा इतिहास म्हणजे मूठभर महत्त्वाकांक्षी माणसांची जन्मकथाच होय. महत्त्वाकांक्षेच्या पूर्णतेसाठी अंगी झपाटलेपण येतं. आयुष्यातील अनेक छोट्या आकांक्षेचा त्याग करून महत्त्वाकांक्षेची पर्ती करावी लागते. हे ज्याला साधतं, त्याला मोठं होता येतं.'