यशाचा पासवर्ड (भाग :76) -निर्णायक क्षण
कोणताही क्षण निर्णायक नसतो त्या क्षणाचा आपला निर्णयच त्याला निर्णायक ठरवत असतो..!
कोंढाणा किल्ल्यावर लढता लढता नरवीर तानाजी धारातीर्थी पडले. ते पाहून मराठी सैन्य सैरावैरा पळू लागलं. एका बाजूला धारातीर्थी पडलेला भाऊ; तर दुसऱ्या बाजूने पळणारं मराठी सैन्य! तो क्षण निर्णायक होता. इथे सूर्याजी हतबलही झाले असते, पण त्यांनी त्याक्षणी त्वरित कृती केली. परतीचे दोर कापून टाकले. सैन्यापुढे आता एकच पर्याय होता, दरीत उड्या मारून मरा नाहीतर लढून! सूर्याजीनी मराठी मनं चेतवली अन् पळतं सैन्य माघारी फिरलं. बेभान लढून जिंकलंदेखील! त्या निर्णायक क्षणाने हा विजय मिळवून दिला.
फ्रँकलिन रुझवेल्ट एके दिवशी उठले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं; पोलिओच्या आघातामुळे त्यांचे दोन्ही पाय हलेनात. त्यांच्या आयुष्यातला तो निर्णायक क्षण होता. ह्या क्षणी त्या धक्क्याने ढासळून जाऊन रुझवेल्ट संपलेही असते. पण त्यांनी त्या क्षणाला निर्णय घेतला, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. त्यांनी तो केला आणि त्याच्या देशाच्या इतिहासात ते चार वेळा निवडून आलेले एकमेव अध्यक्ष ठरले.
विन्स्टन चर्चिल लहानपणी वर्गात बोलायला उभे राहिले अन् त्यांच्या तोतरेपणावर सारा वर्ग हसत, ,चिडवत त्यांची कुचेष्टा करत राहिला. हा क्षणही त्यांच्या दृष्टीने निर्णायक होता. या प्रकाराने त्यांनी आपण परत बोलायचेच नाही, असा निर्णय घेतला असता. पण चर्चिलनी याच क्षणाला आयुष्याला कलाटणी देणारा क्षण बनवला. त्यांनी आपला तोतरेपणा घालवलाच, पण आपण जे सांगू ते लोकांनी ऐकावंच नि मानावंच, अशी परिस्थिती निर्माण केली. पुढे चर्चिल इंग्लंडचे प्रधानमंत्री झाले. त्यांना नोबेल मिळालं. चर्चिलच्या भाषणातील उतारे लोक आपल्या भाषणात उद्धृत करू लागले..
महात्मा गांधीजी रेल्वेने जात असताना गोऱ्यांच्या डब्यात काळा माणूस कसा? असं म्हणत त्यांना डब्यातून हाकलून दिलं गेलं. तो क्षणच त्यांनी निर्णायक बनवला. तो अपमान गिळून ते गप्पही बसू शकले असते. पण त्या क्षणीच गांधीजींचं मन उफाळून उठलं. जे आपल्या वाट्याला ते इतरांच्याही वाटायला येत असेल, पण का? या विचारांतूनच मग वर्णभेदाविरुद्धचं रणशिंग फुंकलं गेलं.
लक्षात असू द्या, दगडातून मूर्ती घडवताही येते अन् दगडाने मूर्ती फोडताही येते. दगड तोच... पण तुम्ही तो कसा वापरता यावर दगडाची कृती ठरते. निर्णायक क्षणांचंही असंच असतं. तेंच तुम्हाला विजेते बनवतात. तेच तुम्ही जेते आहात हे ठसवतात !