यशाचा पासवर्ड (भाग :55) - उंची
स्वत: उंचीवर पोहोचणं हे यश नव्हे
आपल्यासोबत अनेकांना त्या उंचीवर
घेऊन येणं हे खरं यश..!
सर्व समाज सुखी-समाधानी होण्यासाठी तुम्ही काही प्रचंड मोठं कार्य केलं पाहिजे, असं नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी केल्यात, तरी त्याच पुढे प्रचंड स्वरूप धारण करतात.
पुलावरून आत्महत्या करू पाहाणाऱ्या एका स्त्रीला जोतिबा फुले वाचवतात. तिला घरी घेऊन येतात. तिची काळजी वाहतात. पुढे अशा अनेक परितक्त्या स्त्रियांचा ते आधारवड बनतात. मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखतात. मुलींसाठी देशातली पहिली शाळा काढतात. पुढे महात्मा फुलेंचं कार्य व्यापक आणि प्रचंड होतं. साऱ्या समाजमनालाच दिशादर्शक ठरतं. ते महात्मा फुले समाजासाठी मी काय करू, असा प्रश्न विचारत बसले नव्हते.
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा मानवी जीवन सुखकर होण्यासाठी संजीवनी म्हणून वापर व्हावा, असं प्रकर्षाने वाटणारा तत्त्ववेत्ता रसेल! आपल्या संशोधनाचा वापर मानवी जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी होतो आहे, हे कळल्याबरोबर रसेल विलक्षण व्यथित झाला. ते संशोधन थांबवण्यासाठी हायड्रोजन बॉम्बची चाचणी होणाऱ्या भूमीत जाऊन तो राहिला. म्हणाला, 'माझ्या बलिदानाने तरी मानवी संहारासाठी होणारी ही धडपड थांबेल!' तो रसेलही मी लोकांसाठी काय करू? असं म्हणत बसला नव्हता.
पुणे शहरातील एक सद्गृहस्थ रोज सायंकाळी कामावरून सुटल्यावर प्रत्येक हॉटेलवर जातात आणि उरलेलं सारं अन्न फेकून देण्यापेक्षा मला द्या म्हणतात. त्यांच्या गाडीलाच दोन्ही बाजूला त्यांनी डबे तयार केलेत त्यात ते अन्न ठेवतात. आणि आपल्या घरी जाता-जाता वाटेत असणाऱ्या प्रत्येक भिकाऱ्यांना ते अन्न वाटतात. त्यांना खाऊ घालून ते आनंदी मनाने घरी जातात. ते म्हणतात, मी काहीच करत नाही. कामावरून येता-येता हॉटेलमधलं उरलेलं अन्न घेतो आणि ज्यांना गरज आहे त्यांना देतो. काम किती साधं आहे. सोपं आहे. पण किती जणांना ते उपाशी झोपू देत नाहीत. जे विचारतात, मी काय करू ? त्यांना हे किती सुंदर उत्तर आहे. मी ते केलं असतं. पण माझ्याकडे हे नाही. मी सान्यांना मदत केली असती. पण माझी परिस्थिती नाही, असं म्हणत अनेक सबबी सांगणाऱ्यांना काहीही नसलं तरी प्रचंड काही करता येतं, हे सांगणारं हे किती उत्तम उदाहरण आहे.
एखादं मोठं कार्य केल्यावरच काही साध्य होतं, असं नव्हे. छोट्या छोट्या गोष्टींतूनही प्रचंड मोठं कार्य करता येतं. एक गृहस्थ उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या घरापुढं एक पोत अडकवून ठेवतात. तिथेच एक पाटी लावतात. आपण अनेक फळं खाता. त्याच्या बिया इथे-तिथे टाकू नका. त्या या पोत्यात टाका. त्यातून उद्या अनेक फळं देणारी झाडं उगवतील.
त्याचं पोतं विविध प्रकारच्या बियांनी भरतं. मग ते एखाद्या डोंगरावर जातात. त्या डोंगरावर किंवा वाटेत लागणाऱ्या घाटामध्ये ते पोतं रिकामं करतात.. म्हणतात, या बियांतून शंभर नाही, पण दहा झाडं तरी उगवतील! वृक्षारोपणाची मोहीमच साग्रसंगीत राबवावी असं नाही. अशा पद्धतीनेही तुम्ही-आम्ही निसर्ग फुलवू शकतोच ना !
फक्त आपल्याच नव्हे, तर येणारी दिवाळी सर्वांच्या अंगणात सुखाचा परिमळ घेऊन येणारी ठरावी. आपलं घर रोषणाईने उजळत असताना कुणाच्या झोपडीत अंधार तर नाही ना, हे जरूर बघा. आपल्या हातातले काही प्रकाशकण त्यांच्याही अंगणात शिंपडा! आपण पंचपक्वांनी फराळाचा आस्वाद घेताना कुणी उपाशी तर नाही ना? हेही जरूर पाहा. आपल्या फटाक्यांचा आवाज ऐकून आपली दिवाळी साजरी झाली, असं म्हणणारी चिमणी पोरं आसपास असतील, तर चार फटाके त्यांच्याही हातून उडू द्या. रंगीबेरंगी वस्त्रांनी आपण सजताना लज्जारक्षणासाठी फडके गुंडाळण्याची केविलवाणी धडपड करणाऱ्यावर तुमच्या प्रेमाची एखादी शाल पांघरा. या साऱ्यांना आपल्या आनंदात सामावून घ्या. बघा, त्यांच्या डोळ्यांतून चमचमणारा आनंद तुम्हाला खरी दिवाळी साजरी केल्याचा आनंद देईल.
लक्षात असू द्या. स्वतः उंचीवर पोहोचणं हे यश नव्हे! आपल्यासोबत अनेकांना त्या उंचीवर घेऊन येणं, हे खरं यश!