यशाचा पासवर्ड (भाग :49) - अनुभव ( Experience)
यश नेहमी अनुभवी व्यक्तीलाच प्राधान्य देते..!
अनेकांच्या मनात पूर्वग्रहांची जळमटं जोपर्यंत जिवंत असतात, तोपर्यंत त्यांना वर्तमानाचे अनुभव घेताच येत नाहीत. अशी माणसं स्वतःच्या कल्पनाविश्वातच रममाण असतात. ती वास्तवाचे अनुभव कधी घेऊ पाहातच नाहीत, अशी अनुभवहीन माणसं अयशस्वीतेच्या पायरीवरच ठाण मांडून बसतात. ती यशाच्या पायऱ्या कधीच चढू शकत नाहीत.
कधी हा स्वत:बद्दलच्या न्यूनगंडाचा पूर्वग्रह असतो. त्यातून कधी आपण चुकू, मग लोक नावं ठेवतील; तर कधी नवं काही करण्यास वाटणारी भीती माणसांना अनुभव घेण्यापासून वंचित ठेवते. जबाबदारी न घेण्याची वृत्ती आणि पुढाकार न घेण्याची प्रवृत्तीही माणसाला अनुभव घेण्यापासून मागे खेचते. जबाबदारी घेणारी, पुढाकाराने काही करणारी माणसंच अनुभवी बनतात आणि अनुभवाच्या बळावरच पुन्हा हीच माणसं जबाबदारी घेण्यासाठी पुढे होतात आणि साऱ्यांच्या पुढे जातातही! काहीच न करणारी अनुभवशून्य माणसं परिस्थितीला दोष देतात. एकाच दिशेने जातात. अनुभवी माणसं मात्र परिस्थितीलाच आपल्या नियंत्रणात घेतात. तिची दिशा बदलतात. यशाच्या दिशेने झेपावतात.
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही. शिक्षण माहिती देते तर अनुभव ज्ञान देऊन माणसाला शहाणा करतो. पण माणसं अनुभव घेणंच टाळतात. इतरांच्या माहितीला, बोलण्याला खरं मानतात. ते तसंच आहे असं समजत राहातात. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, खादल्याची गोडी देखल्यासी नाही. गोडी पाहून कळत नाही. ती जाणायची तर साखर चाखूनच पाहावी लागते. अनुभवाशिवाय असलेलं ज्ञान हे आंधळं असतं, अनुभव नवी दृष्टी देतो. जाणतेपणा देतो. अनुभव चुका टाळणं शिकवतो. तो अधिकाधिक अचूकतेकडे आणि सफाईदारपणाकडे नेतो. प्रत्येक नवा अनुभव नवे दृष्टिकोन बहाल करतो. अनुभव वेगवेगळे प्रयोग करण्याची संधी देतो. अनुभव नवीन कौशल्य प्रदान करतो.
पूर्वग्रहांची जळमटं काढून टाका. नावडत्या गोष्टी आवडीने करून पाहा. भीती वाटणाऱ्या गोष्टींना धीटपणे सामोरं जा. एकाच मार्गाने जाण्यापेक्षा रस्ते बदलून पाहा. हे सारे अनुभव तुम्हाला समृद्ध करत जातील. अनुभवहीन माणसं एकांगी राहातात; तर अनुभवसमृद्ध माणसं बहुअंगीबहुढंगी होतात. प्रत्येक नव्या अनुभवाला सज्ज असणारी माणसं कोणावर अंबलवून राहात नाहीत. संकटाशी मुकाबला करण्याची, अडीअडचणींना तोंड देण्याची सवय या अनुभव घेण्याच्या वृत्तीतून तयार होते. अनुभव आत्मविश्वास देतो आणि वाढवतोही !
अनुभव असा शिक्षक आहे; जो आधी परीक्षा घेतो, मग धडा शिकवतो. ९९ वेळा प्रयोग फसल्यावरही जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसन हा त्या ९९ वेळांना चुकीचं कसं करायचं नाही याचे अनुभव मानतो. त्या अनुभवातून शिकतो आणि १००व्या वेळी यशस्वी होतो. कोणताच अनुभव कधी अपूर्ण नसतो आणि कधी पूर्णही नसतो. तो काही ना काही शिकवतच असतो. असे अनुभव घेणारेच सातत्याने पुढे-पुढे जात राहातात. यशाच्या आकाशाची उंची वाढवत राहातात! चांगलं-वाईट, योग्य-अयोग्य हे अनुभवातूनच कळत जातं. बोलणं-चालणं-वागणंच नव्हे तर एकूण व्यक्तिमत्त्व अनुभवांनी समृद्ध होत जातं.
याचा अर्थ, वाईट गोष्टींचासुद्धा अनुभव घेतलाच पाहिजे, असा नव्हे! स्वतःच्या अनुभवातून शिकतात ती बुद्धिमान असतातच, पण इतरांच्या अनुभवातून जी शिकतात ती अधिक बुद्धिमान असतात! इतरांच्या जगण्या वागण्यातून, यशा अपयशातून आपण कोणते अनुभव घेऊ नयेत, याचंही भान असलं पाहिजे. यशस्वितेसाठी अनुभव महत्त्वाचे. मात्र त्यासाठी सजगता, कल्पकता, इच्छाशक्ती आणि त्याहीपेक्षा सदसद्विवेकबुद्धी महत्त्वाची!
अनुभवी व्हा! कारण यश नेहमी अनुभवी व्यक्तीसच प्राधान्य देतं!