लक्षात असू द्या, बदल हाच बदल घडवत असतो! | Yashacha Password (Part 50) - बदल (Change)

यशाचा पासवर्ड (भाग :50) - बदल (Change)

परिस्थिती बदलायची असेल तर आधी तुम्हाला बदलावं लागेल..!

आपण बदलणं गरजेचं असूनसुद्धा माणसं बदलत नाहीत. बदलण्याच्या इच्छेचा अभाव; आपण बदलू शकतो, यावर नसलेला विश्वास आणि बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृतीचा अथवा शिस्तीचा अभाव, ही त्या पाठीमागची कारणं! परिवर्तन हा सृष्टीचा नियम असला, तरी बदलणं हा मनुष्याचा जोपर्यंत स्वभाव बनत नाही, तोपर्यंत यशाचे मार्ग खुले होत नाहीत. 

मात्र त्यासाठी चांगल्या-वाईटाची समज आणि भावना यांचा संयोग व्हायला हवा. जे बदल हवे आहेत त्यांचा वारंवार विचार करणं, सातत्याने मनाला तशी सूचना देणं, अशा अतः प्रेरणांतून स्वतःला घडवता येतं. स्वतः ला घडवण्याची बांधीलकी बदलाशी आपली वचनबद्धता करून देते.

जी माणसं वर्तमानात जगतात; आणि भूतकाळात रमतात, ती भविष्यकाळ घडवू शकत नाहीत. मात्र जी भूतकाळ मागे सोडतात, वर्तमानात चालतात आणि भविष्यकाळाकडे लक्ष ठेवत बदलाला सामोरं जातात तीच यशस्वी होतात. सूर्याकडे मान उंच करून पाहाणारे नि वाढणारे गवत महापुरा प्रचंड लोंढा आल्यावर आपला ताठरपणा सोडते आणि लवचिकपणा स्वीकारून जमिनीकडे झुकते. पाण्याच्या त्या रोरावत येणाऱ्या प्रवाहातही टिकून राहाते. या उलट बलाढ्य असूनही निव्वळ ताठर राहिल्याने उंच झाड मात्र उन्मळून पडते. परिस्थिती पाहन बदल स्वीकारणारे टिकतात. बदलासाठी लवचिकता महत्त्वाची; तर ताठरता घातक ठरते.

Change in Life |Yashacha Password (Part 50) - बदल (Change)

 

काही माणसं वरवर बदलाची इच्छा बाळगतात. मात्र आतून खोलवर कुठे.. तरी भूतकाळाला चिकटून राहातात. आपल्या सवयींना, दिनक्रमाला बदलून टाकणं त्यांच्यासाठी धक्कादायक असतं. आपलं जे आहे ते तसंच राहावं आणि बाकीचं मात्र बदलावं अथवा आपल्यासाठी इतरांनी बदलावं, अशी त्यांची मानसिकता असते. असे लोक कायम मागेच राहातात. अत्याधुनिक स्वयंचलित शस्त्राने लढणाऱ्या शत्रूसमोर तुम्ही हाताने चालवली जाणारी जुनीच शस्त्रं घेऊन उतराल, तर पराभवाला सामोरं जावंच लागेल. जिंकायचं असेल तर या जुन्या रूढीप्रियतेला कवटाळण्यापेक्षा बदलाला स्वीकारायें लागेल. नावीन्याचा शोध घेऊन नवं निर्माण करावंच लागेल.

आपल्या अगोदरचे लोक जुनंच कवटाळून बसले असते, तर जग आधी होतं तिथेच; तसंच राहिलं असतं. बदलाने, नावीन्याच्या शोधानेच जग सुंदर झालं आहे. बदल हा गतिमानता प्रदान करीत असतो. बदल हा जीवन व चेतनाशक्तीचं स्फूर्तिस्थान असतो. सामर्थ्यशाली तेच बनतात, जे सातत्याने नावीन्याचा शोध घेतात. आपल्या सृजनशीलतेने नवे अनोखे आशय निर्माण करतात. स्वतःचे अगदी नवेकोरे आकृतिबंध तयार करतात. पण त्यातच ते अडकून राहात नाहीत. तिथेच थांबत नाहीत. ते पुन्हा आणखी नवं काही शोधू पाहातात. नव्या रचना तयार करतात. लोक जेव्हा त्यांच्या पहिल्या गोष्टींना समजून घेत असतात, तोपर्यंत त्यांनी आणखी दहा गोष्टी नव्याने निर्माण करून ठेवलेल्या असतात. अशा लोकांना गाठणे, पकडणे मग शक्य होत नाही. ते यशाच्या आभाळात फार उंचीवर भराऱ्या मारत असतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धनीतीत बदल केला. तो सातत्याने बदलत ठेवला. एका युक्तीचा वापर त्यांनी दुसऱ्यांदा केला नाही. प्रत्येक वेळी ते नवे बदल करत राहिले. सबब शिवरायांच्या वाट्याला विजय, तर शत्रूच्या वाट्याला पराजय येत राहिले.

तुम्ही बदलत राहा कारण प्रत्येक गोष्ट बदलत असते, कुठलीही गोष्ट खात्रीची नसते. कुठलाही नियम किंवा कायदा त्रिकालाबाधित सत्य नसतो. तुम्ही पाऱ्यासारखे व्हा. कुठल्याही आकाराशी जुळवून घेण्याचा पवित्रा ठेवा, म्हणजे तुम्ही कुणाच्या चिमटीत गवसणार नाही. तुम्ही पाण्यासारखे प्रवाही व्हा. म्हणजे कितीही पत्थर आडवे आले, तरी पत्थरांतूनही पाझरून तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचता येईल. लक्षात असू द्या, बदल हाच बदल घडवत असतो! 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने