लक्ष्य निश्चित हवं तरच तिथपर्यंत पोहोचता येतं | Yashacha Password (Part 51) - एकाग्रता (Concentration)

यशाचा पासवर्ड (भाग :51) - एकाग्रता ( Concentration)

जगातील सर्वोत्तमता, सर्वोत्कृष्टता ही एकाग्रतेतूनच जन्माला आली आहे..!

आपल्यातील साऱ्या मानसिक-शारीरिक ऊर्जा एकाच कार्याकडे केंद्रिभूत करणं म्हणजे एकाग्रता! ज्याला एकाग्रता साधते, तो आपल्यातील ऊर्जेचं अचूक व्यवस्थापन करून हवं ते मिळवू शकतो. ही ऊर्जा प्रत्येकात असतेच. यशासाठी गरज असते, ती केंद्रिभूत करणाऱ्या एकाग्रतेची!

पावसाचे थेंब आभाळातून सैरावैरा पडतात. या प्रत्येक थेंबात शक्ती असतेच. पण तो थेंब काही बलाढ्य निर्मू शकत नाही. पण हीच थेंबाची शक्ती नदीत एकत्र येते. धरणात साठवली जाते आणि मग तिचं विद्युत शक्तीत रूपांतर होतं. तिच्या बळावर प्रचंड कार्य उभं राहातं. आपल्या शक्तीही अशाच थेंबासारख्या सैरावैरा धावत असतात, त्या एकत्र आल्या, की मग हवं ते साधता येतं. ह्या शक्ती एकत्र आणण्याचं काम एकाग्रता करते.

Burning Glass | Yashacha Password (Part 51) - एकाग्रता (Concentration)

 

सूर्याची किरणं कागदावर पडतातच. पण त्याने कागद गरमही होत नाही. मात्र कागद आणि किरणांमध्ये बहिर्गोल भिंग धरलं, तर सारे किरण एकवटले जातात आणि कागद जाळून टाकण्याची आपली क्षमता सिद्ध करतात. एकाच वेळी, एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करणं म्हणजे एकाग्रता! माणसाचं मन या भिंगासारखं साऱ्या शक्ती एकत्र आणून आपल्याला हवं ते करायला भाग पाडू शकतं. आपल्या मेंदूला त्या दिशेने कार्यरत करतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर   | Yashacha Password (Part 51) - एकाग्रता (Concentration)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रात्रीचे लिहीत बसले होते. पूर्ण तल्लीन झाले होते. त्याचवेळी सारी कामं आवरून त्यांचे सहाय्यक तेथे आले. बऱ्याच वेळाने बाबासाहेबांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. ते त्यांना म्हणाले, तू जा घरी आता! सहाय्यक निघून गेला. बाबासाहेब पुन्हा कामात तल्लीन झाले. सकाळी पुन्हा सहाय्यक कामावर आला, तर बाबासाहेब अजून लिहिताहेतच. त्याने जवळ जाऊन बाबासाहेबांना दोन-तीनदा हाका मारल्या. थोड्या वेळाने बाबासाहेबांची तंद्री भंगली. त्यांनी सहाय्यकाकडे बघितलं आणि म्हणाले, तू अजून गेला नाहीस!

काळवेळेचं भान न राहाणं, आपल्या कार्यात इतकं झपाटन जाणं की जगालाच विसरणं म्हणजे ही एकाग्रता! जगातील सर्वोत्तमता, सर्वोत्कृष्टता ही अशा एकाग्रतेतूनच जन्माला आली आहे.

आपलं मन प्रचंड शक्तिशाली आहे. पण आपल्यातील ही असाधारण शक्ती तेव्हाच प्रकट होते, जेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी एकाग्र होता. तुम्ही मन एकाग्र करा, अफाट कल्पना जन्मतील. तुम्ही बुद्धी एकाग्र करा, ज्ञानाचा प्रचंड बोध होईल. तुम्ही ऊर्जा एकाग्र करा बलाढ्य शक्ती प्राप्त होईल. हे सारं एका लक्ष्यावर केंद्रित करा, उदंड यश मिळून जाईल! 

सहज स्वाभाविक अवस्थेतील माणसं जे आपण करू अशी कल्पनाही करू शकत नाहीत, तीच माणसं संमोहित झाल्यावर अचाट अशी कामं करून दाखवतात. मग जे संमोहित अवस्थेत करता येतं, ते सहज जागृत अवस्थेत करता येणारच. ती शक्ती मुळात आपल्यात असतेच. गरज असते ती तिच्या एकाग्रतेची! एकाग्रता शक्तिशाली बनवते तर एकाग्रते अभावीची प्रयत्नशीलता शक्तिहीनता देते !

ऑलिव्हर राइट ज्याचे सारे विचार, साऱ्या शक्ती दिवसरात्र एकाच विषयावर एकवटल्या होत्या, फक्त एकाच-हवेपेक्षा जड यंत्र हवेत कसं उडेल? सारी परिस्थिती विरोधात असताना त्याच्या एकाग्रतेने उत्तर दिलं आणि हवेपेक्षा जड विमान हवेत उडालं!

तुम्ही एकाच वेळी दोन सशांचा पाठलाग करू लागलात, तर एकही ससा तुम च्या हाती लागणार नाही. अनेक गोष्टी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे एकावेळी एकच गोष्ट करा. ती मिळवून मग दुसऱ्या गोष्टींकडे वळा! एकाच वेळी अनेक गोष्टी करणारे एकही गोष्ट सर्वोत्तम करू शकत नाहीत.

लक्ष्य निश्चित हवं तरच तिथपर्यंत पोहोचता येतं. नक्की कुठे जायचं, माहिती नसलेल्यांना वाटाही सोबत करत नाहीत. मात्र ज्यांचे लक्ष्य निश्चित आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी ज्याचं मन, बुद्धी, शरीर, विचार, ऊर्जा, प्रयत्न है। सारं निर्धाराने एकाग्र आहे, अशांना वाटाच तिथे घेऊन जातात. सांगतात, चल, उचल पाऊल. हे यश तुझंच आहे!

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने