यशाचा पासवर्ड (भाग :40) - लेखन(Writing)
लिहीणं म्हणजे चिरंजीव होणंच..!
कागदासारखा दुसरा चांगला मित्र नाही. मनातलं सारं ज्याच्यापुढे लेखणीच्या माध्यमाने उतरावं आणि मन हलकं करीत निश्चिंत बिनघोर व्हावं, असा तो सहृदय..! मानसशास्त्रज्ञ सांगतात, मनातल्या भावना, विचार दडपून टाकल्यामुळे अनेक माणसं मानसिकदृष्ट्या असंतुलित होतात. जगणं भरकटून टाकतात. मानसिक संतुलनासाठी मन मोकळं करणं महत्त्वाचं! आजूबाजूची जिवंत माणसं ज्यावेळी बाजूला हटतात, तेव्हा मनीचं हे गुज कागदावर उतरवणं, फायदेशीर ठरतं. दोन माणसांचा समोरासमोरचा संवाद खुंटतो. बोलणं घडत नाही. घडलं तरी हवं ते प्रकट करता येत नाही. अशावेळीही लिहिणं ही कला विसंवाद दूर करते. स्वतःचा स्वतःशी संवाद म्हणजेही लिहिणं!
खरं तर, लिहिण्यामुळे अक्षराला वळण लागतं, तसं विचारांनाही वळण लागतं. लिहिण्यामुळे जसं भाषासौंदर्य वाढतं, तसं विचारसौंदर्यही वाढतं. पाटी-पेन्सिलीने कोरली गेलेली अक्षरं सातत्याच्या सरावाने हस्ताक्षरसौंदर्य वाढवतात. नेटकं, नेमकं, अचूक आणि स्पष्ट लिहिणं हळूहळू जगणंही तसंच घडवत जातात. लिहिणं तुमचा स्वभाव आणि सवयीही प्रकट करीत जातं.
रोजच्या धावपळीतून वेळ काढून थोडं लिहितं व्हावं. दिवसभर नाना गोष्टी आपल्याला दिसतात. अनेक अनुभव येतात. अनेक घटनांवर आपल्या मनात विचारांची आंदोलनं प्रकटतात. ती रोजच्या रोज लिहिता आली, तर ती अक्षरशिल्पं आपलं विश्व अधिक समृद्ध करतात. आपल्या आयुष्य नावाच्या प्रवासाचा, मनातल्या वेळोवेळी घडलेल्या भावभावनांच्या हिंदोळ्याचा तो समग्र दस्तावेजच ठरून जातो. काळाच्या पटलावर पुढे हा भूतकाळ 'इतिहास' बनून भविष्यकाळाला मार्गदर्शन करत राहातो. भूतकाळातील चुका कळाव्या नि भविष्याच्या वाटेवर अचूक कृती घडाव्या, यासाठी वर्तमानात लिहितं राहावं.. !
एखादी संस्मरणीय भेट, एखादी प्रेरणा, एखादी संधी, एखादा आयुष्य बदलून टाकणारा विचार या गोष्टी मनाच्या कुपीत जपून ठेवण्यासारख्या असतात. पण कालौघात विस्मरण घडतं. आठवणींच्या कप्प्यातून हे क्षण अलगद निसटून जातात. पुन्हा नीटसं स्मरत नाही. अशावेळी हे सारं लिहिलेलं असलं की, मग या साऱ्या दिव्य क्षणांना, विचारांना जणू चिरंजीवीपणाचं वरदान लाभतं.
लिहिणं म्हणजे चिरंजीव होणंच! एक तत्त्वज्ञ लिहितो, तुम्हाला अमर व्हायचं असेल तर दोन गोष्टी करा-असं कर्तृत्व गाजवा की, तुमच्यावर लिहिलं जाईल किंवा असं काही लिहा की तेच तुमचं कर्तृत्व होऊन जाईल! लिहिणं म्हणजे आयुष्य ‘जतन' करणं! तुमचा प्रवास मार्गदर्शक म्हणून, विचार म्हणून, इतिहास म्हणून पुढच्या पिढीच्या हातात देणं! अनादी काळापासून सृष्टीच्या या चोहो क्षेत्रात ज्या उलथापालथी झाल्या. जे शोध लागले, जे जीवनविचार स्फुरले, ते अनेकांनी लिहून ठेवले. तेच समृद्ध वारसा बनून पुढचं विश्व घडवू शकले. ज्यांनी हे विचार लिहिले नाहीत, ते त्यांच्यासोबतच अस्ताला गेले. पुढच्या पिढीचं 'भांडं' रिकामंच राहिलं. आपण कमावलेला असा कोणताही ठेवा अक्षय राहाण्यासाठी लिहिणं महत्त्वाचं!
सध्या भौतिक साहित्याच्या जगात शब्दसाहित्य दुर्मिळ झालं आहे. पत्रलेखनातून काळजापर्यंत जाणारा संदेश आता मोबाइलमुळे कानापर्यंतच थवकतो आहे. संगणकलिपीपुढे अक्षरलिपी आणि कीबोर्डपुढे लेखणी मागे सरत आहे. साक्षरांच्या या दुनियेत हस्ताक्षर लोप पावतं की काय असंही वाटू लागलं आहे. लिहिणं जमत नाही ही सबब नित्याची झाली आहे. त्यामुळे मोबाइल आणि संगणकासारखं आयुष्य-विचारही हँग व्हायची भीती बळावली आहे. अशावेळी सांगायला हवं-कागदावर आडवं लिहिलं की कथा होते... उभं लिहिलं की कविता होते, पण अंतःकरणाच्या तळवटापासून जे येतं आणि पुढच्याच्या अंतरंगाला जे भिडतं, ते ‘लिहिणं' जीवन घडवत जातं. लिहिणं आपलंच नव्हे; इतरांचंही जगणं समृद्ध करतं. लिहितं राहाणं म्हणजे वाहत राहाणं! आणि वाहणारेच तर ध्येयापर्यंत पोहोचू शकतात!