तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तुमचं यश ठरतं | Yashacha Password (Part 37) - व्यक्तिमत्व (Personality)

यशाचा पासवर्ड (भाग :37) -  व्यक्तिमत्व (Personality)

उत्तम व्यक्तिमत्व हेच उत्तम यशाचं सर्वोत्तम माध्यम असतं.. !


गौतम बुद्ध ते झाड आहे! असं म्हणण्याऐवजी ते झाड होत आहे! असं म्हणायचे. कारण म्हणण्याच्या तेवढ्या काळातही ते झाड विकसित होतच असतं. एखादा नवा अंकुर तेवढ्यात त्याला फुटला असेल. एखादं इवलंसं पान बाहेर डोकावलं असेल. निर्माणाची-बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. आपणही जसे काल होतो, तसे आज असत नाही. उद्या आजच्यासारखे असणार नाही. सूक्ष्म असे हे बदल घडत असतातच. या शिकण्यातूनच आपण आपलं व्यक्तिमत्त्व जाणीवपूर्वक सकारात्मक घडवू शकतो.

व्यक्तिमत्त्व म्हणजे माणसातल्या बऱ्या-वाईट गुणांची बेरीज! वाईट वजा करावं. बरं मिळवत जावं, ही व्यक्तिमत्त्व घडवण्याची प्रक्रिया! त्यासाठी आधी स्वतःतल्या बऱ्या-वाईट गुणांची ओळख हवी. अगदी एखाद्याशी हस्तांदोलन करताना तुमचा हात मरगळलेला किंवा थंड असेल, तर तुमच्यात कसलाच उत्साह नाही हे लक्षात येतं. तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, तुमचा आवाज... तुमची भाषा तुमचा सुसंस्कृतपणा किंवा असंस्कृतपणा प्रकट करत असते. अरेरावी बोलणं मुजोरपणा; तर हळुवार बोलणं दयाळूपणा दर्शवत असतं. 

माणसात वाईट आणि चांगले दोन्ही गुण असतात. मात्र वाईटावर ठपका ठेवण्यापेक्षा त्याच्यातल्या चांगल्याचं तुम्ही कौतुक करत असाल, तर तुम्ही सृजनशील असता. तुम्ही कुणाच्या हक्कांवर गदा आणत नसाल, तर जे संकटात सापडलेले असतात त्यांच्या मदतीसाठी धावता. त्यांना तुम्ही न्याय मिळवून देता. संकट कोसळूनही तुम्ही कोसळत नाही. अत्यंत धीराने तुम्ही त्याचा मुकाबला करता. यातूनच अत्यंत कठीण परीक्षेच्या काळात तुमचं व्यक्तिमत्त्व इतर व्यक्तींच्या पार्श्वभूमीवर उठून दिसतं. ते लोकमान्य आणि लोकप्रिय ठरतं..

आयुष्यातलं यश हे चांगल्या व्यक्तिमत्त्वाचाच हात धरून येत असतं. तुमच्याकडे कोणती पदवी आहे, यापेक्षा तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, यावर तुमचं यश ठरतं.

एका कंपनीत नोकरीच्या मुलाखतींसाठी काही उमेदवार बोलावले गेले. उच्च पदवीधर असलेल्या या उमेदवारांना मुलाखत झाल्यावर प्रवासभाडंही देण्यात आलं. मुलाखती संपल्यानंतर बऱ्याच वेळाने त्या कंपनीचे संचालक बाहेर आले, तर एक उमेदवार अजूनही तिथे उभा होता. संचालक त्याला म्हणाले, 'तुम्ही जाऊ शकता. निकाल आम्ही नंतर कळवू!' मात्र तो उमेदवार म्हणाला, 'सर, मी निकालासाठी नव्हे, तर मला जे प्रवासभाड देण्यात आलं, ते चुकून दुप्पट देण्यात आलं आहे. ते परत देण्यासाठी मी थांबलो आहे!'हे ऐकताच ते संचालक आनंदाने चमकले म्हणाले, 'तुमची नोकरी पक्की! तुम्ही उद्यापासून कामावर रुजू व्हा! साठ लोकांत तुम्ही एकटेच असे आहात की, जे दुप्पट आलेलं प्रवासभाडं देण्यासाठी थांबलात! पदवी सारेच मिळवतात. प्रामाणिकपणा कमवावा लागतो!'

job interview | Yashacha Password (Part 37) -  व्यक्तिमत्व (Personality)

प्रामाणिक व्यक्तिमत्त्व तुम्हाला यशाजवळ नेत असतं. त्यासाठी इतरांशी तितकंच स्वतःशी प्रामाणिक राहाणंही महत्त्वाचं असतं. मात्र हल्लीच्या स्पर्धायुगात निव्वळ गुण, प्रतिभा नि कौशल्य असून चालत नाही; तर आपलं हे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावीरीत्या लोकांपुढे सादर करणं ज्याला साधतं, तो यशस्वी होतो. पण यातून जे आहे त्याहून अधिक दाखवण्याचा अट्टहास केला जातो. चेहऱ्यावर दिखाऊपणाचे मुखवटे चढवले जातात. त्याने काही काळ माणसं फसतात. आकर्षित होतात. पण मुखवटे फार काळ चालत नाहीत; खरा चेहरा समोर येतो आणि अशी माणसं क्षणात लोकांच्या मनातून उतरतात, अपयशी ठरतात.

अस्सल यश मिळवायचं असेल, तर दिखाऊपणाचे मुखवटे धारण करण्यापेक्षा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चेहराच अंतरंगातून इतका निखळ निर्मळ बुलंद नि बलाढ्य बनवा की, त्या अस्सल चेहऱ्यापुढे मुखवटे फिके पडावेत. 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने