यशाचा पासवर्ड (भाग :33) - न्यूनगंड
कोणतीही बाह्यशक्ती नव्हे, तुमचा न्यूनगंडच तुम्हाला संपवतो..!
आपल्या आजूबाजूचं सर्वात वैभवशाली ठिकाण कुठलं? याचं उत्तर आहे-स्मशान, इथं माणसाचा फक्त शेवट होत नाही; तर यात काही अर्थ नाही असं म्हणून त्यांनी न केलेल्या गोष्टीही इथेच त्यांच्याबरोबर संपतात. एखादा चांगला शोध, एखादं काव्य, एखादा विचार, एखादी विलक्षण कल्पना, जी त्यांच्यात होती, पण निव्वळ न्यूनगंडामुळे त्यांनी बाहेर काढली नाही. निव्वळ त्यांचंच नव्हे; तर कदाचित जगाचंही त्यातून कल्याण घडलं असतं. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबरोबरच स्मशानात चिरनिद्रा घेत राहातात, माणसांच्या मनातले न्यूनगंड फक्त त्यांचाच नव्हे; सृष्टीचाही तोटा करतात.
मनात जोपासलेले नकारात्मक विचार म्हणजेच न्यूनगंड! कोकिळेचा रंग काळा; पण तिची वाणी मधुर आहे. आपला रंग काळा आहे. आपलं व्यक्तिम त्व प्रभावी नाही. आपण लोकांत उठून दिसू शकत नाही. या न्यूनगंडाने पछाडून कोकिळा स्वतः ला कोंडून घेत नाही. तिला माहिती आहे, आपली वाणी गोड आहे. ती तिचा वापर करत आपल्या गळ्याने सृष्टीला मोहित करते. वातावरण भारावून टाकते. कोकिळा लक्षात राहाते, ती तिच्या गाण्यामुळे! रंगामुळे नाही! आपल्यात जे नाही, त्याबाबतचा न्यूनगंड बाळगून शोक करण्यापेक्षा आपल्यात जे आहे, त्याचा विकास करा. सर्वोत्तम बना! तुमच्यात काय नाही, याकडे जगाचं लक्षही जाणार नाही.
विल्मा रुडॉल्फ ही वेळेच्या आधी जन्माला आलेली मुलगी. लहानपणीच तिला पोलिओ झाला. डॉक्टरांनी सांगितलं, यावर इलाज नाही. ती आता कधीच चालू शकणार नाही! हा आघात जबरदस्त होता. पण त्याहून जबरदस्त होती विल्मा! ती हरली नाही. खंत करीत बसली नाही. ताकद हरवलेल्या आपल्या पायांत तिने जीव ओतायला सुरुवात केली. नुसता विचार नव्हे; तिला स्वप्नंही पडू लागली, ती चालण्याचीच. दोन वर्षांनी ती कुबड्यांच्या आधाराने चालायला लागली. तर वयाच्या बाराव्या वर्षी कुबड्यांशिवाय। चौदाव्या वर्षी ती पळू लागली. सोळाव्या वर्षी तिने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला.
कांस्यपदक मिळवलं आणि १९६०च्या ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या शर्यतीत तीन सुवर्णपदकं मिळवून असा पराक्रम करणारी ती अमेरिकेतील पहिली महिला ठरली. लोकांना विश्वासच बसला नाही की, तिला पोलिओ झाला होता आणि ती आयुष्यात कधीच चालू शकणार नव्हती. पण तिला विश्वास होता की, ती नुसती चालणारच नव्हती; तर पळणार होती, धडधाकट जगालाही मागे टाकणार होती.
एक छोटंसं पोर. ज्याला बोलायची खूप इच्छा! त्याने शाळेतील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. बोलायला उभा राहिला. बोलू लागला आणि त्याचे चोचरे बोल ऐकून सारा वर्ग खो खो हसू लागला. त्याची टिंगल उडवू लागला, तो म लगा अपमानित होऊन खाली उतरला. पण आपण चोचरे-अडखळत बोलतो. आपण व्यवस्थित बोलू शकणार नाही, या न्यूनगंडाने तो पछाडला नाही. त्याने स्वतःला कमी लेखले नाही. तो प्रयत्न करू लागला. दूर माळावर जाऊन तोंडात गारगोट्या ठेवून तो मोठ्याने बोलू लागला. बोलत-बोलतच डोंगर चढ़-उतरू लागला.
तो 'डेमोस्थेनिस' जगप्रसिद्ध वक्ता झाला. जन्मजात शरीरदोष असणारी, हाता-पायाने धड नसणारी माणसं जर स्वतःच्या दुर्बलतेवर मात करून सर्वो त्कृष्ट बनत असतील, तर धडधाकट माणसांनी सर्वोत्तम व्हायला अडचण काय?
पण धडधाकट माणसं न्यूनगंडाने पछाडली जातात. कुवत असूनही कुवत नाही, असं समजून स्वतःचं खच्चीकरण करत राहातात. नकारात्मक विचारांच्या प्रभावाने सकारात्मक विचार करणंच सोडून देतात. एखाद्या संकटाने पायाखालची जमीन हलली, की आपण पडणार या भयाने आधीच कोसळून जातात. आत्मघात करून घेतात. आत्महत्या न्यूनगंडातूनच जन्म घेते. जगण्यात काही अर्थ नाही, असं म्हणत माणसं आयुष्यात अनर्थ घडवतात. आत्म हत्या म्हणजे आपल्यातील गुणांचा, कलांचा, कुवतीचा एकूण आयुष्याचाच लज्जास्पद अपमान नव्हे का? हे चुकीचंच! तितकंच न्यूनगंडाने आपण काही करू शकत नाही, असं म्हणत स्वत:च्या कुवतीचा उपयोगच न करता रोज थोडं थोडं मरत राहाणं, हेही लज्जास्पदच!
जे नाही त्यावर रडू नका, जे आहे त्यावर लढत राहा. मरत मरत जग नको. में रेपर्यंत भरभरून जगत राहा. हरत राहा-जिंकत राहा. नवी आव्हानं पेलत राहा! सारं असताना मिळवलेलं ते यश नसतं. काहीच नसताना मिळवलेलं ते खरे यश असतं..!