परिस्थितीकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला घडवतो | Yashacha Password (Part 32) - दुष्टिकोन(Standpoint)

यशाचा पासवर्ड (भाग :32) -दुष्टिकोन(Standpoint)

परिस्थिती तुम्हाला घडवत नाही परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन तुम्हाला घडवतो..!

प्रधानासमवेत बसलेल्या राजाला हातातल्या सुरीने अचानक कापलं. त्या भळभळत्या रक्ताच्या जखमेने राजा कळवळला. पण तोच प्रधान उदगारला, 'महाराज जे होतं ते चांगल्यासाठीच!' हे ऐकताच राजा भयंकर संतापला. मला झालेली जखम याला चांगली वाटते ? त्याने त्वरित आदेश दिला, या प्रधानाला अंधार कोठडीत टाका! प्रधानाची रवानगी कोठडीत झाली. 

त्याच दिवशी राजा शिकारीला गेला. जंगलात फसला आणि तिथल्या रानटी टोळीच्या हाती गवसला. त्या रानटी टोळीनी राजाचा बळी द्यायचं ठरवलं. राजाने विनवणी केली, 'अरे, असं बळी-बिळी देऊन कुणाचं भलं होत नसतं.' पण ते लोक रानटी असल्याने ऐकेनात. बळी द्यायची सज्जता झाली. पण त्याचवेळी त्यांच्या लक्षात आलं की, राजाला जखम झालेली आहे. त्या टोळीच्या नियमांनुसार जखमी माणसाचा बळी देता येत नसे. सबब राजाची सुटका झाली. तेव्हा राजाला पटलं, प्रधान म्हणत होता तेच खरं. 

त्यानं प्रधानाची तातडीने सुटका केली. कोठडीत टाकल्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यावर प्रधान पुन्हा उत्तरला, 'महाराज, जे होतं ते चांगल्यासाठीच!' राजाला कळेना. त्याने विचारलं, प्रधानजी, कोठडीत जाणं चागलं कसं ? तेव्हा प्रधान म्हणाला, 'महाराज तुम्ही मला कोठडीत टाकलं नसतं, तर मला शिकारीसाठी तुमच्या सोबत यावं लागलं असतं. आणि मी सोबत असतो, तर त्या रानटी टोळीनी जखमी म्हणून तुम्हाला सोडलं असतं, पण मग त्यावेळी माझा बळी दिला असता. मी कोठडीत होतो. म्हणूनच बचावलो; मग कोठडीत जाणं माझ्यासाठी चांगलंच घडलं ना ?' 

प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक परिस्थितीत चांगलं शोधत जाणं म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन. हा सकारात्मक दृष्टिकोनच आशावादाला जन्म देतो. वाईट गोष्टीपेक्षा चांगल्याच गोष्टी घडतील, अशी अपेक्षा ठेवण्याची वृत्ती म्हणजे आशावादी/ अशी माणसंच यशस्वी होतात. सातत्याने चांगल्याच्या दिशेने पुढे जात राहातात. 

abraham lincoln | Yashacha Password (Part 32) - दुष्टिकोन(Standpoint)

 

अब्राहम लिंकन दोन वेळा व्यवसायात पुरता बुडाला चार बेदा निवडणुकीत सपशेल हरला, पण तरीही सातत्याने म्हणत राहिला 'माझा आज कसाही असेल, पण माझा उद्या नक्कीच महान आहे.' लिंकनचा हा आशावाद। त्याला पराभवानं न हरणारा, विजयाचीच माळ गळ्यात घालणारा ठरवून गेला. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. तुम्ही आशावादी व्हायचं की निराशावादी, हे तुमचा दृष्टिकोन ठरवतो. 

तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना तुम्ही कसे सामोरं जाता; घडल्या घटनांकडे कसं बघता; कसा विचार करता आणि त्यावर काय कृती करता ? या साऱ्याचं एकत्रीकरण म्हणजे दृष्टिकोन तो सकारात्मकही असू शकतो आणि नकारात्मकही! तुमचा दृष्टिकोनच तुम्ही यश मिळवणार की अपयश, हे ठरवत असतो. बऱ्याचदा आयुष्यात अशा घटना घडतात, ज्या तुम्ही बदलू शकत नाही. काही सत्यं अशी असतात की, ती बदलता येत नाहीत. पण या वस्तुस्थितीवर तुमचा दृष्टिकोन मात करू शकतो.

दृष्टिकोन बाहेरून मिळवता येत नाही, तो आतून घडवावा लागतो. तो सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या आयुष्याची गुणवत्ता बदलतो. स्वप्न सत्या उतरवतो. तुमच्याबरोबर घडणाऱ्या, आजूबाजूला होणाऱ्या गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकत नाही. पण त्याची प्रतिक्रिया म्हणून तुमच्या आत घडणाऱ्या गोष्टी नियंत्रित करू शकता. एखाद्याने कसं चाललंय तुमचं? असं विचारल्यावर तुम्ही काय उत्तर देता, यावर तुमचा तुमच्याकडे, तुमचा उद्याकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कळतो. मस्त चाललंय! उत्तम! छान! ग्रेट! असे तुमचे उद्गार तुम्हाला तसेच घडवत जातील. तर अवघड आहे! कशाचे काय? काही खरं नाही! हे नकारात्मक उद्गार तुम्हाला त्याच दिशेने नेतील. 

परिस्थिती तुम्हाला घडवत नाहीत. परिस्थितीकडे  पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन तुम्हाला घडवतो. वाईट शोधत राहाण्यापेक्षा चांगलं ते शोधा. प्रत्येक प्रसंगाचे नकारात्मक पौलू बघणं, हा निराशावादी दृष्टिकोन बाजूला करा. कारण जीवसृष्टीचं पोषण करणारा चैतन्यदायी पाऊस आल्यावर चिखलाची तक्रार करणारे कायम त्याच दलदलीत अडकून राहातात, तर या पावसानंतरच इंद्रधनुष्य उमटणार आहे. रात्रीच्या काळोखातून तेजस्वी सूर्य प्रकटणार आहे, हे जाणणारे यशाच्या रंगप्रकाशाची उधळण करतात!

नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने