यशाचा पासवर्ड (भाग :31) - नशिब (Luck)
भविष्य तळहातावरच्या रेषांवर नाही मनगटांच्या पराक्रमावरच घडवता येतं..!
नशीब ही मोठी गमतीदार गोष्ट आहे. ती आस्तित्वात नसतानाही बहुतेकांचा स्वतःपेक्षा नशिबावर जास्त विश्वास असतो. म्हणूनच एखादी हवी ती गोष्ट मिळाली नाही, अपयश आलं की, माणसं उद्गारतात, 'आमच्या नशिबातच नव्हतं!' किंवा एखाद्याला काहीही न करता एखादी गोष्ट हवी असेल, तर तो उद्गारतो, 'असेल नशिबात तर मिळेल!' नशिबावर अवलंबून असलेली वा नशिबावर विश्वास असलेली माणसं कधीच यशस्वी होत नाहीत. तुम्ही बसलेले असताना तुमचं नशीब कधीच हलणार नाही. तुम्ही बदलल्याखेरीज तुमचं नशीब बदलणार नाही.
ज्यांचा स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असतो, तीच माणसं स्वत:चंच नव्हे तर इतरांचंही जग घडवतात. जन्माला येताना कोणाच्याही सोबत कोणाचं नशीब लिहून येत नाही. कर्तृत्ववान माणसं स्वतःचंच नशीब स्वतःच्या हाताने लिहितात. जी लिहीत नाहीत, त्यांचे कर्तृत्वफळे कोरेच राहातात. मग तीच पुटपुटतात, आमच्या नशिबातच नव्हतं हो ! ही शुद्ध पळवाट आहे.
संकटं येतात. परिस्थिती बदलते. माणसं खचतात. पण खचूनही जी स्वतः वरचा विश्वास गमावत नाहीत, ती यशस्वी ठरतात. जी स्वतःवरचाच विश्वास गमावतात, ती अपयशी होतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर टोकियोमधील पुरत्या उद्ध्वस्त झालेल्या आणि जळालेल्या दुकानातील वीस लोक आपल्या भग्न वर्तमानाकडे पाहून पुरती हादरली होती. आता पुढे काय ? हा एकच प्रश्न त्यांना सतावत होता. झालेल्या हानीने माणसं खचली होती. पण मनाने उद्ध्वस्त झाली नव्हती. त्यांचा स्वत: वरचा विश्वास कायम होता. त्यांनी ठरवलं. त्या राखेतूनच भरारी मारायची. निव्वळ आपल्या पुरतीच नव्हे; तर या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या लोकांना संजीवनी देणारी, त्यांना पुन्हा उभे करणारी गोष्ट निर्माण करायची! जपानमधील या उद्याची उज्ज्वल स्वप्नं पाहाणाऱ्या लोकांकडे पुरेशी साधनसंपत्ती-नैसर्गिक अनुकूलताही नव्हती. पण त्यांचा स्वतःवर आणि स्वतः च्या श्रमांवर विश्वास होता. या विश्वासावरच त्यांनी त्या राखेच्या ढिगाऱ्यावर सोनी' कंपनीची स्थापना केली.
ती सोनी कंपनी आज जगाच्या बाजारपेठेवर राज्य करते आहे. उज्ज्वल नि यशस्वी भविष्य त्यांच्याच वाट्याला येतं, ज्यांचा दुसऱ्यांवर नव्हे; तर स्वत: च्या कर्तृत्वावर विश्वास असतो. पण परिस्थितीने खचलेली माणसं नशिबाला बोल लावत बसतात. ती मानायलाच तयार नसतात की आपलं अपयश नशिवाने नव्हे; आपल्या प्रयत्नात राहिलेल्या त्रुटीमुळे आलंय. अशी नशिबावर भरोसा ठेवणारी माणसं मग नशीब सांगणाच्याच्या दारावर धडका मारतात. त्यांच्या समृद्धीचं दार त्या धडकांनी उघडत तर नाहीच, पण ते स्वत:चं मस्तक मात्र दुसऱ्याचं हस्तक बनवून रक्तबंबाळ करून घेतात.
राजर्षि शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी आला. मी साऱ्या विद्या जाणतो. मी आपलं अचूक भविष्य सांगतो. असं तो राजर्षीना सांगू लागला. त्याला थांबवत राजर्षी म्हणाले, माझं भविष्य नंतर बघू. आपण जर एवढे भविष्यज्ञानी आहात, तर मला तुमचंच आजचं भविष्य सांगा?
तसा तो ज्योतिषी म्हणाला, 'महाराज, आज माझा दिवस अत्यंत शुभ आहे. मान-मरातब-सन्मान मिळण्याचा आज मला योग आहे. अत्यंत आनंदी असा माझ्यासाठी हा आजचा सर्वोत्तम दिवस आहे!
एवढं ऐकलं नि राजर्षि कडाडले, या ज्योतिष्याला ताबडतोब इथंच चाबकाचे पन्नास फटके मारा!
जोतिषी गयावया करत राहिला, पण त्याला चाबकाचे पन्नास फटके पडले आणि मग राजर्षी म्हणाले, 'ज्योतिषीबुवा आज तुमच्यासाठी मान-मरातब- सन्मानाचा शुभ दिवस होता. मग? तुमचं भविष्य खोटं कसं ठरलं?' ज्योतिषी फक्त मान खाली घालून चुळबुळत राहिला. राजर्षि म्हणाले, 'ज्याला स्वतःचं पुढच्या क्षणाचं भविष्य माहिती नाही, तो इतरांच्या आयुष्याचं भविष्य काय सांगणार? इतरांचं नशीब घडवणारे तुम्ही तुमचं नशीब घडवायचं सोडून दारोदार असे दक्षिणेच्या गिन्न्या गोळा करत हिंडला नसता!'
लक्षात असू द्या. भविष्य तळहातांवरच्या रेषांवर नाही. मनगटाच्या पराक्रम वरच घडवता येतं. नशिबावर हवाला ठेवण्यापेक्षा स्वतःवर भरोसा ठेवा.
कर्तृत्वावर विश्वास ठेवा. यश मिळेलच!