नियोजनच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतं! | Yashacha Password (Part 30 ) - नियोजन ( Planning)

यशाचा पासवर्ड (भाग :30) -नियोजन( Planning)

यश हा अपघात नाही. सर्वोत्तम नियोजन अन् त्यानुसार कृती यांचा तो परिणाम असतो..!


तुम्ही काम किती नि कसं करता यावर तुमच्या कामाची यशस्विता ठरत नाही. तुम्ही कामाचं नियोजन कसे करता, यावरच तुमचं यश ठरतं. खरं तर, प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा त्या कामाचं नियोजनच तुमच्या पदरात अर्ध यश टाकत असत. उत्तम नियोजन ही सर्वोत्तम यशाची गुरूकिल्ली असते! 

 

Yashacha Password (Part 30 ) - नियोजन ( Planning)

घर बांधायचं तर आपण आपल्या स्वप्नातल्या घराची कल्पना घेऊन एखाद्या वास्तुरचनाकाराकडे जातो. तो आपल्या गरजेप्रमाणे कल्पनेचा पिसारा फुलवत एक देखणं घराचं रूपडं आपल्यापुढं सादर करतो. आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेत काही बदल सुचवत आपण ते पसंत करतो. वास्तूरचनाकार मग अगदी खोलवर काम सुरू करतो. घराचा नकाशा तयार होतो. वास्तू कागदावर उतरते. मग त्या नियोजनानुसार ती प्रत्यक्षात साकारली जाते. आपण दगडामातीचं घर बांधायचं, तर त्याचं इतकं नियोजन करतो. मग आपली 'आयुष्य' नावाची इमारत उभी करण्यासाठी, ती देखणी, सर्वोत्तम आणि यशस्वी बनवण्यासाठी किती नियोजन करावं लागेल? यशस्वी ती माणसं होतात, जी आयुष्याचं उत्तम नियोजन करतात!

भरपूर काम करायचंय. पण आपल्याकडे वेळ नाही, असं सांगून माणसं आपल्या यशाची दारं बंद करून घेतात. तर उपलब्ध वेळेचं उत्तम नियोजन नि व्यवस्थापन करून कर्तृत्ववान माणसं यश आपल्याकडे खेचून घेतात. मोठी  मणसं ती होतात, जी कामापूर्वीच कामाच्या यशस्वीतेचं अचूक नियोजन करतात. उत्तम नियोजन तुमचा वेळ, तुमचे कष्ट वाचवत असतं. तुम्ही कधी मोठा माणूस सुट्या पैशांसाठी कुणाशी वाद घालत असताना पाहिलाय का ? ते मोठे आहेत, म्हणून त्यांना सर्वसामान्यासारख्या समस्या येत नाहीत, असं नव्हे. तर सामान्य माणसं या साध्या गोष्टीचं नियोजन करत नाहीत; तर मोठी मायाम पवार पडण्यापूर्वीच परत येईपर्यंतचं सारं नियोजन करून बाहेर पडतात. मणन त्यांना या समस्या सतावत नाहीत. त्यांच्या मोठेपणाचे हेच तर गमक आहे.

अनेक माणसं नियोजन खूप करतात. वर्षारंभी वर्षाच वेळापत्रक सजवतात. पण हे वेळापत्रक कागदावरच राहातं. ते प्रत्यक्षात कधीच येत नाही. यशस्वी होण्यासाठी केवळ नियोजन नको. त्याची काटेकोर अंमलबजावणी हवी. केलेलं नियोजन राबवण्याची सवय हवी. सवय अंगी बाणवता येते. ती नियोजनानुसार घडवता येते. या सवयीच माणसावर राज्य करतात. सवयीच माणसाला घडवतात आणि बिघडवतातही! उत्तम नियोजन करणारी माणसं वाईट सवयींना आपल्यावर स्वार होऊ देत नाहीत. ती नियोजनावर स्वार होऊन सवयी घडवतात. सवयी वाईट असतील तर परिणाम वाईटच होतील.

बी पेरूचं असेल तर आंबे कसे येतील?

नियोजन ही पेरणी असते. ती झाली की मग यशाची पिकं येतात. अपयशी लोक नियोजनच करत नाहीत. केलं तरी त्याची अंमलबजावणी सवयीने टाळतात. यश हा अपघात नाही. सर्वोत्तम नियोजन आणि त्या नियोजनानुसार चिकाटीने आणि सातत्याने मार्गक्रमण यांचा तो परिणाम असतो.

तुमच्याकडे फारसं काही नसलं तरी चालेल, पण जेवढं आहे त्याचा अचूक वापर करण्याचं नियोजन असेल, तर तुम्ही यश मिळवताच! 

छत्रपती शिवरायांकडे अफाट संपत्ती नव्हती. बलाढ्य सैन्यबळ नव्हतं, की प्रचंड सामर्थ्यही नव्हतं. पण तरीही त्यांनी बलाढ्य शत्रूला पराभूत केलं. शून्यातून विश्व उभारलं. याचं कारण एकच अचूक आणि सर्वोत्तम नियोजन! अफझलखान नावाचं विलक्षण धोकादायक वादळ स्वराज्याच्या क्षितिजावर घोंगावू लागलं. पण त्याने स्वराज्यात पाऊल ठेवण्याअगोदरच महाराजाचं नियोजन चालू झालं. खानाचं संकट प्रत्यक्ष भेटीत महाराजांनी काही मिनिटांत संपवलं! पण या काही यशस्वी मिनिटांसाठी त्यांचं त्याआधी तब्बल एक वर्ष नियोजन चालू होतं! ज्या माणसांना भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी असते आणि त्याबरहुकूम नियोजन करण्याची हिकमत आणि हुकुमत ज्यांच्या ठायी असते, तीच माणसं यशस्वी होतात! ध्येयाच्या अचूक स्थळी पोहोचायचं, तर प्रवास सुरू करण्याआधीच अचूक नियोजन हवं. नियोजनच तुम्हाला यशापर्यंत पोहोचवतं! 

नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने