फक्त बोलणारे नव्हे; करणारे व्हा ! | Yashacha Password (Part 29 ) - उच्चार

 यशाचा पासवर्ड (भाग :29) -उच्चार 

स्वातंत्र्य नसणं ही शोकांतिका नव्हे... स्वातंत्र्य मिळूनही त्याचा अर्थ न कळणं, ही खरी शोकांतिका..!

नदीच्या काठावर राहाणाऱ्या एका साधूच्या झोपडीत एक पाहुणा मुक्काम ला आला. सकाळी त्याला जाग आली ती...स्वातंत्र्य... स्वातंत्र्य असे सातत्याने शब्दोच्चार कानी पडल्याने! त्याला कळेना, जो साथू स्वतः मुक्त स्वातंत्र्याचा अनुभव घेतो आहे, त्याच्या इथे पारतंत्र्यात कोण आहे ? 

तो आवाजाच्या रोखाने आला, तेव्हा बाहेरच्या पिंजऱ्यातील पोपट स्वातंत्र्य स्वातंत्र्य असा पुकारा करताना त्याला दिसला. त्याला आश्चर्य वाटलं, स्वातंत्र्याची अपेक्षा करणारा हा पोपट साधूने पारतंत्र्यात का ठेवावा? त्याने निश्चय केला, या पोपटाला स्वातंत्र्य द्यायचं. त्याने पोपटाला मुक्त करण्यासाठी पुढे होत त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. त्याची अपेक्षा होती की, आता झटकन पोपट बाहेर पडेल. पण नाही! पोपट आतच फिरत राहिला. मात्र मुखाने स्वातंत्र्याचा घोष चालूच!



पाहुण्याला काही कळेना. त्याने विचार केला. कदाचित पिंजऱ्यात राहाण्याच्या सातत्याच्या सवयीने पोपटाला बाहेर पडायचं सुचत नसावं, म्हणून आपणच त्याला बाहेर काढून सोडून द्यावं, या विचाराने त्याने सरळ पिंजऱ्यात हात आत घातला, तोच त्या पोपटाने त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला. 

त्याचा हात रक्तबंबाळ झाला. त्या वेदना सोसतच त्याने पुन्हा विचार केला, कदाचित आपला हेतू पोपटाला कळला नसावा. पण तो स्वातंत्र्याचा घोष करतोच आहे; तर त्याला ते दिलंच पाहिजे. म्हणून त्याने त्याच रक्ताळल्या हाताने पोपटाला बाहेर काढलं आणि मोकळ्या आकाशात सोडून दिलं. स्वातंत्र्य-स्वातंत्र्य असा घोष करीत पोपट उडाला. पाहुण्याला समाधान वाटलं. पोपटाला स्वातंत्र्य हवं होतं ते आपण दिलं, असा विचार करत तो हाताची जखम बांधण्यासाठी आत वळला.

जखम बांधून बाहेर आला, तर पुन्हा त्याच्या कानावर शब्द पड़ले, स्वा स्वातंत्र्य! त्याने आश्चर्याने पाहिलं. पोपट पुन्हा पिंजऱ्यात येऊन बसला होता आणि त्याचा पुकारा चालू होता, स्वातंत्र्य...स्वातंत्र्य! पोपट फक्त उच्चाराचाच धनी होता. त्याच्या उच्चारात त्या अर्थाचा विचार नव्हता. त्याच्या उच्चारावर कृतियुक्त आचाराचा साधा स्पर्शही नव्हता. स्वातंत्र्य नसणं ही शोकांतिका नाही. स्वातंत्र्य मिळूनही त्याचा अर्थ न कळणं, ते वापरता न येणं ही सी शोकांतिका आहे. अशा शोकांतिकेत जगणारे असंख्य 'पोपट आजूबाजूला आहेत. ज्यांचा फक्त घोष चालू असतो. स्वातंत्र्य हवं आहे समता हवी आहे. यश हवं आहे. पण फक्त उच्चारांनी, उद्घोषांनी सारं लाभत असतं, तर सारेच घडले' असते. 

बिघडलेलं दुरुस्त करण्याची ताकद फक्त कृतीत असते. माणसं तेवढंच करत नाहीत. त्यांच्या कंठरवाने व्याकुळ झालेले परिवर्तनाचे शिलेदार त्यांना घडवायला पुढे सरसावतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी स्वत:चे हातही रक्तबंबाळ करून घेतात. पण हे पुन्हा पिंजऱ्यातच स्वतःला कोंडून घेण्यात धन्यता मानतात. मात्र पुन्हा स्वातंत्र्याचा घोष चालूच! 

घोड्याला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी प्यायला लावता येत नाही. ती इच्छाशक्ती घोड्याकडेच हवी. ध्यानात हे घ्यायला हवं की, आपल्या यशाचं दार बाहेरून कुणी उघड शकत नाही. ते आपलं आपल्यालाच आतून उघडावं लागतं. आधी स्वतःला आतून बदलावं लागतं; तरच बाहेरचं जग बदलते! बदल नुसता उच्चाराने नाही; तर आचाराने करावा लागतो. शब्दात त्यासाठी अर्थगर्भ विचार पेरावा लागतो. 

तुमच्या उच्चारांना विचारांचं, कृतीचं, ती करण्याच्या तीव्र इच्छाशक्तीचं कोंदण द्या. शब्द शस्त्र होतील. बदल घडवता येतील! रस्त्यात एखादा अपघात झालेला असतो. रक्तात न्हालेला एखादा तडफडत असतो. आम्ही शेजारून जातो. त्याच्याकडे पाहातो. चू...चू.. करतो आणि मदत न करताच सरळ पुढे निघून जातो. इतर वेळी छाती काढून सांगतो, भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत! अरे, मग मघाशी तडफडणारा तो बांधवच होता ना? फक्त बोलाची कढी...बोलाचाच भात ? आम्ही प्रतिज्ञा म्हणणारे पोपट फक्त; कृती काही नाही! 

असं वागू नका! यश मिळवायचं असेल, तर नुसता उद्घोष, जयजयकार, उच्चार नको. कृतिशील व्हा. फक्त बोलणारे नव्हे; करणारे व्हा! तरच यशाच्या आभाळात भरारता येईल. नाहीतर हक्काचा पिंजरा आहेच! 

नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने