लक्षात ठेवा, तुमचे कौशल्यच तुम्हाला वाचवतं आणि टिकवतंही!! | Yashacha Password (Part 28 ) - Skills

 यशाचा पासवर्ड (भाग :28) -  कौशल्य (Skills)

आत्मसात केलेलं कुठलंही कौशल्य कधीच वाया जात नाही..!


एक तरुण झाडे तोडण्यासाठी गेला. पहिल्या दिवशी त्याने पाच झाड तोडली. दुसऱ्या दिवशी तीन; तर तिसऱ्या दिवशी दोनच! त्याला कळेना मी कष्ट तर तेवढेच करतोय. मग झाडं कमी-कमी का तोडली जाताहेत ? त्यानं मालकाला सल्ला विचारला, 'हे असं का होतंय?

मालकाने विचारलं, 'तू तुझ्या कुन्हाडीला धार लावली आहेस का ?' तरुणाने उत्तर दिलं, नाही! तसा मालक म्हणाला 'तेच तर तुझ्या ढासळत्या कार्यक्षमतेचं कारण आहे. नुसतेच प्रचंड परिश्रम नकोत. कुन्हाडीला धार लावण्याचे कौशल्यही हवं. तरच तुझे कष्ट कारणी लागतील!'

AXE Yashacha Password (Part 28 ) - Skills


जे काम करायला इतरांना आठ तास लागतात तेच काम काही. माणसं अगदी दोन तासांत करून मोकळे होतात. यापाठीमागे असतं त्यांचं काम करण्याचं नावीन्यपूर्ण कौशल्य! सातत्याने एकाच क्षेत्रात तुम्ही कार्यरत राहिलात. त्याच आणि त्याच गोष्टीभोवती तुमची सारी ऊर्जा एकत्रित केलीत, तर हे कौशल्य कमावता येतं. बुद्धिकौशल्याचा वापर करून जी माणसं काम करतात, ती कायम इतरांच्या पुढे असतात.

एका व्यक्तीला चालता-चालता एक खडा दिसला. तो भलताच चमकत होता. त्याने तो उचलला आणि एका रत्नपारख्याकडे नेऊन दाखवला. विचारलं, हा हिरा आहे का?' तो रत्नपारखी म्हणाला, 'आता तो पाहायला मला वेळ नाही. तो खडा इथं ठेवून जा. मी तो तपासून आठवड्याभराने सांगतो.' तो व्यक्ती तो खडा ठेवून तिथून निघाला. पण त्याचं मन स्वस्थ बसू देईना. तो खरंच हिरा असेल का? या उत्सुकतेपोटी त्याने हिऱ्याबद्दलची माहिती देणारी सारी पुस्तकं वाचून काढली. पूर्ण अभ्यास केला. हिरे ओळखण्याचं कौशल्यच त्याने आत्मसात केलं. आठवड्याभराने तो त्या रत्नपारख्याकडे जाऊन म्हणाला, 'मला माझा तो हिरा देताय ना?' त्याच्या या तो हिराच आहे या आत्मविश्वासपूर्ण बोलण्याने तो रत्नपारखी जराही चकित ! झाला नाही. तो म्हणाला, 'मला माहिती होतं. या आठवड्याभरात तू हिन्याचा सारा अभ्यास करशील. तूच जाणता होशील. म्हणूनच मी तुला आठवड्याभराने ये म्हणालो. आता तुला कुणीही फसवू शकणार नाही!"


हिरा असो वा आयुष्यातील कुठलीही गोष्ट, ती ओळखण्याची, करण्याची कौशल्यं आत्मसात केली, तर इतरांवर अवलंबून राहाण्याची वेळ येत नाही. आपणच तज्ञ झाल्याने कुणाच्या सल्ल्यासाठी थांबून राहाण्याचे अडथळेही सतावत नाहीत. कौशल्य आपल्याला सत्य तपासून देतं. कृतिशील कार्य अधिक वेगवान करण्याचं सामर्थ्य देतं. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. तुमच्या क्षेत्रापुरतीच नव्हे तर जेवढी भेटतील, वाटतील तेवढी कौशल्यं आवा सात करा. आत्मसात केलेलं कुठलंही कौशल्य कधीच वाया जात नाही ते कधी ना कधी, कुठे ना कुठे उपयोगी पडतंच! माझं कार्यक्षेत्र समुद्र नव्हे त्यामुळे मला पोहणे शिकायची गरजच नाही, असं म्हणणं म्हणजे आयुष्यात कायमचा स्वत:ला पाण्यापासून धोका निर्माण करून ठेवण्यासारखं!

एक गजरेवाला गजरे विकत होता. पण त्याचं गजरे विकायचं कौशल्य विलक्षण होतं. तो जोरजोरात येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होता, गजरा घ्या, एक महिना सुकणार नाही! ओ ताईऽ गजरा घ्या. एक महिना सुकणार नाही! गजरा एक महिना सुकणार नाही, या त्याच्या बोलांनी स्त्रिया झटपट तिकडे वळायच्या अन् लगेच गजरा घेऊन टाकायच्या. त्याचं हे गजरे विकायचं कौशल्य वादातीत होतं.

त्याचवेळी एक मॅडम समोरून जाताना तो त्यांना गजरा घ्या एक महिना सुकणार नाही! म्हणाल्या, 'ओ मॅडम,

तशा त्या मॅडम उद्गारल्या, 'अरे, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे! मॅडमच्या या बोलांनी गजरेवाला जागीच गारद झाला.

या दुनियेच्या बाजारात , तुम्ही गजरे विकणार असाल, तर गजरेवाल्याचं हे विलक्षण कौशल्य तुमच्याकडे हवंच. मात्र जर गजरे घेणारे तुम्ही असाल, तर गजरेवाल्याच्या कौशल्यावर मात करणारं कौशल्यही तुम्ही मिळवायला हवं!

लक्षात ठेवा, तुमचे कौशल्यच तुम्हाला वाचवतं आणि टिकवतंही!!


नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने