यशाचा पासवर्ड (भाग :36) - लोकसंग्रह
माणसं जोडा... जग आपोआपच जोडलं जाईल..!
माँसाहेब जिजाऊ कामाच्या गडबडीत होत्या. छोटे शिवबा त्यांच्या मागे मागे काही हट्ट धरून फिरत होते. माँसाहेबांच्या लक्षात आलं की, शिवबांना एखाद्या कामात गुंतल्याशिवाय ते आपल्याला स्वस्थतेने काम करू देणार नाहीत. शेजारी .जगाचा नकाशा होता. माँसाहेबांनी तो घेतला. क्षणात फाडला. त्याचे तुकडे केले. ते तुकडे शिवबांकडे दिले आणि सांगितलं, शिवबाराजे, इथे बसा आणि हा जगाचा नकाशा मला पुन्हा जोडून दाखवा! शिवबाराजे ते नकाशाचे तुकडे घेऊन जोडायला बसले. माँसाहेबांनी विचार केला. आता शिवबाराजे किमान तासभर तरी त्रास देणार नाहीत. त्या आपल्या कामाला लागल्या. पण पाचएक मिनिटंच झाली तोच, शिवबाराजे धावत आले. म्हणाले, माँसाहेब. नकाशा जोडून झाला! माँसाहेबांना आश्चर्य वाटलं. हे कसं शक्य आहे?
जगाचा नकाशा जोडायचा, तर प्रांतन् प्रांत; देशन् देश; नद्या-समुद्र सारं माहिती हवं. हे इतक्या लवकर जोडणं कसं शक्य होईल ? माँसाहेबांनी आश्चर्याने तो जोडलेला नकाशा बघत शिवबाराजेंना विचारलं, शिवबाराजे, इतक्या जल्द कसं साधलंत हे ? तसं शिवबाराजे म्हणाले, 'माँसाहेब, तुम्ही ज्या नकाशाचे तुकडे आम्हाला दिलेत, त्या तुकड्यांच्या पाठीमागे एका माणसांचं चित्र होतं. आम्ही आधी मागचं ते माणसाचं चित्र जोडलं. उलटून बघितलं, तर जग आपोआपच जोडलं गेलं होतं!'
आणि चकित माँसाहेब उद्गारल्या, 'खरं आहे. माणसं जोडाल तर जग आपोआपच जोडलं जाईल, शिवबाराजे!'
शिवरायांनी या संस्कारातूनच तर स्वराज्य घडवलं.
माणसं जिंकता आली तर सारं जग जिंकता येतं. यशस्वी माणसाच्या यशाचं हे रहस्य आहे. तुमच्यासोबत तुम्ही जोडलेले सहकार्याचे हात उदंड असतील, तर प्रचंड नि अखंड कार्य करता येईल. ध्येय गाठता येईल. मात्र हातात हात देण्याऐवजी पायात पाय घालणारी, पदोपदी अडथळे उभी करणारी माणसं असतील, तर तुमची बरीचशी शक्ती त्यांना बाजूला करण्यातच खर्ची पडेल. मग यश लांबत जाईल. ध्येय गाठणं अशक्य होईल.
अफाट लोकसंग्रह हे अनेकांच्या यशाचं सूत्र असतं. हा लोकसंग्रह आपल्या लोकप्रियतेतून मिळवता येतो. मात्र ही लोकप्रियता कमवावी लागते. जाणीवपूर्वक घडवावी लागते. परिपूर्ण व्यक्तिमत्त्व म्हणजे निव्वळ आकर्षकपणा किंवा अफाट बुद्धिमत्ता नव्हे. तर नम्र, मृदू बोलणं, गोड वागणं, ससंस्कृत आणि गौरवपूर्ण व्यवहार करणं. इतरांचा सन्मान-आदर करत त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं, या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
राजा असो वा रंक असो, साऱ्यांशीच अगदी प्रसन्नतेनं, मोहक वागणाऱ्या, नम्रपणाने बोलणाऱ्या, जिथं जाईल तिथं सळसळता उत्साह निर्माण करणाऱ्या व्यक्ती लोकांच्या आवडत्या बनतात. मग तुमच्याकडे सौंदर्य असो वा नसो. संपत्ती असो वा नसो. काही फरक पडत नाही. अशा व्यक्तिमत्त्वांना जाईल तिथे सन्मान मिळतो. याउलट कडू चेहरा, रागीट स्वभाव, खोचक-उपरोधिक बोलणं या गोष्टी त्या व्यक्तीकडे असणाऱ्या त्याच्या शक्तीवर, आणि विद्वतेवरही पाणी फिरवतात. योग्यता असूनही ते मागे पडतात. खोचक बोलण्याने, फटकून वागण्याने मित्र तुटतात. लांब जातात. मग मिळून-मिसळून काम होत नाही. चांगल्या विचारालाही पाठीराखे मिळत नाहीत. महान बनण्याची क्षमता असूनसुद्धा निव्वळ वागण्यातील त्रुटी माणसांना अपयशी बनवतात.
आपण लोकप्रिय असावं, साऱ्यांना आवडावं, असं साऱ्यांना वाटतं. मात्र मौल्यवान गोष्टीसाठी किंमतही तशीच मोजावी लागते. जाणीवपूर्वक स्वतः ला घडवावं लागतं. यशस्वी होत कीर्ती मिळवायची असेल, उद्देशाची सिद्धी साधायची असेल, तर माणसं जोडण्याची कला शिकावीच लागेल. सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्त्वासाठी कष्ट घेतलेच पाहिजेत. दुसऱ्यांना आकर्षित करण्याचं कौशल्य शिकणे अथवा इतरांना आवडण्यासारखं स्वतः घडणे, हे जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नांनीच शक्य आहे.
गौरवशाली व्यक्तिमत्त्वासाठी सावधपणा, सतर्कता अंगी बाणवावी लागेल. लोकांनी तुमचं ऐकावं, यासाठी लोकांचं आधी तुम्हाला उत्तमपणे ऐकावं लागेल. इतरांनी आपल्याशी जसं वागावं असं आपल्याला वाटतं, तसं आपण जगाशी वागावं लागेल.