यशाचा पासवर्ड (भाग :46) - चारित्र्य (Character)
चारित्र्य हेच माणसाचं 'चरित्र' घडवत जातं..!
अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून गेलेल्या एका युवतीने स्वामीजींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तो क्षण मोहाचा होता. पण स्थिरवृत्तीच्या आणि ध्येयाकडे केंद्रिभूत झालेल्या विवेकानंदांनी तिला शांतपणे विचारलं, 'तुम्हाला माझ्याशी लग्न का करायचं आहे?' यावर ती युवती म्हणाली, 'मला तुमच्यासारखा बुद्धिमान, विद्वान नि राजबिंडा पुत्र हवाय!' हे ऐकताच स्वामीजी झटकन् खाली झुकले त्या युवतीचे पाय धरत म्हणाले, 'मग आई. आजपासून मलाच आपला मुलगा मान ना!' स्वामीजींची ही निष्क्रीय शालीनता नव्हती, तर त्या युवतीलाच उदात्त आईपणाचा गौरव बहाल करणारी ती कृतिशील चारित्र्यशीलता होती. मोहाचे क्षण समोर येऊनही त्याला शरण न जाता स्थिरवृत्तीने आपल्या भावनांचं संघटन करीत कोणत्याही आमिषाला वा चुकीच्या गोष्टीला बळी न पडता आपल्या ध्येयप्राप्तीकडे झेपावणं म्हणजे चारित्र्यशीलता जोपासणं. स्वामीजींचं तेच मोठेपण होतं.
चारित्र्य हेच माणसाचं चरित्र घडवत जातं. हे चारित्र्य घडवता येतं. काही संस्कार तत्त्वांच्या आधाराने माणसांच्या भावनांना आकार देऊन त्यांना स्थिर करणारे संस्करण म्हणजे चारित्र्य! ज्या माणसांकडे उत्तम उदात्त-मंगल विचार संस्कारांचं भावसंघटन असतं, त्यांना चारित्र्य लाभतं. मात्र ज्यांच्यावर संस्काराचा प्रभाव नसतो, ज्यांच्याकडे विचारांचा अभाव असतो. ज्याच्या जीवनाला स्पष्ट ध्येयाची, ते गाठण्याची उर्मी नसते. कोणत्याही मोहाच्या क्षणाने ते प्रवाहपतित होतात. पैशाच्या स्वार्थापायी जे कशालाही वश होतात. व्यसनी, वासनांध जे कशावरही भाळतात. काही मिळवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. सद्भावना, सद्विचार, समता मानवता जे पदोपदी ठोकरतात. ते सारं चारित्र्य हिनतेच्याच प्रकारात मोडतात. माणसाचं चारित्र्य त्याचं वैयक्तिक आयुष्य घडवतं तसं अशा माणसांच सामूहिक चारित्र्य राष्ट्राचं चरित्र घडवत असतं. म्हणूनच राष्ट्र घडवायचं तर इथल्या प्रत्येकाच्या चारित्र्याची बांधणी करणं गरजेचं! चारित्र्यवान माणसं घडवणारं शिक्षण त्यासाठी महत्त्वाचं ठरतं. शिक्षणातून भावप्रवृत्ती विकसित करता येतात. आग लागणं आणि आग विझवणं या दोन्ही प्रवृत्तीच आहेत. पण माणसांच्या भावना कोणत्या प्रवृत्तीवर स्थिर होतात आणि त्या कोणत्या प्रवृत्तीला सर्वो त्तम मानतात यावर चारित्र्य ठरतं. निव्वळ माहितीचं खोत ठरण्यापेक्षा विधायक वृत्तीची निर्मिती करणारं शिक्षण माणसाला चारित्र्यसंपन्न बनवू शकतं. पैशापेक्षा श्रमाला, आसक्तीपेक्षा भक्तीला, आकर्षणापेक्षा प्रेमाला, सत्तेपेक्षा शहाणपणाला प्रतिष्ठा मिळून तेच सद्विवेकी अधिष्ठान बनावं. तरच चरित्रग घडवणारे चारित्र्य जीवन अंग बनून जाईल. जे निष्कलंक नि सर्वोत्तम यश देईल..
शिवरायांनी अशी यशस्वी राष्ट्रीय चारित्र्य घडवली. तानाजी, बाजी, येसाजी या प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं नि कसं मरावं? वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांनी राष्ट्रचरित्र महत्त्वाचं मानलं. चारित्र्य संपन्न स्वराज्य घडवलं. शिवरायांनी लालमहालावर छापा टाकला आणि शाहिस्तेखानाची बोटं छाटली. हा शाहिस्तखान याला रोज डायरी लिहायची सवय. त्याचं 'शाहिस्तखान बुर्जी' नावाचं रेकॉर्ड आहे. त्यात हा प्रसंग त्याने लिहिलाय. त्यात एक घटना त्याने नोंदलीय तो लिहितो, शिवराय आले तसे वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला आणि आणि शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत त्याच्याकडे आली. म्हणाली, 'भाईजान मेरी बेटी गायब है. मेरी बेटी गायव है! त्यावेळी शाहिस्तेखान तिला म्हणाला, "शिवरायांची माणसं तिला पळवणार नाहीतच. पण जर त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा. तो शिवाजीराजा पोटच्या लेकीसारखीच तिची काळजी घेईल!"
कोण विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर! अर्थात, ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती. ती नंतर सापडली. पण शाहिस्तेखानाने हे जे मावळ्यांचं शिवरायाचं अलौकिक चारित्र्य व्यक्त केलं. ना.. ते खरं या राष्ट्राचं चरित्र ! तेच सर्वोत्तम यश !
यश फक्त चारित्र्यसंपन्न माणसांवरच विश्वास ठेवतं. चारित्र्य घडवा, चरित्र घडेलच!