यशाचा पासवर्ड (भाग :39) - ताण(Tension)
जे नाही त्यावर शोक करत ताण वाढवण्यापेक्षा
जे आहे त्यावर प्रेम करत आनंद वाढवावा..!
माणसाचा मोठं होण्याचा ध्यास आणि आणखी हवंचा हव्यास शेवटच्या श्वासापर्यंत सुरूच असतो. अधिक पैसा, अधिक प्रतिष्ठा, अधिक मोठं पद आवश्यक आहे, पण हे सारं आपल्या जीवापेक्षा मौल्यवान कधीच नसतं. शेवटी सिर सलामत तो पगडी पचास! पण पगडीच्या ध्यासात माणूस सिरच गमावून बसतो. त्याची सारासार विचारबुद्धी जणू नष्ट होते आणि या तणावात तो आरोग्य उद्ध्वस्त करणाऱ्या, शरीर पोखरणाऱ्या गोष्टींचा आधार घेऊ पाहातो, ऊर फुटेस्तोवर धावताना प्रकृतीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत फक्त पैसा कमावत राहातो. परिणामी, प्रकृती वाचवण्यासाठी अखेरीस कमावलेलं सारं धन गमावतो. मग मिळवतो काय? नुसतं यश मिळवून उपयोग नाही. मिळवलेलं यश उपभोगताही यायला हवं.
ताण-तणाव निर्माण करणारी कारणं शोधून ती टाळायला हवीत. स्पर्धा भयानक आहे, पण कुठे थांबायचं, तेही कळायला हवं. आपल्याला जमेल झेपेल तितकंच काम अंगावर घ्यायला हवं. उत्तम आरोग्य-मनस्वी आनंद हीच खरी संपत्ती! ती वाढवायला हवी. त्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा. आपले छंद, आपल्या आवडी-निवडी जपाव्यात. मन प्रसन्न करणारं संगीत, शरीर सुदृढ करणारे व्यायाम, बुद्धी घडवणारं वाचन, रंगात दंग करणारी चित्रं, अस्तित्व विसरायला लावणारा निसर्ग याचा आनंद घेतला पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात, ती आपली नाती! ज्यांच्या कुशीत मन मोकळं करता येईल, ज्यांच्या मायेच्या शब्दांवर या लढाईत आपण एकटे नाही असं आधारबळ मिळवता येईल, अशा साऱ्यांच्या सहवासात ताण आपोआपच कमी होतात.
पण धावण्याच्या या बेभान शर्यतीत बाकीच्या गोष्टी सोडाच, पण आपली मायेची माणसंही बाजूला फेकली जातात. मग एखाद्या संकटात, अपयशात या एकटेपणात तो ताण असा होतो. आपल्या माणसांना आपण हवे आहोत, हेही जाणवत नाही आणि माणूस मग नको ते पाऊल उचलण्यास धजू पाहातो.
एका धनाड्याच्या घरी एकदा चोरी झाली. आयुष्यभर त्याने कमावलेलं चोरांनी सारं लुबाडून नेलं. तो सैरभैर झाला. त्याच्या मनात आत्म हत्येचे विचार डोकावू लागले. तो त्याच अवस्थेत जगद्गुरू तुकोबारायांकडे आला म्हणाला, माझं सारं गेलं... पैसा-अडका, सोनं-नाणं... मी आतापर्यंत कमावलेलं सारं सारं गेलं. आता मी काय करू? मी जगू तरी कशासाठी ?
तुकोबारायांनी त्याची समस्या जाणली. त्यांनी त्याला दोन कागद दिले आणि सांगितलं, एका कागदावर तुझं काय गेलं ते लिही आणि दुसऱ्या कागदावर तुझ्याकडे अजून काय आहे, ते लिही! तो धनाढ्य काय गेले ते लिहू लागला, एवढे रोख पैसे, एवढं सोनं, एवढी चांदी, दागिने, मूर्ती... त्याची यादी तयार झाली. ती यादी लिहून झाल्यावर तुकोबाराय म्हणाले, आता तुझ्याकडे काय आहे, ते लिही. तो धनाढ्य विचार करू लागला. त्याला आठवलं. तो लिहू लागला- 'ज्यांनी मला जन्म दिला. मला जे हवं ते दिलं. तळहाताच्या फोडाप्रमाणे मला जपलं. माझ्यावर कायम आशीर्वादाचं छत्र धरलं, ते माझे आई-वडील माझ्याकडे आहेत. जी माझी अर्धांगी झाली. हरेक सुखदुःखांत जी सावलीसारखी सोबत राहिली, ती माझी प्रिय पत्नी माझ्याजवळ आहे. ज्यांच्या येण्याने माझं घरटं किलबिलू लागलं. ज्यांच्या बोबड्या बोलांनी मला बाहेरचं जग विसरायला लावलं. ज्यांच्या दुडूदुडू पावलांनी माझ्या अंगणात आनंदाचं रिंगण बांधलं. ती रोज दाराशी वाट बघणारी माझी चिमणी मुलं माझ्याजवळ आहेत. डोळ्यांत टचकन पाणी आलं तर ते पुसायला धावणारे, आम्ही आहोत पाठीशी, असं सांगणारे माझे भाऊ, असंख्य मित्र!'
यादी लांबत निघाली. आठवणाऱ्या प्रत्येक नावासरशी धनाढ्याचे डोळे पाणावत राहिले. तुकोबाराय हसत होते आणि स्वतःची चूक उमगलेला तो धनाढ्य म्हणाला, महाराज समजलो, माझं गेलं ते क्षुल्लक.... माझ्याकडे जे आहे त्याचं मोल करताच नाही येणार! माझं गेलं काहीच नाही.
माझ्याकडे इतकं आहे की, माझ्याइतका श्रीमंत कुणीच नाही! जे नाही, जे गेलं, त्यावर शोक करत ताण वाढवण्यापेक्षा, जे आहे त्यावर प्रेम करत आनंद वाढवावा. क्षुल्लक गोष्टीसाठी आपण ताण निर्माण करतो. पण हे वेळ गेल्यावर नाही; तर आधीच ध्यानात घ्यायला हवं. जगणं सुंदर करायला हवं!