संभाजी महाराज - बात उन्हीं की होती हैं, जिनमें कुछ बात होती हैं | history of india | Nitin Banugade Patil | Epi - 42

यशाचा पासवर्ड (भाग :42) - उत्साह (Enthusiasm)

अखंड उत्साहीत माणसंच दिग्विजयी ठरतात..!

ज्याच्याकडे उत्साह असतो, त्याच्याकडे यश असतं. ज्याच्याकडे उत्साह नसतो, त्याच्याकडे फक्त सबबी असतात. उत्साह ऊर्जा प्रदान करतो आणि ऊर्जा कार्य सफल करते. जगातलं प्रत्येक महान कार्य हे उत्साहामुळेच यशस्वी झालेलं आहे. उत्साहाशिवाय ज्ञान आणि शक्ती असून नसल्यासारखी! आपल्यातील ज्ञान, विचार, कल्पना, शक्ती प्रज्वलित करण्याचं कार्य उत्साह करतो. नवकल्पनांच्या निर्मितीचा पाया उत्साह हाच असतो. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचं यश हे आपण ती किती उत्साहाने करतो, यावरच अवलंबून असतं. आवडीच्या क्षेत्रात माणसं उत्साहाने काम करतात. तर नावडत्या क्षेत्रात निरुत्साहाने! उत्साही राहायचं असेल, तर आवडीच्या क्षेत्रात काम करत राहा. ते शक्य नसेल, तर नावडत्या क्षेत्रात उत्साहाने काम करत राहा. ते क्षेत्र आवडीचं होऊन जाईल. माणूस एखाद्या कार्यासाठी प्रचंड उत्साहित असतो, तेव्हा सारी सृष्टी त्याच्या सहाय्यासाठी धावून येत असते. त्याला यशस्वीतेकडे नेत असते!

                                                     

संभाजी महाराज, sambhaji maharaj hd'उत्साह' संसर्गजन्य आहे. उत्साही माणसाच्या सान्निध्यातील इतर लोकही उत्साही होऊन जातात. कामाच्या कष्टांची जाणीव उत्साह झटकन कमी करतो. सदैव उत्साहित असणाऱ्या नेत्याकडेच सळसळत्या उत्साहाचे कार्यकर्ते असतात. तेच त्याचं सामर्थ्य बनतात.

छत्रपती संभाजीराजे रणागंणावर एवढे उत्साहित असत की, अॅबे करे हा फ्रेंच त्यांच्याबद्दल लिहितो, 'संभाजीराजांच्या नुसत्या उपस्थितीनेच त्याच्या सैनिकांत अफाट उत्साह संचारत असे. संभाजीराजांच्या हाताखाली लढण्यात त्यांना कोण धन्यता वाटे. असं भाग्य ज्या राजाच्या वाट्याला त्याला जीत लांब नसते!'

संभाजीराजांच्या नुसत्या उपस्थितीनेच त्याच्या सैनिकांत अफाट उत्साह का संचारत असे? | Yashacha Password (Part 41) - उत्साह (Enthusiasm)

 

प्रेरणा हा उत्साहाचा आरंभबिंदू असतो. काही मिळवण्यासाठी, काही जिंकण्यासाठी असणारा उद्देश हा मनाला कार्य करण्यासाठी उत्तेजना देत असतो. हा उद्देश मध्यबिंदू ठरतो. तो उत्साह वाढवत जातो. हा उत्साहच विजय देतो आणि मिळालेला विजय पुन्हा लढण्यासाठी, पुढे जाण्यासाठी उत्साह प्रदान करतो. उत्साहाला शेवट बिंदू नसतो. अखंड उत्साहित माणसं म्हणूनच दिग्विजयी ठरतात.

लहान मुलं प्रचंड उत्साही असतात. म्हणूनच ती प्रत्येक गोष्ट करू पाहातात. तर प्रत्येक नवी गोष्ट करू पाहाण्याची त्यांची इच्छा त्यांना उत्साही बनवत जाते. मोठेपणी हेच व्हायला काय हरकत आहे? पण माणसं त्याला अतिउत्साह मानतात. अतिउत्साह कधी कधी तोट्याचा ठरतो, हे खरं; पण अतिउत्साहाने तुम्ही एखादी संधी गमवाल पण उत्साहाअभावी तुम्ही साऱ्याच संधी गमावता, हेही तितकंच खरं!उत्साह म्हणजे माणसांच्या मानसिक कंपनांचा अत्यंत उच्च दर! तो वाढवता येतो. निर्माण करता येतो! शत्रूवर तुटून पडण्याअगोदर हर हर महादेवचा होणारा जयघोष किंवा रणांगणावर दिल्या जाणाऱ्या बेभान आरोळ्या या धारकऱ्यांना विजयाकडे तर रामकृष्णहरी.. ग्यानबा-तुकारामचा नादघोष हा वारकऱ्यांना पायाखालची वाट विसरायला लावत पंढरीच्या विठोबाकडे नेतो, तो त्यातून निर्माण होणाऱ्या उत्साहामुळेच! काम करताना उत्तम संगीत ऐकल्याने काम गाराची कार्यक्षमता वाढल्याची आणि दिवसभर काम करूनही ते संध्याकाळी आनंदाने शीळ घालत घरी परतल्याची निरीक्षणे नोंदली गेलीत, त्यामागे त्यांचा वाढवलेला उत्साह हेच कारण ! उत्साह महत्त्वाचा पण त्यावर नियत्रंण हवं! उत्साहातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेला योग्य दिशा हवी. 

अनियंत्रित उत्साह विघातक-विध्वंसक ठरतो. रस्त्यावर टारगटपणा करणारी मुलं ही अनियंत्रित उत्साहाचं उदाहरण! त्यांचा तो उत्साह नियंत्रित करून त्याला योग्य दिशा दिली, तर रस्त्यावर मारामारी करणारी हीच मुलं कुस्तीमध्ये, मुष्ठीयुद्धामध्ये देशाला सुवर्णपदकं मिळवून देऊ शकतील ! 

तुम्ही उत्साही असाल, तर जग उत्साहित होईल. लक्षात असू द्या, ओल्या काडेपेटीने आग कधीच प्रज्वलित होत नाही आणि ती प्रज्वलित झाल्याशिवाय यशाचा प्रकाश लाभत नाही! उत्साही तो प्रकाश प्रज्वलित करतो.

2 टिप्पण्या

  1. सर तुमची लेखणी एकदम मनाला भिडते व उत्साह निर्माण करते..... ््व््््व्््व््््व््व््््््व््््व््््व्््व््््व््व््

    उत्तर द्याहटवा
थोडे नवीन जरा जुने