आपलं बोलणंच आपला उत्तमपणा घडवत जातं | Yashacha Password (Part 45) - वक्तृत्व (Oratory )

यशाचा पासवर्ड (भाग :45) - वक्तृत्व (Oratory)

वक्तृत्वाच्या परिसस्पर्शानंच कर्तृत्व झळाळतं अन् नेतृत्व उजळतं..!

निव्वळ वक्तृत्वाच्या बळावर अनेकांनी आपलं नेतृत्व घडवलं आहे, कर्तृत्व सिद्ध केलं आहे. प्रभावी बोलणं, हे आयुष्यातले प्रचंड मोठं सामर्थ्य असतं. या सामर्थ्यानेच जगाचा इतिहास घडवला आहे. फक्त सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातच नव्हे, तर वैयक्तिक जीवनातही उत्तम बोलणं, यशाचा राजमार्ग ठरतं.

माणसाइतकंच बोलणंही जुनं आहे. बोलण्यामुळे मतं कळतात. मन जुळतात-नाती दृढ होतात. विचारांची देवाण-घेवाण होते. संबंध वाढतात. लोकसंग्रहाच्या कक्षा विस्तारतात. बोलणं संवाद घडवतं आणि बोलणंच विसंवादाचं कारणही ठरतं. बोलणं हानी करणारं आणि विनाश थांबवणारंही असतं. बऱ्याचदा हे बोलणं कशासाठी? असे प्रश्न पडावे इतकं ते असंबद्ध आणि निराकार असतं. तर काही माणसं बोलतात खूप, पण सांगत काहीच नाही. काही सांगतात खूप, पण कळत काहीच नाही. अशा बोलण्याचा उपयोग काय ? बऱ्याचदा माणसं अविचाराने नको ते बोलतात आणि नंतर पश्चाताप होऊन विचार करीत बसतात. धनुष्यातून सुटलेला बाण आणि ओठांतून फुटलेला शब्द माघारी घेता येत नाही, म्हणूनच बोलून विचार करण्यापेक्षा विचार करूनच बोलणं महत्त्वाचं ठरतं. बोलताना चुकू नये आणि चुकीचं बोलू नये, हा यशस्वीतेचा महत्त्वाचा नियम !

Public Speaking | Yashacha Password (Part 45) - वक्तृत्व (Oratory )

आपल्या बोलण्यातला खारटपणा, तुरटपणा, तिरसटपणा, आगाऊपणा तुम्हाला लोकांच्या नजरेतून उतरवणारा ठरतो. मात्र नेमकं, अचूक, योग्य तेच आणि योग्य वेळी गरज असेल तर बोलणं लोकांना हवंहवंसं वाटतं. लोकांचं बळ वाढवणारं, प्रेरणा देणारं, विश्वास दर्शवणारं, त्यांच्यासोबत असल्याचं आश्वस्त करणारं तुमचं बोलणं तुम्हाला लोकप्रिय ठरवत जातं.

अशा बोलण्यासाठी प्रचंड अभ्यासाची, व्यासंगाची गरज असतेच, असं नाही. भले तुमच्याकडे जीवनविषयक तत्त्वज्ञान नसेल, पण जीवनविषयक निश्चित समज असेल, काय, कुठं नि कसं बोलावं याचं भान असेल, तरी ते पुरेसं असतं. तुमचं बोलणं लोक तेव्हा स्वीकारतात, जेव्हा ते त्यांच्या काळजाला भिडतं. ते तेव्हाच काळजाला भिडतं, जेव्हा ते प्रामाणिक असतं, लोकांबद्दल जिव्हाळ्याचं असतं. लोकांविषयी तुमच्या हृदयात कळकळ आणि तळमळ असते. तिडीक असते! नुसतं वरवरचं बोलणं परिणाम घडवत नाही. मुळात जे तुमच्याच मनापासून येत नाही, ते इतरांच्या मनापर्यंत जाईलच कसं? अमे बोलणं निव्वळ ऊर्जाक्षय घडवत जातं.

जेव्हा बोलण्याचा काही परिणाम अपेक्षित असतो, तेव्हा त्याला काही कसोट्या लावाव्या लागतात. कसोटीला उतरणारं समाधानकारक बोलणं घडण्यासाठी व्यासंग गरजेचाच असतो. बोलू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला भीती वाटतेच. पण युद्धातील सर्वात उत्तम बचाव म्हणजे आक्रमण! या भीतीविरोधात पहिल्यांदा आक्रमक व्हा! भीती म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव आणि तो अज्ञान आणि अनिश्चिततेतून येतो. अज्ञान दूर करण्यासाठी अभ्यास महत्त्वाचा. निव्वळ गरजेपुरतं ज्ञान, नाइलाज म्हणून घेतलेलं ज्ञान उपयोगी पडत नाही. पूर्ण ध्यासाने नि सातत्याने विषयाचा केलेला सखोल अभ्यास, आपल्याला चिंतनाची खोली देतो. शिवाय आवश्यक असतो तो बहुश्रुतपणा. उत्तम बोलण्यासाठी प्रचंड ऐकणं, अफाट वाचणं, खूप पाहाणं, निरीक्षण करणं, अनुभव घेणं, स्वतंत्र विचारशैली निर्माण करणं, भाषासौंदर्य वाढवणं. सोपा सहज नि सुलभ शब्दसंग्रह जवळ असणं, हे अत्यंत महत्वाचं असत. याशिवाय लोकरुचीचं नि प्रंसगाचं भान राखून भावना आणि विचार याचा सुरेख संगम जो साधतो, तोच प्रभावी बोलू शकतो. वक्तृत्वाचे शास्त्र पाठ करून बोलता येणार नाहीच. सर्वोत्तम बोलणं साधण्याचा उत्तम उपाय म्हणजे सातत्याने उत्तम बोलत राहाणे !

बोलता-बोलताच आपल्याकडे बोलण्यासारखं काय आहे, ते समजतं. ते कसं आणि किती बोलावं, हे उमगतं. कुठे बोलावं आणि कुठे बोलूच नये, याचंही भान येतं. आपलं बोलणंच आपला उत्तमपणा घडवत जातं. बोलणं जिंकणं सोपं करून टाकतं! म्हणून बोलत राहा ! 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने