तुम्हीही यशाच्या आभाळात उडू शकता | Nitin Banugade Patil Latest Article | Motivational Story

 

यशाचा पासवर्ड (भाग :27) - विचार (Thoughts)

हरण्याचा विचार करणारी माणसं कधीच जिंकत नाहीत ...!

              जी माणसं स्वतः भोवती सबबींची बंधनं घालून घेतात ; कारणांची मर्यादा आखून ठेवतात ; ती माणसं अमर्याद  यश कधी मिळवू शकत नाही . मर्यादा कधीच कुणी बाहेरून लादत नाही . बंधन कधीच कुणी दुसरा घालू शकत नाही . आपल्याला मर्यादा घालतात , संकुचित ठेवतात , ते फक्त आपले विचार ! आपले विचार कसे आहेत , यावर आपली परिस्थिती ठरते. आपले विचारच आपण काही करायचं कि नाही , ते ठरवतात. आपले विचार आपण कोणता निश्चय करावा , ते सांगतात . एक भयानक कडा . जिथे कुणीच जाऊ शकत नाही , असं लोक नेहमी सांगायचे . पण एक मुलगा तिथे पोहचला . त्या कड्यावर जाऊन आला . लोक विलक्षण चकित झाले . त्याला विचारू लागले , ' अरे , तिथे कुणीच जाऊ शकत नाही . तू कसा पोहचलास ?'

                    त्या मुलाने उत्तर दिलं , ' तिथं कुणी जाऊ शकत नाही , हेच मला माहिती नव्हतं !'
                   तिथे कुणी जाऊ शकत नाही . या कारणाची मर्यादाच त्या मुलाला नव्हती . म्हणून तो पोहचला . ज्यांना मर्यादा होती ते कधी तिथे पोहचले नाहीत . तुम्ही काय करू शकता ? याला खरं तर काही मर्यादाच नाहीत . आहेत त्या तुम्ही ठरवलेल्या !
                                                      
Happy Thoughts In Marathi


                    लहानपणी साखळदंडांनी बांधलेलं हत्तीचं पिल्लू सुटण्याची धडपड करतं , परंतु वारंवार प्रयत्न करूनही त्याचं बळ तोकडं पडतं . तो बाल हत्ती समजून जातो , आपल्याला बांधलंय . आपण धडपड करूनही हे साखळदंड तोडू शकत नाही . तो ते बंधन मान्य करतो . पुढे मोठा होतो . बलाढ्य होतो . अफाट ताकदीचं कामं करू शकतो . पण तिथून साखळदंड तोडून निसटून जायचा विचारही करत नाही . त्याच्या डोक्यात पक्का विचार बसलेला असतो . आपल्याला बांधलंय ? वास्तविक , त्याच्या पायात असणारा साखळदंड माहुताने बांधलेलाच नसतो . तो असतो मोकळाच ! माहुताला आता त्याला बांधून ठेवायची गरजच वाटत नाही , कारण माहुताला माहिती असतं हत्तीने आता स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय ! स्वतःच्याच विचाराने !

                   आपले विचार फार महत्वाचे असतात . तेच आपल्यावर विलक्षण प्रभाव टाकतात . आपण जो विचार करतो , नेमकं तेच आणि तसंच घडत असतं . हरण्याचा विचार करणारी माणसं कधीच जिंकत नाहीत आणि फक्त जिकंण्याचाच विचार करणारी माणसं कधीच हरत नाहीत . विचार गंभीरपणे करावा आणि तो गंभीरपणे घ्यावा ! जी माणसं विचारांना सहज घेतात , ते अपयशालाच सहज जवळ करतात . आपले विचार हीच आपली मर्यादा ! बाकी मर्यादा कुठलीच नसतेच . विचार पारखून घ्यावेत , निरखून उरात ठसवावेत . ते आपलं विकसित व्यक्तित्व घडवतात . विषारी सापांना सारेच टाळतात . विषारी विचारांनाही तसंच टाळायला हवं !
                                               
Elephant In Maharashtra

 

                   पण माणसं नकारात्मक विचार करतात . प्रत्येक गोष्टीत शंका काढतात . चिंतातुर जंतूंसारखी वारंवार चिंता व्यक्त करतात . एखादं कार्य सुरु करण्याआधीच विचारांचा इतका खल करतात कि , ते विचारच कार्यातील अडथळे बनून जातात . सकारात्मक विचारशैलीत शंका उमटत नाहीत . सकारात्मक विचार असणाऱ्या माणसांकडे अशक्य हा शब्द असत नाही . जे विचार तुम्हाला यशापासून मागे ओढतात , त्या विचारांच्या मागे जाऊच नये . जे विचार तुमच्या तुमच्या कर्तुत्वाला कुंपण घालतील , जे विचार तुमच्या झेपेला मर्यादा आणतील , असे विचार मनाला माहितीच करून देऊ नका . होईल का ? असा प्रश्न उभा राहिल्यावर माणसं पुढे जातच नाही . होणारच ! असं म्हंटल्यावर माणसं पुढं जाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. नियमातून चालणारी माणसंही यमाला टाळू शकत नाहीत . मग यशापासून रोखणाऱ्या नियमांच्या मर्यादा पाळा कशाला ? तिथे बंडखोर व्हायचं !
                                         
Butterfly Inmarathi


                  एरोडायनॅमिक्सच्या नियमानुसार फुलपाखरू उडू शकत नाही ! पण तरीही ते उडतं . कारण ! फुलपाखरांना एरोडायनॅमिक्सचा नियमच माहिती नसतो ! तुम्हीही यशाच्या आभाळात असेच उडू शकता !!!

                                              
नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Post a Comment