पुस्तकांच्या श्रीमंतीवर जगातील कुठलीही श्रीमंती मिळवता येते | Yashacha Password (Part 43) - पुस्तके (Books)

यशाचा पासवर्ड (भाग :43) - पुस्तके (Books)

पुस्तकांच्या श्रीमंतीवर जगातील कोणतीही श्रीमंती मिळवता येते..!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 'मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या माझ्या सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे असलेल्या कृष्णाजी अर्जुन केळूसकरांनी मला गौतम बुद्ध हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक भेट म्हणून दिलं. या पुस्तकाने मला गौतम बुद्धांची, त्यांच्या तत्त्वज्ञानाचीच नुसती ओळख करून दिली असं नव्हे, तर माझ्या आयुष्याला या पुस्तकाने जगण्याची दिशा दिली. मला सर्वोत्तम प्रेरणा बहाल केली. त्यादिवशी केळूसकरांनी मला ते पुस्तक दिलं नसतं, तर कदाचित आज जो मी आहे, तो घडलोही नसतो!'

हे पुस्तकच गांधींजींना महात्मा घडवण्यास कारण ठरलं | Yashacha Password (Part 43) - पुस्तके(Books)

 

महात्मा गांधींना त्यांच्या एका मित्राने एक पुस्तक भेट म्हणून दिलं. जॉन रस्किन या इंग्लिश तत्त्वचिंतकाचं अन टू बिस लास्ट हे ते पुस्तक! या पुस्तकानेच गांधींच्या जीवनदर्शनाचा, विचारांचा पाया घातला. ज्याला आपण सर्वोदय किंवा गांधीवाद म्हणतो त्याचं मूळ या पुस्तकात आढळते. हे पुस्तकच गांधींजींना महात्मा घडवण्यास कारण ठरलं. वाचनात परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य आहे, हे जाणलेल्या गुलामांच्या मालकांनी पुस्तकांमुळे स्वातंत्र्याचे विचार त्यांच्या डोक्यात घुसतील, म्हणून गुलामांनी वाचायचे नाही, असं फर्मान लं. अब्राहम लिंकन, फ्रेडरिक इग्लस या गुलाम गिरीच्या प्रवेविरुद्ध लढणाऱ्यांना लहानपणी वाचण्यासाठीही लढावं लागलं. पुस्तकांतूनच त्यांनी स्वातंत्र्य आणि मुक्तीची प्रेरणा मिळवली. आपल्याच नव्हे, तर इतरांच्या आयुष्यातही त्यांनी मानवतेचे महन्मंगल दीप प्रज्वलित केले.

उद्ध्वस्ततेच्या तटावर आणि मरणाच्या काठावर स्वतः ला झोकून देऊन पाहाणाऱ्या अनेकांना पुस्तकांनीच माघारी आणल्याचं, त्यांना पुन्हा जीवनप्रेरणा देण्याचं आयुष्य समृद्धतेचं वरदान बहाल करण्याचं कार्य केल्याची उदाहरणं पदोपदी दिसतात. जगातील साज्या क्षेत्रांचं नेतृत्व करणारे नेते हे पुस्तकांतूनच घडल्याची आणि ग्रंथ हेच त्यांचे गुरू झाल्याची नोंद दिसते. जगातल्या साऱ्या समस्यांची उत्तरं पुस्तकांत असतात. पुस्तकें प्रेरणा, ध्येय, विचार, संस्कार, आणि आचारांचं मार्गदर्शन करतात. पुस्तकांनीच मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण कुणापुढे लाचारीने नतमस्तकही होत नाही. पुस्तकात आयुष्य बदलून टाकण्याचं सामर्थ्य आहे. एखादं पुस्तक त्यातील एखादी ओळही.. आयुष्याला वळण देणारी ठरते. अवचित एखादं पुस्तक हाती लागतं, त्याच वाचन विचार करण्याची, बदल घडवण्याची एवढी स्फूर्ती देतं की, त्याचा आपण विचारही केला नसेल. आतापर्यंत मानवजातीने जे काही केलं आहे, ते सारं पुस्तकांच्या पानांत सामावलेलं आहे. त्याच्या वाचनाने आपल्याला जगाचा, आपल्या इतिहासाचा अगदी स्वतःचाही शोध लागतो. पुस्तकांनीच माणसांचा भविष्यकाळ घडवला आहे. पुस्तकांच्या पानांत रमणाऱ्या प्रत्येक माणसात स्वत:चा विकास करण्याचं, जगण्याला बळ देण्याचं नि पूर्णत्वाने सफल आयुष्य जगण्याचं सामर्थ्य येतं. इतर कुठल्याही माध्यमांपेक्षा पुस्तक हेच विचारप्रसाराचं सर्वोत्तम साधन आहे. या जाणिवेपोटीच बुडती हे जन न देखवे डोळा म्हणत तुकोबांनी शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन.. शब्दचि वाटू धन जनलोका असं सांगणाऱ्या गाथेची निर्मिती केली.

हे महापुरुष पुस्तकातून आपल्याशी बोलतात...त्यांचे सर्वात मौल्यवान विचार आपल्याला देतात. त्या पुस्तकामागे त्यांचं दीर्घकालीन चिंतन असतं. काळजाला भिडलेला तो त्यांचा जीवनानुभव असतो. त्यात तटस्थपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली चिकित्सा असते. असे जीवनग्रंथ त्यांचं अख्खं आयुष्य जगल्याचाच अनुभव आपल्याला देतात. वाचन हे दुसऱ्याचं मन आणि आयुष्य वाचण्याचं साधन आहे. इतरांच्या आयुष्याबद्दलचं वाचन हे आपल्याला आपल्या आयुष्याचा विचार करायला लावतं. आपल्या चुका सुधारण्यासाठी मदत करतं. त्यांच्या अनुभववाचनाने त्यांना जे करण्यासाठी कष्ट पडले, ते ज्ञान आपल्याला सहज मिळतं. पुस्तकांच्या श्रीमंतीवर जगातील कुठलीही श्रीमंती मिळवता येते. असे श्रीमंत तुम्हीही व्हा ! 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने