निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्राच्या बळावर ज्यांनी मराठी मनांवर तब्बल ४५ वर्ष अधिराज्य गाजवलं ते बाळासाहेब ठाकरे | Yashacha Password (Part 44) - बोलणे (Speak)

यशाचा पासवर्ड (भाग :44) - बोलणे (Speak)

बोलणं दोनवेळा शिकावं लागतं, जन्माला आल्यावर आणि नंतर जग जिंकायला निघाल्यावर..!

बोलण्यातून लोकमाणसांचं मतपरिवर्तन आणि हृदयपरिवर्तन करण्याचं कसब ज्यांनी प्राप्त केलं. त्यांनीच संवादातून, संभाषणातून, सभामधील भाषणातून माणसांची मनं जिंकली, त्यांनीच जग जिंकलं!

सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, हे शब्द सभागृहात घुमले आणि आतापर्यंत केवळ लेडीज अँड जंटलमन ऐकायची सवय असलेले सारे अमेरिकन अंतर्बाह्य शहारले. ताड्कन उठून उभे राहात, साऱ्या मानवतेलाच बंधुत्वाच्या आंतरिक निष्ठेने साद घालणाऱ्या त्या युवकाला टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आदराने अभिवादन करीत राहिले. बंधू आणि भगिनींनों या अंतरीच्या बोलांनीच नरेंद्राला विवेकानंद केलं. आपल्या बोलण्याने अनोळखी समाजाला त्यांनी जिंकलं; अक्षरशः वेड लावलं.

ऐनवेळी सभागृहात मुख्य वक्ते पोहोचलेच नाहीत. तेव्हा संयोजकांनी तिथल्याच एका युवकाला भाषणासाठी उभं केलं आणि राष्ट्रभक्तीने रसरसलेला तो युवक झपाटल्यासारखा बोलत राहिला. सारी सभा मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिली. त्याचं बोलणं संपलं, तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाची खात्री पटली होती. केवळ हाच जर्मनीचा उद्धार करू शकतो! तो हिटलर बोलण्याच्या बळावर जर्मनीचा सर्वेसर्वा झाला. विशेष म्हणजे, जगावर अधिराज्य गाजवण्याच्या त्याच्या महत्त्वाकांक्षेचा, त्याचा पराभव ब्रिटनच्या सैन्यबळाने, तोफगोळ्यांनी किंवा बंदुकींनी केला नाही. त्याचा पराभव केला तो चर्चिलच्या भाषणांनीच ! ऐन युद्धकाळात चर्चिलने आपल्या देशबांधवासाठी, सैनिकांसाठी केलेली भाषणं ब्रिटनला प्रेरणा आणि चेतना देणारी ठरून विजयी करणारी ठरली.

आपल्या बोलण्याच्या कसबाने लोकांची मतं बदलण्यात नि हवा तो परिणाम साधण्यात यशस्वी ठरलेला अब्राहम लिंकन अमेरिकेच्या अध्यक्षपदी पोहोचला. नैतिक चारित्र्याचे अधिष्ठान लाभलेले त्यांचे शब्द समोरच्याला असे भिडले की, त्यांच्या शब्दांनाच कृतीचं मोल येई, ते महात्मा गांधी! आपल्या साहित्यिक व्यासंगाच्या परिसस्पर्शी बोलण्याने जे साऱ्यांना प्रभावित करीत. ते पंडित नेहरू ! जिथे जातील तिथल्यांच्या मनातलं बोलत, काळजाला हात घालत, अगदी मोजकंच बोलत समोरच्याच्या मनात अलगद उतरणारे यशवंतराव चव्हाण! इंग्रजांच्या विरोधात प्रतिसरकार स्थापून पत्री सरकारची चळवळ चालवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपली ग्रामीण ढंगातली. रांगडी बोली लोकजागृतीसाठी वापरली. लोकांनी ती डोक्यावरच नव्हे, तर डोक्यात घेऊन कृतिशीलही केली.

साहित्यिकांनी सुरू केलेली चळवळ आंदोलनाचं कसं व्यापक रूप होऊ शकते, हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने दाखवलं. भाषणाच्या पहिल्या वाक्यापासूनच हशा आणि टाळ्या मिळवणाऱ्या आचार्य अत्रेंसोबतच अनेक नेत्यावक्त्यांनी आपल्या वक्तृत्वशैलीने या लढ्यात बळ भरलं.

speech of balasaheb thakre | Yashacha Password (Part 44) - बोलणे (Speak)

आपल्या शब्दांच्या फटकाऱ्यांनी ज्यांनी भल्याभल्यांना घायाळ केलं. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी आपल्या वाणीने ज्यांनी मराठी माणसाला वाघ बनवलं. एकदा बोललेला शब्द ज्यांनी कधी माघारी घेतला नाही वा फिरवला नाही. जे बोललो ते बोललोच. अशा स्वतःच्या रोखठोक आणि आक्रमक शैलीने ना मंत्राच्या, ना तंत्राच्या तर निव्वळ स्वतःच्या स्वरयंत्राच्या बळावर ज्यांनी मराठी मनांवर तब्बल ४५ वर्ष अधिराज्य गाजवलं ते बाळासाहेब ठाकरे !

ही सारी मोठी माणसं. या साऱ्यांचं बोलणं, व्यासंगाने तयार केलेलं, घडवलेलं बोलणं होतं. या बोलण्यानेच त्यांना मोठेपण दिलं. त्यांच्या बोलण्यानेच समाज घडवण्याचं, क्रांतिकार्य केलं.

तुम्ही कुणीही, कोणत्याही क्षेत्रात असा, सर्वोत्तम यशासाठी हे असं बोलणे साधणं अत्यंत गरजेचंच! तुम्ही तसं बोलूही शकता. खरं तर, बोलणं दोन वेळा शिकावं लागतं. जन्माला आल्यावर आणि नंतर जग जिंकायला निघाल्यावर!

पहिलं बोलणं सारेच शिकतात. पण जग जिंकण्याचं बोलणं काहीजणच साधतात. तेच यशस्वी होतात. 

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने