यशाचा पासवर्ड (भाग :41) - वाचन (Reading)
वाचन हे मनाचाच नव्हे तर आयुष्याच्या यशाचाही सकस आहार ठरतं.. !अनेकांच्या यशाचा, सुखाचा शोध पुस्तकाजवळ घेऊनच संपला आहे. वाचन दुःखापासून मुक्ती देतं. एकटेपणा घालवतं. निर्भेळ आनंद देतं. अंधारातून प्रकाशाकडे नेतं. वाचन तुमच्या सुप्त क्षमतांना चालना देतं. तुम च्यात नको असलेला भाग काढून आतील सुंदर मूर्ती बाहेर आणतं. खरं तर, मनाला आत्मचिंतन करायला लावणं, हाच पुस्तकांचा उद्देश असतो. तुम्ही हाती घेतलेलं पुस्तक जर नुसतंच गुंगवून ठेवत असेल, ते विचारबुद्धीला चालाच देत नसेल, तर ते वाचून उपयोग काय?
शरीराचा व्यायामाशी जसा संबंध आहे, तोच वाचनाचा मनाशी आहे. वेळ घालण्यासाठी वाचणं वेगळं आणि काही मिळवण्यासाठी घडवण्यासाठी वाचणं वेगळं! तुम्ही जे त्याप्रमाणे तुम्ही घडता. त्यामुळे तुम्ही किती वाचता, यापेक्षा तुम्ही काय वाचता? हे महत्त्वाचं ठरतं. आयुष्यात दोन घटक बदल घडवतात. चांगले मित्र आणि चांगली पुस्तकं! म्हणून मित्राप्रमाणेच पुस्तकांची निवडही काळजीपूर्वक करावी लागते. आपण कुणाच्या संगतीत आहोत, यावरच आपले विचार आणि कृती ठरत असते. वाचन हलक्या दर्जाचं असेल, तर सारं तसंच घडणार! चांगली पुस्तकं न वाचणारा आणि अक्षर ओळख नसणारा, यांच्यात अजिबात फरक नसतो, तो यामुळेच!
जाणीवपूर्वक विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेलं वाचन 'व्यासंगा'चं रूप धारण करतं. अशा व्यासंगी माणसांच्या मते, वाचन हीसुद्धा एक कला बनते. वाचनातून प्रत्येक प्रकारचं ज्ञान शक्य तितक्या चांगल्या प्रकारे ग्रहण करण्याचं कौशल्य प्राप्त होतं. कारण नुसतं वावर नव्हे, खोलवर वाचनच मनाला समृद्ध करीत जातं. आपला दैनंदिन आहार आपण जितक्या काळजीपूर्वक योजतो आणि जितक्या काळजीपूर्वक चावून खातो, तितक्याच काळजीपूर्वक वाचनाचीही योजना केली पाहिजे. कारण त्याशिवाय परिपूर्ण आणि सर्वोत्तम विकास होऊच शकत नाही. अभिरुची उंचावणारं, कल्पनाशक्ती विस्तारणारं, आयुष्य ध्येय दाखवणारं, कृती करण्यास प्रवृत्त करणारं आदर्श समोर ठेवणारं असं वाचन ज्यात आयुष्य बदलायची जबरदस्त ताकद आहे. काही करू पाहाण्याची, करून दाखवण्याची, काही बनण्याची धमक पैदा करणारं वाचन हे मनाचाच नव्हे; तर आयुष्याच्या यशाचा सकस आहार ठरतं. अशा सकस वाचनातूनच माणसं घडल्याची आणि त्यांनी जग घडवल्याची उदाहरणं जागोजागी दिसतात.'जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत मला टाका. फक्त माझ्यासोबत पुस्तकं द्या. कारण पुस्तकंच मला पंख देतात. त्यांच्या आधारे कोठडीत बसूनही मी सारं जग फिरून येऊ शकतो. पुस्तकाच्या पानांतून सारं जग अनुभवू शकतो. पण पुस्तकांशिवायचं जग मला दिलंत, तर मी गुदमरून मरेन. पुस्तकांशिवाय मी जगूच शकत नाही!' असं म्हणणारा डग्लस किंवा 'माझं सारं सर्वस्व-सारी संपत्ती नेलीत तरी चालेल, पण माझ्या पुस्तकाला कुणी हात लावला, तर मात्र मी प्राणपणाने विरोध करीन. कारण पुस्तकंच माझा प्राण आहेत आणि त्यांचं वाचन माझा श्वास!' असं म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानवी आयुष्यातील यशस्वीतेसाठी आवश्यक असणारं वाचनाचं मोलच अधोरेखित करतात.
नव्या युगात माणसांची बुद्धी तंत्रशरण झाली आहे. जीवनमंत्र देणारी वाचनाची बैठक डळमळली आहे. ज्ञान, विज्ञान, चारित्र्य, साधना, संस्कार, योग आणि आरोग्य देणारे, व्यक्तिमत्त्व संस्कारित आणि संपन्न करणारे, बुद्धीचे भरणपोषण करणारे ग्रंथ घरातून हद्दपार होताना दिसत आहेत. खरं तर, पुस्तकांशिवाय घर म्हणजे आत्म्याशिवाय देह! आता घराघरांत ग्रंथालयं हीच देवालयं व्हावीत आणि ग्रंथ हेच देव.. वाचनाची पूजा सदैव घडावी! नव्या पिढीच्या नावे बँकांत पैशांच्या ठेवी ठेवण्यापेक्षा, त्यांना संस्काराच्या ठेवी देणाऱ्या पुस्तकांच्या बँका उभाराव्यात. दैनंदिन गरजेसाठी मॉलकडे वळणारी पावलं जीवन गरजेसाठी पुस्तकांच्या स्टॉलकडे वळावीत, तरच स्वतः घडता येईल. नवं काही घडवता येईल!