यशस्वी झाल्याशिवाय परत फिरायचं नाही | Yashach Password | Nitin Bangude Patil Article

 

यशाचा पासवर्ड (भाग :25) - निर्णय (Decision)

योग्य निर्णय घेतल्यानेच माणसं यशस्वी होतात असे नाही तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे ते सिद्ध करतात म्हणून...!

                                           कोलंबसला एकाने विचारलं, तुमच्या यशस्वी होण्याचं रहस्य काय.. ??                         कोलंबस उत्तरला , ' यशस्वी झाल्याशिवाय परत फिरायचं नाही , हा माझा ठाम निर्णय !'

 

निर्णय तुमचं आयुष्य बदलतो. निर्णय तुम्हीच घ्यायचा असतो. यशस्वी व्हायचं कि अयशस्वी ? तुम्ही जसा निर्णय घेता , तसे तुम्ही घडता. मुळात आयुष्य घडायला फार वेळ लागतच नाही. फक्त एकाच क्षण पुरेसा असतो. तो क्षण निर्णयाचा ! ज्या क्षणी तुम्ही निर्णय घेता , त्याक्षणी तुमची यशाकडे वाटचाल सुरु झालेली असते. जगातील यशस्वी माणसांच्या यशाचं रहस्य त्यांनी एकच सांगितलं , ठाम आणि तत्पर निर्णय ! याउलट , अयशस्वी लोकांच्या अपयशाचं एकच कारण - निर्णय न घेण्याची वृत्ती ! माणसं निर्णय घायलाच प्रचंड वेळ लावतात. करायचं कि नाही ? केलं तर काय ? अशा चर्चेत गुंतून बसतात. वादविवाद घालत किंवा विचार इतका करत बसतात कि , ते विश्लेषणाच्या निष्क्रियतेतच पुरते अडकून पडतात. परिणामी , वेळ निघून जाते . वास्तवात घडत काहीच नाही. ह्या माणसांत कर्तृत्व-गुण नसतात, असं नव्हे ; पण निर्णय घेण्याची क्षमताच नसते.

                                                  
Decision Marathi


            इंग्रजांना मालक म्हणून राहायचं होतं आणि भारतीयांना गुलाम म्हणूनच घडवायचं होतं. म्यॅकोले याने त्यासाठी 'निर्णयक्षमता विकसित न करणारी ' शिक्षणपद्धती इथे राबवली. आम्ही अजूनही तीच राबवत आहोत. आमची पुस्तकं अजूनही गुलाम मस्तकच घडवत आहेत . स्वतःच मन आणि बुद्धीचा वापर करून स्वतःचा निर्णय स्वतः घेणं , हा यशाकडे नेणारा मार्ग ! मात्र दुसऱ्याची मतं एकूण त्याने प्रभावित होत ते म्हणतील तसं करणं म्हणजे . स्वतःच स्वतःला पांगळं करणं ! जे स्वतः ठाम आणि त्वरित निर्णय घेतात , ते मोठे होतात आणि जे निर्णय न घेता इतरांचे निर्णय राबवतात ते फक्त अनुयायीच राहतात. तुम्ही मालक बनायचं कि नोकर ? हे तुमच्या निर्णयावरच अवलंबून असतं. 
 
              काही निर्णय अत्यंत सावधानतेने , परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून , सारी तथ्यं जमा करून घ्यावे लागतात. एकदा विचार झाला कि , मग मात्र झटकन निर्णय घ्यावा. एकदा आपल्या निर्णयामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवली , कि अवघड काहीच नसतं. निर्णय घ्यायला धाडस लागतं. धाडस आत्मविश्वासातून येतं. जी माणसं निर्णय घेतांना डगमगतात. दोन्ही दगडींवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतात. ती स्वतः बद्दल निश्चित नसतात. जी माणसं स्वतःच निश्चित नसतात, ती इतरांना निश्चित मार्गावर कसे नेतील ? कुठे जायचं आहे; कसं जायचं आहे , हे नुसतं माहिती असून उपयोगाचं नाही. जाण्याचा निर्णय ठामपणे घेता आला पाहिजे. निर्णयाशिवाय कृती नसते. म्हणून तुम्ही कोणता निर्णय घेता हे महत्वाचं नाही. महत्वाचं आहे , तुम्ही निर्णय घेणं ! कदाचीत निर्णय चुकतीलही ; फटकाही बसेल. पण निर्णयच न घेण्यापेक्षा ते केव्हाही चांगलं ! चुकलेला निर्णय आपल्याला अनुभव देतो आणि योग्य निर्णय यश ! दोन्ही गोष्टी महत्वाच्याच !
 
                       लीडर कोणत्याही क्षेत्रातले असोत ते ठाम आणि तत्पर निर्णय घेतात. त्यांच्या नेतं असण्याचं तेच मुख्य कारण असतं. निर्णय न घेता येणं , म्हणजेच गुलामी पत्करणं !अब्राहम लिंकनने स्वतःच्या निर्णयाप्रमाणे , जगण्याचं स्वातंत्र्य नसलेल्या गुलामांच्या मुक्तीचा , त्यांना बंधन मुक्त करण्याचा निर्णय घेतला . त्याला अनेकांचा विरोध होणार . कदाचित रणांगणावर हजारोंचा मृत्यू आणि स्वतः लिंकनलाही स्वतःच्या प्राणाचा मोल द्यावं लागणार . हेही गृहीत होतं. पण तरीही त्यांनी तो निर्णय घेतला. कारण त्यापाठीमागे होतं , साऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा निर्णायक स्वातंत्र्य देणारं अद्भुत कार्य !!
                                                          
Leadership Skill In Marathi



                     सॊक्रेटिसने विषाचा प्याला ओठाला लावण्याचा निर्णय घेतला , तो अजून जन्माला न आलेल्या पिढीला विचार , वाचा आणि निर्णयस्वातंत्र्य देण्यासाठी. सत्याशी तडजोड न करणाऱ्या निर्णायक तत्त्वशीलतेसाठी ! अशा एका-एका निर्णयांनीच जग घडवलंय !

                      तुमचाही एक निर्णय जग बदलवू शकतो. तुमचं आणि इतरांचही ! निर्णयातून जास्तीत जास्त काय होईल ? प्राण जाईल ? नाहीतर पप्राण असा तसा कधी ना कधी जाणारच आहे मग  ?

                      निर्णय घ्या... कदाचित जिवंतपणीच स्वर्ग अनुभवता येईल !!!

                                                 
प्रा.नितीन बानुगडे पाटील (इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने