यशाचा पासवर्ड (भाग :26) - जिज्ञासा (Curiosity)
जिज्ञासेतून मिळालेल्या ज्ञानातूनच विकासाच्या वाटा नी समृद्धीच्या लाटा निर्माण होतात...!
तशी सारीच माणसं झाडाखाली बसतात. झाडावरून पडणारी फळं पाहतात. पण फळ खालीच का पडतं ? याचा विचार ती करत नाही. एखाद्याचं न्यूटनला (Isaac Newton) हा प्रश्न पडतो. आणि त्यांच्या या जिज्ञासातून गुरुत्वकर्षणाचा शोध लागतो. त्या शोधावर मग अनेक कल्पनांचा जन्म होतो. कल्पना प्रत्यक्षात येतात नि मग विश्व अधिक विकसित होतं. माणसांच्या प्रगतीचा जन्म जिज्ञासातूनच होतो.
धडाधड पेटणारं लाकूड झटकुन संपतं ! लाकडं बराच वेळ जळत राहावी, म्हणून त्याच्यावर माती टाकतात. मग ती धुमसत राहतात. त्यांचे निखारे होतात. ते मात्र बराच वेळ फुलत राहतात. उष्णता देतात. शेकोटी समोर बसलेला जिज्ञासू एडिसन (Thomas Edison) यावर विचार करत होता. त्याला त्याच्या जिज्ञासेतून कळालं , जळत्या लाकडांवर माती टाकली , कि त्याला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा अखंडित होत नाही. त्यामुळं ती पटकन पेटून ती संपत नाही. कोळश्याच्या रुपाने ती फुलत राहतात. बस्स ! हीच कल्पना त्याने वापरली , एका निर्वात पोकळीच्या नळीत तार ठेवली. त्या तारेत विद्युत प्रवाह सोडला आणि काय आश्चर्य ? प्राणवायु नसलेल्या त्या नळीत ती तार जळाली नाही ; उलट तप्त होत नुसतीच फुलत राहिली . नळी प्रकाशमान झाली आणि विद्युत बल्बचा शोध पूर्ण झाला .
कोळसा पटकन का जळत नाही ? तो का फुलत राहतो. एडिसनच्या (Thomas Edison) या जिज्ञासेतून मिळालेल्या या उत्तराने पुढे जे निर्माण झाले , त्यानंतर सारं विश्व उजळून निघालं . एडिसन ने जुन्याच अस्तित्वात असलेल्या कल्पनेचा नव्याने वापर केला आणि अंधाराला पराभूत करणारा शोध लागला . आपल्या अवती-भोवती असणाऱ्या विश्वाचा , विश्वात घडणाऱ्या घटनांचा , नुसता वरवर नव्हे , तर खोलवर जाऊन शोध घेतला , तर जशी किनारयावर वाळू पसरलेली असते तशा अफाट कल्पना पसरलेल्या दिसतील . या कल्पना मुळातच अस्तित्वात आहेत.फक्त शोधण्याची जिज्ञासा हवी त्याच्याच बळावर विश्व विलक्षण समृद्ध होईल .
ज्याच्याकडे जिज्ञासा होती , त्यांनीच शोध लावले , हे संशोधक इतके मोठे झाले कि त्यांनी जगाला उपकृत करून टाकले . समुद्राच्या पोटात काय आहे ? आभाळाच्या उरात काय आहे ? वाऱ्यांच्या अंगात काय आहे ? या सृष्टीच्या पल्याड काय आहे ? या जिज्ञासातून पडणाऱ्या प्रश्नांतूनच अनेक कोडी उलगडली . नाहीतर आभाळात गडगडाट सुरु झाला , कि वरचा बाप चिडला म्हणून त्यांच्या शांतीसाठी धडपडणारे आदिमानव आजही आदिमानवच राहिले असते . विकासाच्या वाटा आणि समृद्धीच्या लाटा जगण्याला भिडल्याच नसत्या .
मोठी माणसं ती झाली , जी जिज्ञासू होती . यश त्यांना मिळालं , ज्यांना वारंवार प्रश्न पडत होते ; जे त्याच्या उत्तरासाठी झगडत होते . उत्तर सापडलं , तेव्हा विजयाने विलक्षण यश दाखवलं . त्याने नवं विश्व निर्माण केलं . आपली सावली पडल्याने माणूस बाटतो कसा ? हि जिज्ञासा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr.Babasaheb Ambedkar) मनात उमटली नसती . तर गावकुसाबाहेरचा ' मागास ' हा माणूस म्हणून गावात कधीच आला नसता !
जिज्ञासा सत्याचं रूप दाखवते . वास्तव नजरेसमोर आणते . ज्यांना कधीच प्रश्नच पडत नाही . हे असंच असतं , हे असंच चालायचंच , असंच जे म्हणत राहतात . पण हे असं का ? असा जिज्ञासाचा प्रश्नसुर ज्यांच्या मस्तकातून कधी बाहेरच पडत नाही ; ते कायम गुलामच राहतात . जगणं वैभवी करायचं असेल ; काही उज्वल निर्माण करायचं असेल ; मोठं आणखी मोठं व्हायचं असेल , तर प्रश्न पडू द्या . असंख्य प्रश्न पडू द्या. प्रश्न पडणं हे माणसांच्या जिवंतपणाचा लक्षण आहे..!
लहान मुलं असंख्य प्रश्न विचारतात. ती जिज्ञासू , चौकस असतात. त्यांना कुतूहल असतं. त्यांना माहिती करून घ्यायची असते. ती मोठ्या माणसांना विचारतात. मात्र मोठे उत्तर देण्याऐवजी त्यानांच दम देतात हे असंच असतं म्हणून त्यांना गप्प करतात. खरं तर , लहानग्यांची जिज्ञासा मारून टाकतात. उद्याच्या एखाद्या विलक्षण शोधाचं बीज तिथंच संपतं. मग हीच मूल मोठी होतात. त्याच्या मुलांवर हे असंच असतं म्हणून दर्डावतात. गुलामांच्या फॉऊंज पिढ्यान-पिढ्या घडत राहतात.
जिज्ञासा दाबू नका. ती खुलेपणाने फुलू द्या. सारंच पुस्तक वाचून कळतं नाही. बरेच अनुभवाने कळतं. जिज्ञासा अनुभव देते. अनुभव ज्ञान देतो आणि ज्ञान शक्ती देतं. शक्ती आत्मविश्वास देते आणि आत्मविश्वास यश देतो !
Khup chan sir tumchya👍 कडून खूप प्रेरणा भेटते
उत्तर द्याहटवा