यशाचा पासवर्ड (भाग :23) - संयम (Moderation)
प्रवास रस्त्यावरचा असो वा आयुष्याचा संयमानं चालणारी माणसंच यशाच्या मुक्कामी पोहचतात...!
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन अत्यंत पेटलं होत. यशवंतरावांच्या ( Yashwantrao Chavan) विरोधात वातावरण तापलं होत. याच दरम्यान पुण्यातल्या एका नाट्यगृहाचं उदघाटन त्रिभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते होतं. कार्यक्रम सुरु झाला. यशवंतराव चव्हाण बोलण्यासाठी उठले आणि तोच प्रेक्षकात बसलेल्या पुण्याच्या तत्कालीन नगरसेविका भीमाबाई दांगट उठून तीरासारख्या पुढे आल्या. त्यांनी हातातल्या बांगड्या काढल्या आणि त्या सरळ यशवंतरावांच्या दिशेने भिरकावल्या. कडाडल्या, सूर्याजी पिसाळा...ss ह्या बांगड्या भर आणि चालतो हो !
सारी सभा या प्रकाराने जागच्या जागी थिजली. इतका भयंकर अपमान ? कोणीही ह्या वाराने घायाळ झाला असता किंवा चवताळून उठला असता. पण यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan) शांत होते.
पोलिसांनी त्वरित भीमाबाईंना बाहेर नेलं. गोंधळ थांबून थोड्या वेळातच सभा पूर्ववत झाली. यशवंतराव ( Yashwantrao Chavan) पुन्हा बोलायला उभे राहिले आणि पहिलंच वाक्य त्यांनी उद्गारलं, ' जगातल्या कुठल्याही नाट्यगृहाचं उदघाटन इतक्या नाट्यमय रीतीने यापूर्वी कधीच झाला नसेल !'
आणि सारं सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं. यशवंतरावांनी सभा जिंकली. ती जिंकली त्यांच्याकडे असणाऱ्या विलक्षण 'संयमाच्या' जोरावर ! इतका अपमानास्पद प्रसंग घडूनही यशवंतराव स्थिर होते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रेमापोटी आलेल्या भीमाबाईंचा राग त्यांनी समजून घेतला. संयुक्त महाराष्ट्र व्हावा, हि यशवंतरावांचीही ( Yashwantrao Chavan) इच्छा होती. मात्र मागणीचे मार्ग भिन्न होते. भीमाबाई राग प्रकट करत होत्या. तर घाई-गडबडीत भविष्यात काही प्रश्न न उभे करणारा निर्णय होऊन संयुक्त महाराष्ट्र मिळावा, यासाठी यशवंतराव हे प्रकरण 'संयमाने' हाताळत होते. अखेर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापुढे आणि यशवंतरावांच्या ( Yashwantrao Chavan) कृतिशील संयमापुढं नेहरू झुकले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला !
आपल्या राजकीय प्रवासात यशवंतराव ( Yashwantrao Chavan) कमालीचे यशस्वी ठरले, ते त्यांच्या ठायी असणाऱ्या विलक्षण संयमामुळे..! क्षेत्र कोणतेही असो ' संयम ' फार मोलाचा असतो. माणसं क्षणात तुटतात. जोडण्यासाठी खूप काळ खर्ची घालावा लागतो. म्हणूनच आपला आपल्यावर वकूब असावाच. आपले बरेच प्रश्न, बरीच दु:ख हि आपल्याच त्वरित प्रतिक्रियांची किंवा कृतीची परिणीती असते. भावनेच्या भरात माणसं रागवतात. किंवा रागावलेल्यावर धावून जातात. नाती तुटतात. आपणच आपलं बळ कमी करत राहतो. नंतर वाटत राहतं. थोडा 'संयम' पाळला असता तर ?
माणसं दुसऱ्याच्या टीकेने व्यथीत होतात. निराशावादी बनतात. कमालीची कोसळून तरी जातात किंवा दुसऱ्याला ढासळून टाकण्याचा प्रयत्न करतात. दोन्ही घातकच ! संयामाअभावी माणूस 'अविचारी ' बनतो आणि संयम माणसाला 'विचारी' बनवतो.
समजूतदारपणा हे संयमाचं दुसरं नाव ! माणसं टिका करू लागली कि समजावं आपली प्रगती सुरु झालीय.
संयमी माणसं यशस्वी होतातच. त्यांचं ते यश चिरकाल टिकणारं आणि मजबूत बांधणीचं असते. कारण एखाद्या गोष्टीचा पूर्ण विचार करून त्याच्या क्रियेमागच्या कारणांचा शोध घेऊन परिणामांचीही जाणीव करून घेऊन मग प्रतिक्रिया देणं, कृती करणं हे संयमाचे काम ! संयम तुमचे धोके कमी करतो. तुम्ही कुणीही-कुठेही असा. संयम महत्वाचा. संयम न ठेवणारी , संयम न पाळणारी माणसं घाई-घाईत पुढे घुसतात आणि नंतर विलक्षण पस्तावतात. लवकर मुक्कामी पोहचण्याचा नादात अपयशाच्या द्वारी कायमच्या मुक्कामाला जातात.
प्रवास रस्त्यावरचा असो वा आयुष्याचा. धीरानं चालणारी माणसंच सर्वोत्तम यशस्वी होतात. 'संयम ' तुम्हाला धैर्यवान बनवतो. तुम्ही नुसते शौर्यवान असून चालत नाही. त्या शोर्याचा अचूक वापर करण्यासाठी योग्य वेळ साधनं. प्रसंगी चार पावलं पुढे जाण्यासाठी दोन पावलं मागे येणं. कितीही संकटं ढासळली. कितीही वेगात कोसळली तरीही मनाची चलबिचल न होऊ देता न डगमगता उभं राहणं. हे सारं तुमच्यातील धैर्य साधतं. शौर्यशील माणूस धैर्यशील असला तरच विजय गाठता येतो आणि टिकवताही येतो !
जे तुम्हाला नको आहे ते तुम्हाला गाठणारच आहे, हे 'नको ' ते टाळा ! जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. फक्त थोडा 'संयम ' पाळा ...!