यशाचा पासवर्ड (भाग :24) - उत्कृष्टता (Excellence)
उत्कृष्टतेचा ध्यासच तुम्हाला आपोआप सर्वोत्कृष्ट बनवतो...!
एक बांधकाम करणारा... ज्याच्याकडे प्रचंड काम. त्याला मागणीही भरपूर. बांधकाम क्षेत्रात तो अत्यंत नावाजलेला ! ज्याच्याकडे काम नाही , असा बांधकाम करणाराच त्याचा मित्र त्याच्याकडे त्याच्या या यशाचं रहस्य विचारण्यास आला. तो आला , तेव्हा हा एक भिंत बांधत होता. त्यात पुरता गुंतून गेला होता. अत्यंत काळजीपूर्वक आणि व्यवस्थित काम चालू होतं त्याचं ! काम दगडामातीचंच ; पण तेही तो अत्यंत नजाकतीने करत होता. एकेक वीट अगदी काळजीने बसवत होता. तसा त्याच्याकडे बघत बराच वेळ बसून वैतागलेला त्याचा तो मित्र त्याला म्हणाला , 'अरे , एवढ्या वेळेत मी दोन भिंती बांधल्या असत्या. अगदी स्वतःचच घर बांधत असल्यासारखा एकेक वीट पुनःपुन्हा तपासून अगदी व्यवस्थीत बसवतोय. अरे , या अशा कामात सांधा-चिरा जरा इकडे-तिकडे होणारच. त्यात एवढे काय बघायचं ? हे तर तुझं फुकटचं वेळ दवडनं झालं. माझा मात्र तुझं काम बघून भ्रमनिरास झाला. मी तर तुला बांधकामात मिळालेल्या यशाचं रहस्य विचारायला आलो होतो.'
तसा हा उद्गारला, 'अरे , हेच तर माझ्या यशाचं रहस्य ! जे करायचं ते उत्तम ! सर्वोत्तम ! उत्कृष्ट , अगदी अतिउत्कृष्ट ! जितकं चांगलं करता तितकं ! जितकं चांगलं देता येईल तितकं ! काम परिपूर्ण झाल्याशिवाय मला समाधानच मिळत नाही. मी गुणवत्तेशी प्रामाणिक राहतो. उत्कृष्टतेचाच ध्यास धरतो. बस्स , हेच ते रहस्य !'
तसा तो मित्र म्हणाला, 'अरे , पण एवढ काळजीपूर्वक काम करून तुला थोडंच मोबदला जास्त देणार आहेत ! का इथे तुझे नाव कोरून ठेवणार आहेत ?'
त्यावर याने उत्तर दिले , 'मित्रा , जी माणसं जेव्हढा मोबदला मिळतो , तेव्हढंच काम करतात. ती आहे तिथेच राहतात. जे मोबदल्यापेक्षा अधिक , अगदी अधिक देतात, ते मोठे होतात, पुढे जातात. मी तेच करतो. म्हणून मला इतकं काम असतं , कि मला वेळ पुरत नाही. आणि तुझ्याकडे भरपूर मोकळा वेळ असूनही तुला काम मिळत नाही. तुझ्यापेक्षा कदाचित मला भिंत बांधायला अधिक वेळ लागतो. पण हा अधिकचा वेळच मला सर्वोत्कृष्ट ठरवतो. उत्कृष्टता आपल्यापासून जवळच असते , पण माणसं मध्यम प्रतीशी तडजोड करतात आणि तळाशीच राहतात.
आणि मित्रा , आता राहिला विषय कामावर नाव कोरण्याचा ! तर आपलं नाव कोरण्याची गरजच पडली नाही पाहिजे. आपण कामच असं करावं कि, त्या कामानेच आपलं नाव सांगितलं पाहिजे ! बस्स.. मी तेच करतो. म्हणूनच लोक मला शोधत येतात. माझ्यासाठी आपलं काम थांबवून ठेवतात. ते मीच करावं असा अट्टहास धरतात. मित्रा , कमीत समाधान मानू नकोस. लोकांना तुझ्याकडुन अधिक मिळणार याची हमी दे. यश तुझ्याकडे धावत येईल. तू फक्त उत्कृष्टतेचा ध्यास धर. सर्वोत्कृष्ट आपोआप होशील !
आपलं कार्यक्षेत्र कोणतंही असो. आपण कोणताही कामं करत असा. जे काम कराल त्यात तुमचं सर्वस्व ओता. तुमचं शंभर टक्के योगदान द्या. उत्कृष्टतेचाच फक्त पाठपुरावा करा. अपयश कधीच वाट्याला येणार नाही. हल्ली नोकऱ्या मिळवणं जेवढं कठीण झालंय , त्याहीपेक्षा जास्त नोकऱ्या गमावणे सोपं झालंय. तुम्हाला नोकरी किंवा यश टिकवायचं असेल , तर फक्त तुमच्यातील उत्कृष्टताच ते साधू शकतं. माणसं सुरुवातीला झोकून देऊन काम करतात. नंतर रेंगाळतात. सवयीने पाट्या टाकायचं काम करतात. परिणामी अपयशी ठरतात.
लक्षात ठेवा , लोक तुमच्या कामावर नाही , तर तुमच्या कामाच्या उत्कृष्टतेवर लक्ष ठेवून असतात. एकापेक्षा एक अधिक दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करणाऱ्या कलावंताला त्याच्या यशाचं रहस्य विचारलं. तो म्हणाला , माझी प्रत्येक कलाकृती तयार करताना हि माझी शेवटचीच कलाकृती आहे , असं समजून मी काम करतो. कदाचित उद्या संधी नसेल. त्यामुळे माझी कलाकृती जेवढी म्हणून चांगली करता येईल तेवढी चांगली करतो. ती अविस्मरणीय बनवण्यासाठी झगडतो ! एवढंच !!!
तुम्ही नुसतं काम करू नका. प्रत्येक काम उत्कृष्ट करा. कारण उत्कृष्टताच सर्वोच्च स्थानी विराजमान असते !!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Tags:
यशाचा पासवर्ड