Sharad Pawar | तुम्हाला उत्तुंग ध्येय गाठण्यासाठी तुमच्याकडे शरद पवारांचा हा गुण हवा

 

यशाचा पासवर्ड (भाग :22) - वेळ  (Time -Occasion)

' अष्टावधानी ' माणसामागे 'अष्टोप्रहर ' पूर्ण सामर्थ्याने उभा असतो..!
   
                    मराठीच्या वा भाषेच्या प्रश्नपत्रीकेत प्रश्न असतो, काळ बदला ! वर्तमानकाळातील वाक्य देऊन सांगितलेलं असतं , याचा भूतकाळ करा ! भूतकाळातील वाक्य देऊन सांगितलेलं असतं , याचा भविष्यकाळ करा ! प्रश्नपत्रीकेतला काळ व्याकरणाने उत्तरपत्रिकेत बदलता येतो. पण वास्तव जीवनातला काळ मात्र बदलता येत नाही. तो पुढेही नेता येत नाही वा मागेही आणता येत नाही. 
 
                   क्षण एकदाच हाताशी असतो. तो त्यावेळी उत्कटतेने अनुभवला. सर्वोत्तमतेने वापरला. तर यश साकारता येतो. कुठलाही एखादा क्षण तुमचं अवघं आयुष्यच बदलू शकतो. प्रत्येक क्षणच तुमचं आयुष्य घडवत असतो. त्यामुळे कोणताही क्षण वाया जाऊ न देणं, हीच यशस्विता ! प्रत्येक क्षणाला मोल असतं. पण बेफिकीरपणे आपण वेळ वाया घालवतो. वेळ गेल्यावर कळतं, अरे , आपण उगाच वेळ घालवला. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आणि गेलेली वेळ कधीच परत आणता येत नाही. तुम्ही कुणीही असा. कितीही ताकदवान, कितीही श्रीमंत ! वेळ विकत घेता येत नाही. ती साठवता येत नाही. गोठवता येत नाही. थांबवता येत नाही. घड्याळ बंद करून ती वाचवताही येत नाही. ती धावत राहते फक्त...!
                                                     
पवारसाहेब  Sharad Pawar Latest News


 
                    आपलं आयुष्य किती , हे कुणालाच माहिती नसतं . हाती असलेल्या वेळेचा पुरेपूर वापर करणं मात्र आपल्याच हाती असतं. तुम्ही तुमच्या एका मिनिटांचं काय करता यावर तुम्ही तुमच्या आयुष्याचं काय करणार , ते ठरत असतं. ज्याला क्षणाची किंमत कळत नाही , त्याला आयुष्याची किंमत उमजत नाही. वेळ अशी तशी निघून जाणारच असते. पण तत्पुर्वी ती साऱ्यांनाच सामान लाभते. तुम्ही श्रीमंत असा वा गरीब. सबल असा वा दुर्बल. तुम्ही कोणीही असा. प्रत्येकाला दिवसाचे चोवीस तासच मिळतातच. प्रश्न असतो , तो ते कोण कसे खर्च करतो ? यश-अपयश त्यावरच अवलंबून असतं. वेळेचा कमीत कमी अपव्यय आणि वेळेचा अचूक वापर करणं ज्याला जमतं , त्यालाच यश साधतं. 
 
                     वेळ घालवण्यासाठीही ज्यांच्याकडे वेळ नसतो ती माणसं यशस्वी होतात. आणि भरपूर वेळ असूनही काम करायला वेळ नसणारी माणसं अपयशी ठरतात. माणसं सातत्याने वेळ नाही , वेळ नाहीचा घोषा लावत असतात. 
 
                      देशाचे जेष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) , दिवंगत जेष्ठ पत्रकार माधव गडकरी आणि प्रतापराव पवार यांची चर्चा सुरु होती. अचानक माधव गडकरींच्या लक्षात आलं आपण बोलत आहोत, पण शरद पवार साहेब ( Sharad Pawar ) फायली तपासण्यात मग्न आहेत. न राहवून त्यांनी विचारलं , साहेब आपण फायली पाहत आहात. आम्ही नंतर येऊ का ? तसे पवारसाहेब ( Sharad Pawar ) म्हणाले , नाही.. नाही... माझं लक्ष आहे तुमच्या बोलण्याकडे ! यावर विस्मयीत झालेले गडकरी म्हणाले , असं कसं ? तुमचं आमच्या बोलण्याकडे लक्ष असेल , तर मग फायलींकडे नसणार ! एकाचवेळी दोन गोष्टी कशा साधतील ?
                                     
sharad pawar Latest News Marathi


          
                       'पण मी साधतो ' असे म्हणत पवारसाहेबांनी ते आतापर्यंत काय बोलले तेही सांगितलं आणि मघापासून पाहिलेल्या फायलीत काय आहे , कोणते शेरे मारले. कुठे सह्या केल्या. तेही सांगितलं. त्यावर अविश्वासाने गडकरींनी फायली चाळून पाहिल्या आणि त्यांनी विलक्षण चकित होऊन विचारलं, ' एकाच वेळी तुम्हाला दोन ठिकाणी अवधान देणं साधतं कसं ?' त्यावर पवारसाहेब म्हणाले, ' फक्त दोनच नव्हे, एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष देत मी अवधानाने अनेक कामं करत असतो. हे मी प्रयत्नांनी साधलंय...' 
 
                         तुम्हाला अफाट काम करायचं असेल, तर वेळही अफाट हवा. वेळ कमी असतो. एकाचवेळी एकच काम केलं तर तुम्ही फार पुढे जाऊ शकणार नाही. सर्वसामान्यपणे जे कार्य करायला चार-पाच आयुष्य लागतील, ते काम एकाच आयुष्यात करायचं असेल , तर एकाच वेळी चार-पाच गोष्टी करता यायलाच हव्यात. कमी वेळेत, एकाच वेळी अनेक कामं करता आली पाहिजेत. प्रगती करायची तर काळावर स्वार होऊन वेळेला हरवून मागे टाकून पुढे जायला हवं. त्यासाठी वेळेचा वापर व व्यवस्थापन आवश्यक असतं. 
                  तुम्ही काळापेक्षा वेगाने पुढे सरकलात तर काळही तुमचा गौरव करतो ; अष्टवधानी माणसामागे 'अष्टोप्रहर ' पूर्ण सामर्थ्याने उभा राहतो ! 
 
                                                          


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने