यशाचा पासवर्ड (भाग :19) - नाविन्य
" रुळलेल्या वाटेवरून चालणारांची पावलं गर्दीत हरवून जातात.
मात्र जे स्वतःच नवे रस्ते तयार करतात ते काळावरच आपली पदचिन्ह उमटवतात...!! "
टोपीवाला आणि माकडांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे.आता त्याचा पुढचा भाग. या टोपीवाल्याचा नातू पुढे टोप्यांचा व्यापार करण्यासाठी निघाला, तेव्हा या आजोबाने त्याला सांगितलं ,'प्रवास करत त्या जंगलात जाशील. तिथे विश्रांतीसाठी थांबशील, तेव्हा तिथली माकडं तुझ्या टोप्या पळवतील. तेव्हा गांगरून जाऊ नकोस. लक्षात ठेव,ती माकडं आपलं अनुकरण करतात ! तेव्हा जसं तू त्यांच्यासमोर काही करशील तसंच तेही करतील. म्हणून शेवटी तू तुझ्या डोक्यावरची टोपी काढ आणि खाली फेक. ती माकडंही तसंच करतील. बस्स ! त्या टोप्या गोळा कर !'
आजोबांचे हे अनुभवी बोल ऐकून हा नातू टोप्या विकण्यास निघाला. त्या जंगलात विश्रांतीसाठी विसावला, तेवढ्यात माकडांनी त्याच्या टोप्या पळविल्या. तेव्हा त्याने त्याच्या आजोबानी जसं सांगितलं होतं, तसंच केलं. पण माकडं टोप्या देईनात. त्याने पुन्हा-पुन्हा डोक्यावरची टोपी काढून खाली फेकली. पण काही केल्या माकडं टोप्या फेकेनात. तो वैतागला. डोक्याला हात लावून बसला. अचानक एक माकड त्याच्या पुढ्यात आलं नि म्हणालं, 'तुला काय वाटलं, तुला एकट्यालाच आजोबा आहेत ? तुला जसं पढवलंय आजोबानी तसंच आम्हालाही आमच्या आजोबानी शिकवलंय. फरक एवढाच आहे कि, तुझ्या आजोबांनी तुला जुनंच शिकवलं; आमच्या आजोबांनी मात्र आम्हाला नवं शिकवलं, तर कुणाचं अनुकरण करू नका..!'
अनुकरणातून प्रतिभासंपन्न कलाकार निर्माण होत नाही, तिथे फक्त नकलाकार तयार होतो. इतरांचं अनुकरण करण्याने आपली स्वतंत्रपणे कार्य करण्याची शक्तीच गोठते. सृजनातम्क निर्मितीचं सामर्थ्य हरवतं. संशोधनवृत्ती अविकसितच राहते.मनातली कल्पकता अपंग ठरते. नक्कल करण्याने आपली ओळख आणि योग्यताच पुसली जाते. एका ठराविक मर्यादेपर्यंत अनुकरण जरूर करावं. आपल्याला चालणं जमेपर्यंत मोठ्यांचं बोट जरूर धरावं. पण एकदा चालणं जमलं, कि आपण आपल्या मार्गाने चालावं. आपल्या कल्पनेचं विश्व बहरू द्यावं. जे रूळलेल्या , मळलेला वाटेवरून प्रवास करतात त्यांची पावलंही गर्दीत हरवून जातात. मात्र जे स्वतः भूमी खोदून नवे रस्ते तयार करतात, ते काळावरच आपली पदचिन्ह उमटवतात.
प्रगतीचे नवे मार्ग हे जुन्या चाली-रीती, रूढी परंपरा उद्ध्वस्त करूनच बनवता येतील. हे जग अहित साधणाऱ्या आणि शून्य उपयोगिता असणाऱ्या रूढी-परंपरांना कवटाळून बसणाऱ्यानी नव्हे, तर या रूढी-परंपरा नवं निर्माण करणार्यांनीच सुंदर केलं आहे. ज्यांनी रुळलेला वाटांचा त्याग केला; पूर्वजांनी सांगितलेल्या अकल्याणकारी परंपरेला विरोध केला. त्यांनी स्वतंत्र्यपणे , मुक्तपणे , कल्पकतेने नवे मार्ग शोधून काढले. तेच मानवतेचे मार्गदर्शक झाले. हे सारं धाडसाने करतांना त्यांना विरोध झाला. त्यांचा उपहास केला गेला. ते मूर्ख गणले गेले. वेडे ठरविले गेले , पण तरीही त्यांनी आपली नवी पद्धत, नवी योजना, नवा विचार, नवी शैली यांना सामर्थ्यविश्वासावर पुढे नेलं. तिच आजच्या जगात सुख-शांतीची शिदोरी ठरली. त्यांनीच जगण्याला बळ दिले. काळाने त्यांचं जगावरील ऋण मान्य केलं. ते नव्या संस्कृतीचे ते सूर्य ठरले. म्हणूनच इथं स्मृतिस्मारकं रूढी पाळणाऱ्यांची नाही; तर रूढी तोडणाऱ्यांचीच झाली.
जग चाललं आहेच. नवं कशाला हवं ? असं म्हणून शास्त्रज्ञांनी शोध लावलेच नसते, तर जग आजही आदिमानवांचीच वस्ती राहिलं असतं. जुन्यातलं चांगलं जरूर वेचून घ्यावं , पण जे आंधळेपणाने जुन्याचा ध्यास धरतात; ते अल्पायुषी ठरतात ! जे नाविन्याचा प्रवास करतात, ते चिरंजीव होतात. अनुकरणप्रिय माणसं कायम खुजीचं राहतात, तर नवनिर्मितीचे उपासक मानवतेचं नेतृत्व करतात.
अशी अद्वितीय माणसं एकमेवाद्वितियच असतात. करायचं झालं अनुकरण, तर त्यांच्या नाविन्याचा शोध घेण्याचा वृत्तीचं करा. कार्यात झोकून देणाऱ्या त्यांच्या झपाटलेपणाचं करा ! उद्याच्या सुंदर जगाचे तुम्ही शिल्पकार असाल...!!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
३ ) पुढे दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा लिहा . शब्द - टोपीविक्या माकड , पेटी रिकामी माकड हसणे न फसणे टोपीविक्या निराश - - - -
उत्तर द्याहटवा