यशाचा पासवर्ड (भाग :21) - स्वावलंबन (Self Reliance)
दुसऱ्यावर अवलंबून असणारी माणसं कधीच मोठी होत नाही..
एक चित्रकार रस्त्यावर, रस्त्याकडेच्या भिंतीवर कुठेही चित्रं काढायचा. त्याची ती अप्रतिम चित्रं पाहून माणसं भारावून जायची. मात्र काही धूर्त माणसं त्या चित्रांचे फोटो काढून फ्रेम करून स्वतः ची म्हणून विकायची. पैसा कमवायची.
एकदा एकाने त्या चित्रकाराला सांगितले, 'अहो, तुम्ही इथेतिथे चित्र काढता आणि लोक तुमच्या चित्रांचे फोटो काढून विकतात. अशाने विकणारे मोठे होतील आणि या चित्रांचे निर्माते असूनही तुम्ही मात्र आहात तसेच राहाल. तुम्हाला याची भीती नाही वाटत का ?'
त्यावर चित्रकार म्हणाला, 'मला भीती वाटायचं काय कारण ? भीती त्यांना वाटायला हवी. कारण ते माझ्यावर अवलंबून आहेत. उद्या मी अशी चित्रं काढणं बंद केलं , तर ते कोसळतील. मी नाही ! आणि ती माणसं माझी चित्रं नेतील; पण चित्र चितारणारे माझे हात आणि त्या हातांना प्रेरणा देणारं माझं अंत:करण , ते कसे हिरावून नेतील ? माझा माझ्या हातांवर आणि अंत:करणाच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे ! ते भिंतीवरची माझी चित्रं नेतील; माझ्या अंत:करणातली नाही !'
सामर्थ्य बाहेरून नाही , स्वतः च्याच अंत: करणातून निर्माण होते. दुसऱ्यावर अवलंबून असणारी माणसं कधीच मोठी होत नाहीत. मोठी ती होतात जी कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहात नाहीत. यश मिळवायचं असेल , जिंकायचं असेल तर स्वावलंबी बनावंच लागेल !
पण माणसं वारंवार आधार शोधतात. इतरांच्या बळावर, इतरांच्या खांद्यावर उभं राहून मोठं व्हायचं प्रयत्न करतात. ते खांदे बाजूला निघाले कि, ढासळतात. पण हे कळत असूनही माणसं अपयशाच्या सबबी सांगतात, मी गरीब घरात जन्माला आलो. आम्हाला साधनंच उपलब्ध नव्हती. शाळाच चांगली नव्हती. नोकरीच अशी खत्रूड कि काही करताच आलं नाही. पळायचं होतं पण बुटच मिळालं नाही. वगैरे वगैरे. हि सारी कारणं सांगून माणसं आपल्या परावलंबित्वाची साक्ष देतात. अशा मानसिक कुबड्या घेतल्याशिवाय आम्ही चालूच शकत नाही. वास्तवीक आम्ही विसरतो कि, कुबड्या या लंगड्या माणसांसाठी असतात ; धडधाकट माणसांसाठी नाही. जी माणसं स्वतःच स्वतःचा आधार बनतात, त्यांना इतरांचा आधार लागत नाही. स्वतःच स्वतःची सामर्थ्य बनणारी माणसंच यशस्वी होतात.
रणांगणात शस्त्र नाहीत , म्हणून शांत बसलेल्या सैनिकाला सारं देऊन सांगितलं, आता तरी लढ ! तर तो म्हणाला, ' लढू कसा ?आता एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे. दोन्ही हात गुंतलेत लढणार कसा ? अरे, मग लढता येत नसेल तर मरशील इथंच. जा ! पळून तरी जा ! त्यावर तो उत्तरला, ' अहो , पळणार तरी कसा ? घोड्यावर बसलोय दिसत नाही का ? '
तुम्हाला सारं मिळालं तरी लढण्याची वृत्तीच अंत: करणात नसेल तर उपयोग काय ? संत तुकाराम एका दृष्टांतात सांगतात , ' तुम्हाला बाहेरून कुणीच मदत करू शकत नाही. ती तुम्हाला तुमच्या आतूनच करावी लागते. तरच जिंकता येतं ! परावलंबित्वात या आंतरिक शक्तीचा विकास होत नाही. आंतरिक शक्ती हि स्वावलंबनातूनच कमावता येते . '
अब्राहम लिंकनला विचारलं , तुमच्या यशाचं रहस्य ? लिंकन उत्तरला , ' माझं दारिद्रय ! मला घडविलं जंगलातील झोपडीतल्या माझ्या एकट्याच्या वास्तवाने ! मला तिथे मदत करणारं कुणी नव्हतंच. माझ्या मदतीसाठी फक्त मीच होतो. मी स्वतः वर अवलंबून राहणं तिथं शिकलो. त्यातूनच मला माझ्या आंतरिक शक्तीचा-सामर्थ्याचा आणि योग्यतेचा शोध लागला. दुसरीवर आजिबात अवलंबून न राहण्याची सवय , हेच माझ्या यशाचं कारण ! तुम्ही जितके कमीत कमी इतरांवर, साधनांवर अवलंबून राहाल , तितके मोठे होत जाल. ज्यांनी अफाट कार्य केलं , ती माणसं परिस्थीवर , कुठल्याही साधनांवर अवलंबून नाही राहिली. त्यांनी स्वतःच स्वतःची साधनं निर्माण केली. त्यांनी कोणाची वाट बघितली नाही. ते परिस्थितीचे मिंधे झाले नाहीत. कुणाच्या मदतीचे आश्रित राहिले नाहीत. कुणीतरी वाट तयार करावी. मग आम्ही चालू , असं ते म्हणाले नाहीत. त्यांनी स्वतःची स्वतःच निर्माण केली. काळावर कर्तृत्वाची मुद्रा उमटवली ! तुम्ही कोण आहात यावर नाही , तर तुम्ही काय करता यावर तुमचं मोठेपण ठरतं !!!