यशाचा पासवर्ड - भाग ९
( निर्भयता- Fearlessness )
भिणाऱ्यांना कुणीही भिती घालतं...निर्भयापुढे मात्र जग झुकते
Cover Topics In This Article
1) यश आणि आपण यामध्ये फक्त भीती उभी असते.
2) मराठी माणसाला व्यापार जमणारच नाही ??
3) अंधविश्वास आणि अंधश्रद्धा याचा जन्मही भीतीतून होत असतो.
4) यशाचा किनारा गाठायचा, तर थोडासा धोका पत्करावाच लागेल.
यश आणि आपण यामध्ये फक्त भीती उभी असते. भीतीची हि भिंत ढासळायचा अवकाश; पुढचं यश लख्ख दिसू लागतं. माणसं अपयशाची अनेक कारणे देतात. मात्र या सबबीमागे मुख्य असते, ती भीतीचं...! पण माणसं हे वास्तव कधीच मान्य करत नाहीत. मी कुणाला घाबरत नाही ! मला कशाची भीती वाटत नाही ! अशा उसन्या बोलांनी खरं तर, ते आपल्याला वाटणाऱ्या भीतीवर पांघरून टाकत असतात.
आपल्याला जे करायचे आहे, ते करण्यासाठी अंगी धाडस नसतं, हेच अपयशाचं खरं कारण आहे. धाडस नसणं म्हणजेच भीती वाटणं ! खरं तर, यशाच्या दिशेने चालण्यासाठी आपल्याला कुणीच कधी विरोध करता नसतं. आपणच माघारी फिरत असतो ! उच्च पदावर पोहोचल्यावर आपल्याला सारखं इंग्रजीतून बोलावं लागेल. आणि ते जमेल का ? असा विचार करत इंग्रजीची भीती घेतलेल्या एकाने उच्च पदाची संधीच नाकारली. त्याने स्वतः च्या यशाचा मार्ग रोखला. अपयशाचीच नव्हे; माणसांना यशाचीही भीती वाटत असते. तीच भीती माणसांच्यात आत्मविश्वास आणि आत्मसन्मान संपवून हरल्याची भावना निर्माण करते.
2) मराठी माणसाला व्यापार जमणारच नाही ??
वास्तविक, या जगात घाबरण्यासारखं काहीच नाही. आपण घाबरावं अशी एक गोष्ट आहे... ती म्हणजे भीती ! या भीतीवर विजय मिळवता आला, कि कोठेही जा जय मिळवणारच ! पण उत्साह वाढवण्यापेक्षा, अंगी धाडस बाणवण्यापेक्षा माणसं भीतीच जास्त घालतात. काही वेगळं, नवं करायला कुणी निघाले कि भीती घातली जाते. उद्योगातील अनिश्चितता किंवा एखाद्या क्षेत्रातील धोके किंवा अगदी मराठी माणसाला व्यापार जमणारच नाही, अशा भूमिका माणसांच्या मनात भीती निर्माण करतात. मुलांच्या अर्धजागृत मनावर तर अशी भीती कायमची ठाण मांडून बसते. आणि मोठेपणी तिच त्यांना काही वेगळं करण्यास, धाडसी बनण्यास परावृत्त करत राहते. सायकल शिकू का ? तर 'पडशील !' व्यवसाय करू का ? तर 'बुडशील !' अशा भीतीदायक संस्कारानी माणसं कशी घडशील ? मग ती अपयशी ठरतात आणि अपयशी ठरली, कि पुन्हा भीती सोडून त्याची कारणं दुसरीकडे शोधली जातात.
3) अंधविश्वास आणि अंधश्रद्धा याचा जन्मही भीतीतून होत असतो.
मग अगदी त्यांची जन्मकुंडलीही कुणा ज्योतिषी-बाबा-महाराजांना दाखविली जाते. तो सांगतो, 'तुमचा काळ फिरलाय, ग्रह बदललेत . शांती करावीच लागेल. नाहीतर अनिष्ठ परिणाम होतील !' म्हणजे पुन्हा भीतीच ! अंधविश्वास आणि अंधश्रद्धा याचा जन्मही भीतीतून होत असतो. वास्तविक, आपल्याला वाटणाऱ्या भीतीच कारण बाहेरचं जग कधीच नसतं. आपल्या भितीचं कारण आपण स्वत: च असतो. घटना घडण्या अगोदरच संकट येण्या अगोदरच आपण आपल्या कल्पनेचं भयाण चित्र रंगवत त्याचा एव्हढा मोठा बाऊ करतो, कि बस्स..! प्रत्येक छोट्या संकटालाही आपण इतकं मोठं करून बघतो, कि त्यातून निर्माण होणाऱ्या निर्थक भीतीतूनच आपण माघे खेचले जातो.
4) यशाचा किनारा गाठायचा, तर थोडासा धोका पत्करावाच लागेल.
पाठीशी उत्तम प्रशिक्षक असताना, तो आपल्याला बुडू देणार नाही याची खात्री असतानाही पहिल्यांदा पाण्यात उडी मारताना भीती वाटतेच. आपण ती उडी टाळायचा केविलवाणा प्रयत्नही करतो. ते शक्य न झाल्याने अखेर पाण्यात बुडतो. छाती धडधडते. नाका-तोंडात पाणी गेल्याने श्वास गुदमरतो... पण पर्यायच नसल्याने अखेर हात-पाय मारतो. त्या बेभान धडपडीच्या फटकाऱ्यांनी पाणी हरतं. पाण्यावर स्वार होणं जमू लागतं. प्रयत्नाने पोहणं साधतं. पाण्यावर विजय मिळविला जातो. नंतर वाटतं, ' सुरुवातीला उगाच घाबरलो आपण ! मग कळतं , बाहेरची परिस्थिती नाही मनातील भीतीच आपल्या पराभवाला कारणीभूत असतं. पण समजा, त्या भीतीवर विजय न मिळवता भीतीनेच तुमच्यावर विजय मिळवला असता तर ? ते पाणी आयुष्यभर तुम्हाला तुमच्या अपयशाची जाणीव करून देत भीतीच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं.
आयुष्याचा उधाणलेला समुद्र पार करून यशाचा किनारा गाठायचा, तर थोडासा धोका पत्करावाच लागेल. भीतीवर विजय मिळवून धाडसी बनावंच लागेल. कारण भिनार्याला सारेच भय दाखवतात तर निर्भय माणसाला संकटसुद्धा झुकून मुजरा करतात ! तुम्हाला कोण होणं आवडेल ???
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
🙏🏻🙏🏻👏👏👏👏
उत्तर द्याहटवा