तुमची चिकाटीच तुम्हाला यशस्वी करते. कारण चिकाटीची जागा दुसरा कोणताच गुण घेऊ शकत नाही. Nitin Banugade Patil Website

 यशाचा पासवर्ड (भाग : 16 ) - चिकाटी 

कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणं ही चिवट चिकाटीचं यश देते...!

      आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करताना अडथळे येणारच आहेत. प्रत्येक वेळी नकार मिळणार आहे. पण अडथळे आले, नकार मिळाला म्हणून माघार घेणं, हेच असतं अपयशाचं खरं कारण ! मात्र माघार न घेता सातत्याने पुढे जात राहाणं, हे यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. तुमचं सातत्य हेच तुम्हाला होणारा विरोध मोडून काढतात. तुमची चिकाटीच तुमचे अडथळे दूर करते. जगात कुठल्याही प्रतिभेपेक्षा, बुद्धिमत्तेपेक्षा, विद्ववतेपेक्षा तुमचं सातत्य, तुमची चिकाटीच तुम्हाला यशस्वी करते. कारण चिकाटीची जागा दुसरा कोणताच गुण घेऊ शकत नाही. 

                                                 
माघार न घेणं


                       पाच किलोमीटर धावण्याचा शर्यतीत सारेच धावपटू कसलेले होते, पण त्यापैकी एकच विजेता ठरला. त्याला विचारलं, 'तू विजयी व्हायचं कारण ?' त्याने उत्तर दिले,' मी थांबलो नाही !'

                         कुठेही न थांबणं हेच यशाचं रहस्य ! जी माणसं थांबतात ती संपतात ! यश मिळवायचं तर मुक्कामी पोहचल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय माघारी फिरू नका. मिळवल्याशिवाय प्रयत्न सोडू नका. सातत्याने धडका देत राहा. दरवाजा ठोठावत राहा. जोपर्यंत तो उघडला जात नाही किंवा मोडून पडत नाही. कारण त्यापलीकडेच तुमच्या स्वागताला यश उभं असतं ! तुम्ही बलदंड नसाल, ताकदवान नसाल. काही हरकत नाही. फक्त चिकाटी सोडू नका. कारण चिकाटीपेक्षा ताकदवान कुणीच नाही. सतत पडणारं पाणी दगडालाही झिजवून टाकतं. 

                                             
पाच किलोमीटर धावण्याचा शर्यतीत सारेच धावपटू


                          हजारो मैलाचा प्रवास एक पावलानेच सुरु होतो. तुम्ही सातत्याने फक्त एक-एक पाऊल पुढे टाका... पोहोचून जाल ! अडथळे येतील; पण चालत राहा. खडे टोचतील; उचलून बाजूला टाका. चालत राहा ! खड्डे येतील उडी मारून पुढे जा. डोंगर लागेल; वळसा घाला. पुढे जा चालत राहा. पुढेच ध्येय आहे. मिळवून टाका ! सातत्याला,चिकाटीला दुसरा पर्यायच नाही. हि चिकाटी प्रबळ इच्छाशक्तीतून निर्माण होते. इच्छेला चिकाटीची जोड मिळाली कि, त्याचं यशात रूपांतर होतं. समोर ध्येय हवं. निश्चित योजना हवी. योजनेला दिशा हवी. दिशेला मार्ग हवा मार्गावर चालण्यासाठी अविचल मनोधैर्य हवं. मनोधैर्याला आत्मविश्वास हवा. तो सातत्यातून येतो. चिकाटीतून लाभतो !

                                                       


                          सर्वोत्तम अभिनेता अमिताभ बच्चन हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण. अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी अमिताभ मुंबईत आला. अनेक निर्मात्यांचे उंबरठे झिजवू लागला. पण त्यांची ताडमाड उंची आणि किरकोळ शरीरयष्टी पाहून त्याला कोणी कामच देईना. पण तो झगडत राहिला. असंख्य नकार पचवत राहिला. या काळात त्याने आकाशवाणीच्या निवेदक पदासाठी मुलाखत दिली. पण तिथेही त्याचा आवाज नाकारला गेला. तो अपात्र ठरला. पण धडपडत राहिला. कुठे संधीचं दार किलकिलं दिसलं, कि तो आत घुसायचा प्रयत्न करायचा. पण व्यर्थ ! अखेर त्याचा धडकांना यश आलं. त्याला किरकोळ भूमिका मिळाल्या. त्याने त्याचं सोनं केलं. त्याचा 'आनंद ' हा चित्रपट गाजला त्या धडपडातून त्याला जंजीर मिळाला आणि १९८० च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत अँग्री यंग मॅन अमिताभ युगाचा आरंभ झाला. जरा यशाची चव चाखतो न चाखतो तोच त्याला कुली चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला. मृत्यूशी झुंज घेऊन तो माघारी आला. पण त्याने माघार घेतली नाही. तो पुन्हा लढत राहिला. त्याची एबीसील कंपनी दिवाळीखोरीत निघाली. तो आर्थिक दृष्ट्या खचला. पण त्याने स्वतः ला खचू दिले नाही. रस्ता बदलला नाही. चालत राहिला. अनेक शाररिक आजारांनी त्याला घेरलं. पण त्यात तो अडकला नाही तो सातत्याने पडद्यावर गर्जत राहिला. अखेर संकटं हरली. अपयशी ठरली. अनेकांना करोडपती बनवणारा अमिताभ यशस्वी महानायक ठरला..!                           

                                      
amitabh bachchan Marathi Information


                  त्याच्यात प्रतिभा आहे. बुद्धिमत्ता आहे, अफाट अभिनय क्षमता आहे. पण त्याहून जास्त त्याच्यात सर्वोत्तम यश मिळवून देणारी, कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणारी वृत्ती म्हणजेच विलक्षण चिकाटी आहे ! यश मिळतंच पुढे जात राहा. फक्त लक्षात ठेवा, यशाकडे नेणाऱ्या गाडीला रिव्हर्स गेअर नसतो...!!

                                              
Patil Marathi Information

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने