यशाचा पासवर्ड (भाग : १४) - संधी
" संधी कायमच आपल्या दारात ठाण मांडून असतात....
अवकाश फक्त आपण दार उघडण्याचा असतो...."
जी माणसं संधीची वाट पाहतात प्रत्येक क्षण वाया घालवतात ती अपयशी होतात. पण ध्येय निश्चित असेल तर संधीची गरजच काय...? सरळ कृतीशील व्हावं ! पण माणसं संधी-संधी करत राहतात. हाती संधी आली, तरी ती छोटी म्हणून सोडून देतात. मोठ्या संधीची अपेक्षा ठेवतात शेवटी निष्क्रियतेचीच धनी होतात.
वास्तविक संधी म्हणजे तरी काय ? तर तुम्हाला जे करायचे आहे त्यासाठीची अनुकूल वेळ....! वेळ कधीच चांगली किंवा वाईट नसते परिस्थिती अनुकूल असेल, तर वेळ चांगली आणि परिस्थिती प्रतिकूल असेल, तर ती वाईट ठरते. त्यामुळे संधी नाही असे मानणं हेच मुळात चुकीचं आहे.
प्रत्येक समस्या हीच खरी संधी असते. संधीच अडचणीचं रूप घेऊन येत असते. समस्या जेवढी मोठी.. तेव्हढीच संधीही मोठीही असते. गरीब असणं हि श्रीमंत होण्याची उत्तम संधी नव्हे का ? खरं तर तुम्ही काहीच नसणं, हि तुमच्यासाठी काहीतरी बनण्यासाठीची उत्तम संधी असते.
जिथे काटेरी झुडुपं आणि बाभळींशिवाय काही उगवतच नाही; तिथे काही चमत्कार घडावे काही चांगले उगवावं, त्यातून मग जगणं साधावं, असं म्हणत तिथली माणसं संधीची वाट पाहात नाही बसली. उलट जे आहे त्यातच त्यांनी संधी शोधली; त्यांना उमजलं इथे बाभळी आहेत. बाभळीला डिंक आहे. डिंक हीसुद्धा गरजेची गोष्ट आहे. माणसं कामाला लागली. डिंक कमावू लागली त्यातूनच त्यांनी इतकी प्रगती साधली कि, साऱ्या जगाला डिंक पुरवू लागली. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी डिंकानेच मजबूत केली, तो सुदान देश ! किंवा पाणीच नाही तर शेती कुठली ? असं म्हणत पाणी येईल या आशेवरच ज्यांनी पाणी फिरवलं आणि स्वतः च्या कार्यसिद्धीने पाणी कमावून समृद्ध बागायती कृषिप्रगत देश म्हणून नाव कमावलं तो इस्राईल देश, हे याचं उत्तम उदाहरण आहेत.
जे नाही त्यासाठी रडत बसायचं आणि जे आहे त्याकडे दुर्लक्ष करायचं यावृत्तीने माणसं अपयशी ठरतात. उपलब्ध संधीचं सोनं करण्याऐवजी सोन्यासारखी संधी दवडत राहतात. वास्तविक,संधी कायमच आपल्या दारात ठाण मांडून असते.फक्त आपण दार उघडायचा अवकाश ! संधी ओळखता येणं,हे सर्वात महत्वाचं...!
आदिवासी राहात असलेल्या जंगली भागात चपलांसाठी बाजारपेठ आहे का, हे पाहण्यासाठी एका चप्पल उत्पादक कंपनीने आपल्या सेल्समनला पाठवलं. सेल्समन आदिवासी भागात गेला. परत येऊन सांगू लागला, 'आपल्या चपलांना तेथे अजिबातच बाजारपेठ नाही. कारण आदिवासी लोक चपलाच वापरत नाहीत.'
कंपनीने दुसऱ्या सेल्समनला पुन्हा त्याच भागात पाठवलं, तेव्हा तो मात्र पुन्हा येऊन सांगू लागला, 'आपल्याला तेथे १०० टक्के सर्वोत्तम नफा मिळवण्याची सर्वोत्कृष्ट संधी आहे. कारण ते आदिवासी लोक चपलाच वापरत नाही. पण त्या जंगली भागात फिरताना त्यांना चपलांची गरज आहे. शिवाय तेथे आपल्याला कुणीही प्रतिस्पर्धी नाही. म्हणजे तिथे सारी बाजारपेठ आपल्यालाच खुली आहेत. आपल्या चपलांची उपयुक्तता समजावी, त्यांना सवय लागावी म्हणून मी येतानाच काही चपलाही आदिवासींना वाटून आलो आहे. त्यांची आजची सवय उद्याची गरजच बनेल.'
भाग तोच पण नजर वेगळी ! साधी शोधण्यासाठी फक्त डोळ्यांचाच नाही, डोक्याचाही वापर करावा लागतो. त्यासाठी डोकं तयार हवं. ते आभ्यासाने, व्यासंगाने तयार करता येतं. आपण आपल्या क्षेत्रातले सर्वोत्कृष्ट झालो, कि सर्वोत्कृष्ट संधी स्वतः हुन आपल्याकडे येतात. संधी येत नाही याचा अर्थ अजून आपण सर्वोत्कृष्ट झालो नाही, असाही होऊ शकेल.
जे इतरांपेक्षा काही वेगळं करतात, इतरांपेक्षा अधिक करतात, सातत्याने इतरांपेक्षा अधिकाधिक देण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच संधी गवसते...!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Tags:
यशाचा पासवर्ड
यशस्वी होण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे
उत्तर द्याहटवा1:-सकारात्मक विचार
2:-मनात विश्वास
3:-सय्यम ठेवून कृती
Yes
हटवा