जेव्हा रात्री अडीच वाजता एक पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी येतो तेव्हा | Nitin Banugade Patil Blog
byProf. Nitin Banugade Patil•
0
यशाचा पासवर्ड (भाग :18 ) - मेहनत
तुम्हाला असामान्य यश हवं असेल तर मेहनतही असामान्यच घ्यावी लागेल..!
यशस्वी माणसं प्रचंड काम करतात आणि प्रचंड काम करणारी माणसंच यशस्वी होतात. सामान्य काम करणारी माणसं कायम सामान्यच राहतात. तुम्हाला असामान्य यश मिळवायचे असेल, तर मेहनतही असामान्य घ्यावी लागेल. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. ते या ना त्या रूपात प्रकट होतातच. तुम्हाला आज मिळत असलेलं यश, हे तुमच्या कालच्या कष्टाचं फळ आहे. उद्या आणखी अधिक मिळवायचं असेल, तर आज कष्ट केलेच पाहिजे. मेहनतीला दुसरा पर्याय नाही. मेहनत दुसरा पर्याय शोधाण्याची मेहनत घेणारी माणसं यशाला कधीच गाठू शकत नाही. सर्वोत्तम यशाला शॉर्टकट नसतो. या जगात प्रत्येक गोष्टीसाठी किमंत चुकवावी लागते. यशाची किंमत तुम्हाला अफाट कष्टानीच चुकवावी लागते. आजवर घडलेल्या प्रत्येक महनीय माणसाने ती किंमत चुकवलेली असते. त्यांच्या मोठपणामघे अफाट कष्टांची कित्येक वर्ष उभी असतात. शॉर्टकटने जाणारी माणसं जितक्या लवकर वर जातात, त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने खाली कोसळतात. कष्टांच्या भक्कम पायांवरच अबाधित यशाची इमारत उभी करता येते. अनेक माणसं अठरा-अठरा तास काम करतात. अविरत मेहनत घेतात. फक्त दोन-चारच तास झोप घेतात. त्यांना थकनं माहित नसतं. कारण त्यांचं ध्येय त्यांना सातत्याने खुणावत असत. उद्दिष्ट बोलावत असतं. ते गाठायचं, तर परिश्रम करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्यांना माहित असतं. ते तेच करत असतात, अगदी अखंडपणे-प्रचंडपणे. तेव्हाच ती बलाढ्य होत असतात. समाज मोठा करत असतात.
राजधानी दिल्लीत एकदा एक पत्रकार रात्री दोन-अडीच वाजता फिरत होता. तो अनेकांच्या घरासमोरून गेला. साऱ्या घरातील दिवे मालवलेले. सारे शांत झोपलेले. चालता-चालता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ आला, तेव्हा घरातील दिवे लक्ख चालू दिसले. त्याला आश्चर्य वाटलं. तो खिडकीजवळ गेला. तिथून आत पाहिलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेजापाशी काही लिहीत बसलेलं. त्याला विस्मय वाटला. एवढ्या मध्यरात्रीपर्यंत डॉ. आंबेडकर काम करत जागे ? त्याने उत्सकतेने घरात प्रवेश केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या कामात इतके मग्न होते, कि त्यांना याची चाहूलही लागली नाही. पत्रकाराने जाणीवपूर्वक त्यांना त्यांच्या एकाग्रतेतून बाहेर आणलं. त्रास दिल्या बद्दल माफी मागितली आणि विचारलं, 'सारे शांत झोपलेले. मात्र आपल्या घरातील दिवे चालू ?'
तेव्हा डॉ.आंबेडकर शांतपणे म्हणाले, 'ते सारे झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे. मी जागा आहे, कारण माझा समाज झोपलेला आहे..! इतरांच्या घरातील दिवे आता मालवलेले आहेत, कारण त्यांच्या घरात वर्षानुवर्षे ज्ञानाचा प्रकाश आहे. माझे दिवे चालू आहेत, कारण प्रत्येक अंधाऱ्या झोपडीत मला ज्ञानाचा उजेड न्यायाचा आहे...!!' असं जबाबदारीचं भान हवं. त्यासाठी आत्मनियंत्रण हवं. स्वनियंत्रणाने स्वतःला घडविता येतं. जगजेत्ता व्हायची महत्वाकांक्षा असलेला नेपोलियन रणभूमीवर घोड्यावर बसूनच स्वतःला हवी ती झोप दोन-पाच मिनिटं घ्यायचा, ताजातवाना व्हायचा ! कामाला लागायचा ! माणूस कामाने कधीच मरत नाही. माणूस मरतो कामाच्या ताणाने ! आणि ताण वाढतो तो एकदम कामाचा डोंगर अंगावर आल्याने. तो एकदम येतो, याचे कारण आपण यापूर्वी ते करायचं वारंवार टाळल्याने. पुढे-पुढे ढकलत नेल्याने. मग काम इतकं साठतं कि ते पाहूनच माणूस गोठून जातो. आजचे कष्ट वाचवण्याचा अत्यंत जादुई शब्द माणसाकडे आहे-उद्या करू ! हा उद्या करूच्या रुपातला आळसचं माणसाला अपयशी बनवून टाकतो. माणसाकडे अत्यंत विलक्षण कल्पना असतात. परंतु आळसामुळे त्या निव्वळ कल्पनाच राहतात. त्या प्रत्येक्षात कधीच येत नाहीत. काम हे केल्यानेच पूर्ण होते. टाळल्याने नाही...!
दगडाला माहिती आहे, माझ्यातून सुंदर मूर्ती घडायची तर मला घाव सोसण्याचे कष्ट घ्यावेच लागतील.मूर्तिकाराला माहिती आहे, मूर्ती घडवायची तर मला घाव घालण्याचे कष्ट करावेच लागतील. तुम्ही मूर्ती बना किंवा मूर्तिकार; सर्वोत्तम घडायचं, घडवायचं तर कष्ट झेलावेच लागतील. मेहनत करावीच लागेल..!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.