Motivational Success Stories in Marathi | तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडे कधीच नसतात । पासवर्ड यशाचा | Nitin Bangude Patil

यशाचा पासवर्ड - देवत्व 

तुमच्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्याकडे कधीच नसतात 

           ' ते दैवी पुरुष होते. त्यांना साक्षात्कार झाला. त्यांना शक्ती प्राप्त होती.ते मोठेच होते. त्यांची गोष्टच वेगळी. तो काळच वेगळा. त्यांच्यासारखं आपल्याला कसं जमेल ? आपण सामान्य माणसं ! 'अशा उद्गाराने माणूस आपल्याच हाताने आपलेच मोठं होण्याचा ध्येयाचे पंख कापत असतो. मोठी माणसं मोठी म्हणून जन्माला येत नाही. ती आपल्यासारखी असतात. मात्र आपल्यासारखं जे आहे, त्यातच रुतून बसत, बदलाचा वा निर्माणाचा विचार न करता जगत नाही. मी या परिस्थितीत जन्माला जरी आलो. तरी मी असाच मरणार नाही. या ध्येयवादाने ती धडपड करतात. संकटाशी झुंझतात. परस्थिती बदलण्याची धडाडी ठेवतात. काळालाही वाकवतात आणि त्यावरच स्वार होऊन जग जिंकून घेतात. 

                                             
indian religion


                   त्यांच्यासारखे होण्याचा वा जगण्याचा विचार आपल्या मनाला शिवत नाही. हि मोठीच माणसं ! असं म्हणत आपण आपल्यापुरती पळवाट शोधून ठेवतो. कारण आपल्याला नसत्या फंदात पडायचं नाही. संकटाच्या झुंजीत अडकायचं नाही ! आणि मोठं तर आजिबातच व्हायचं नाही !

                   ज्या माणसांसाठी त्या महापुरुषाने सारे केलं तीच माणसं त्यांना माणसांतून हलवतात. त्यांना देव म्हणून मिरवतात. जयंती-पुण्यतिथीला कल्लोळ करतात आणि पुढच्या जयंती-पुण्यतिथीपर्यंत पुन्हा देव्हाऱ्यात बंद करून ठेवतात. देव्हार्याची स्वच्छता वाऱ्यावर आणि पुतळ्याची पावसावर सोडून देतात. 

                  काहीच न करता सहज सोपं काम... त्यांचा जयजयकार करत गुंतून राहायचं...! त्यांची गावागावात श्रद्धेने मंदिरं उभी राहतात. त्यात देव प्रतिष्ठित केले जातात, ते देवाकडे आपण जावे,काही मागावे आणि त्याने ते द्यावे...यासाठी नाही...!

                   आयतं कुणाला काहीही मिळत नाही आणि ते कुणी देतही नाही ! देवांनाही आयतं काही मिळालं नाही. त्यांची पराक्रम गाजवावा लागला... दुष्टांचा नाश करून विजय मिळवावा लागला. अशक्य ते शक्य करावं लागलं. उदात्त-भव्य-दिव्यमंगल निर्माव लागलं. तेव्हा मोठेपण आलं. 'देव' पण मिळालं. 

                                                           
Dharma


                    एवढं सारं समोर ढळढळीत दिसूनसुद्धा माणसं आंधळ्यासारखी वागतात. देवाकडे काहीबाही मागतात. आयतं मिळावं म्हणून अपेक्षा व्यक्त करतात. देवांनेही हे असंच कुणाकडे आयतं मागितलं असतं, तर त्याला देवपण आलं असतं का ? 

                   खरं तर, मंदिर गावात एवढ्यासाठी असतात कि, या देवपदाचा नित्य दर्शन व्हावं. म्हणजे त्यांच्या कार्याचं स्मरण व्हावं. त्यातून प्रेरणा होऊन आम्ही त्यांच्यासारखं वागावं. आम्हाला त्यांच्यासारखं कर्तृत्ववान होता यावं. 

                  मंदिर हि तर मानवाची देवत्वाकडे होणारी वाटचाल दर्शवणारी प्रेरणास्थानं असतात. ती कृतिशील कार्याचा संदेश देणारी विचारपीठं असतात. ती अंधश्रद्धापीठ मुळीच नसतात. जे आपल्याला करायचं नाही त्यासाठी आपली शक्ती,श्रम,कष्ट वाया घालवणं यासारखं दुसरं दुर्दैव नाही. जेव्हा कळतं काय करायचं आहे, तेव्हा कदाचित फार कमी वेळ आपल्याकडे असतो. थोडा आणखी काळ मिळाला असता, तर अधिक काही केलं असतं,असं वाटत राहतं. 

                                                      
Marathi Information


                   आपला हा आधीचा काळ वाया जाऊ नये, म्हणून तर हि प्रेरणास्थान योग्य मार्ग दाखवण्यासाठी उभी केलेली असतात. ती संदेश देतात. आमच्या मार्गाने चाला. आम्ही लढून-झगडून तुमच्यासाठी वाट तयार केलेली आहे. आता नव्या ताकदीनं इथून पुढे जा. आमच्यापेक्षा मोठं व्हा. काळावर तुमची मुद्रा उमटावा. जगणे सुंदर करा...! पण आपण त्यापुढचेच हात जोडून उभे राहतो. तिथेच गर्दी करतो.पुढे जाण्याचा मार्गच रोखून धरतो. 

                                               
Marathi Information


                   चालूनच रस्ता संपतो. लढूनच रण जिंकता येते. कुणापाशी थांबून त्यांच्या आशीर्वादाने ते टाळता येत नाही. कुणी टाळतो म्हंटल,तरी ते शक्य नाही कारण प्रश्न तुमचा आहे;तर उत्तरही तुमच्याजवळ आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दुसरा कुणीही शोधू शकतच नाही. 

                     मग माझा प्रश्न सोडवा म्हणून दुसऱ्यापुढे हात जोडून वेळ का वाया घालवतात ??? त्यापेक्षा तो वेळ कारणी लावा. लोक तुम्हाला सलाम करतील...!!

                                           
Nitin Banugade Patil | यशाचा पासवर्ड


प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : www.Nitinbanugadepatil.com

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Post a Comment