जपानच्या लोकांडून हा गुण तुम्ही घेतला तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही | Nitin Bangude Patil Website

 यशाचा पासवर्ड (भाग : 15 ) - अपयश 

प्रत्येक मोठी यशोगाथा हि अपयशाच्या मालिकेतूनच निर्माण होत असते

                 भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला भेट देण्यासाठी गेलं होतं. तिथल्या महत्वाच्या शहरातील वास्तुंना भेटी देत असताना ते सारे एका उंच इमारतीपाशी आले. तेव्हा सोबत असणाऱ्या गाईडने त्यांना सांगितले.,'हिरोशिमा-नागासाकी या दोन शहरांवर जे अणुबॉम्ब स्फोट झाले,त्यातूनही हि शहरं उध्वस्त झाली. त्या दोन शहरांच्या पुनर्वसन समितीचं कार्य या इमारतीतून चालतं आणि म्याक हायवर्टन हे या समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात.'

                                                       
जपान Japan Marathi Information


                  हे ऐकताच भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं. एकानं विचारलं,'ज्या म्याक हायवर्टण मुळे तुमच्या हिरोशिमा-नागासाकी वर अणुबॉम्ब स्फोट झाले,'त्याच म्याक हायवर्टणला तुम्ही पुनर्वसन समितीचं अध्यक्ष पद कसे काय देता ?

                  तेव्हा त्या जपानी गाईडने मोठं मार्मिक उत्तर दिले तो म्हणाला,'जपानी माणूस पराभवाची चर्चा वारंवार करत नाही !'

                   जपानच्या आजच्या यशाचं हेच कारण आहे. ते पराभवाने थांबले नाही;उलट,त्यातून उसळी मारून विलक्षण वेगाने कार्यरत झाले. अपयशासारखा दुसरा गुरु नाही. आपण चुकीच्या मार्गाने निघालो आहोत,याचे तो संकेत देतो. आपण कुठे चुकतो ते तो सांगतो. आपण काय करायला हवं, हे तो नेमकं दाखवतो. यशस्वी होण्यासाठी जे करणं गरजेचं आहे, ते ते करायला शिकवतो. यशाचा राजमार्ग हा अपयशातूनच सुरु होतो. अपयशाच्या पलीकडेच तर यश असतं. पण माणसं अपयशाने खचतात. तिथेच थांबतात. झालेल्या तात्पुरता पराभव हेच अंतिम अपयश मानून कायमची हरतात. संपून जातात. वास्तविक, ती अपयशाने संपत नाही. ती संपतात, कारण माघार घेतात म्हणून ! मधेच प्रयत्न सोडून देतात म्हणून ! जिंकतात, ती, जी माघार न घेता थोडं अधिक चालतात म्हणून ! ते वारंवार प्रयत्न करत राहतात. प्रत्येक अपयशातून पुन्हा जोमाने उठून उभी राहतात. 

                                                    
Nitin Bangude Patil website


                  आपण किती उंची गाठली यावर यशाचं मोठेपण नसून आपण अपयशातून किती जोमाने पुन्हा उठून उभे राहिलो यावर यश ठरत असतं. प्रत्येक मोठी यशोगाथा ही अपयशांच्या मालिकेतूनच निर्माण होत असते. अपयशाशिवाय यश कुणाच्याही वाट्याला आलं नाही आणि येतंही नाही !

                   राईट बंधूंनी प्रत्यक्ष हवेत विमान उडवण्यापूर्वी अनेक विमान तयार केली. त्यांची अनेक विमानं कोसळली. अनेक वेळा अपयशाने त्यांची पाठ धरली. अखेर आभाळाने त्यांना खुणावलं. अपयशातून पुन्हा-पुन्हा उठून उभं राहणाऱ्या राईट बंधूंच्या या विमानांना आभाळाने कुशीत घेतलं. पाखरांसारख् आकाशात उडण्याचं मानवाचं स्वप्न साकार झालं. 

                                                         
राईट बंधू aeroplane


                      प्रख्यात शास्त्रज्ञ एडिसन यांनी मेणाच्या तबकडीवर ध्वनिमुद्रण करून ते वाजवून दाखवलं. पण त्याआधी एक-दोन वेळा नाही ; तर तब्बल दहा हजार वेळा त्यात अपयश पत्करलं. एडिसन सांगतात, 'अपयशांनीच मला यश दाखवलं. प्रत्येक अपयश मला फायदेशीर ठरलं. ते मला माझ्या प्रत्येक प्रयोगात अधिकाधिक प्रगल्भ, परिपूर्ण करत राहील ! मला झटकन यश मिळालं असतं तर कदाचित मला एवढं शिकलोच नसतो ! मला यशाचं मोलही कळलं नसतं...!'

                       अपयशाचा प्रत्येक फटका काहीतरी नवं शिक्षण देऊन जातो. म्हणूनच अपयशापासून दूर पळणं, हे यशापासून दूर पळण्यासारखं असतं ! अपयशानेच माणूस अधिक मजबूत आणि कणखर बनतो. यश मिळवण्याचा त्याचा निश्चय अधिकाधिक दृढ होत जातो. होणारी प्रत्येक चूक सुधारत तो स्वतः ला घडवत राहतो. 

                                              
Indian Warriors Marathi Information


                        लढण्याचे दोन प्रकार असतात. काही माणसं जिंकण्याचा ईर्ष्येने लढतात, तर काही पराभव टाळण्याच्या इच्छेने लढतात. जिंकण्याच्या इर्षेने लढणारी माणसं जिंकतातच. मात्र पराभव टाळण्यासाठी लढणारी माणसं जिंकतातच. मात्र पराभव टाळण्यासाठी लढणारी माणसं पराभवाकडॆच लक्ष गेल्याने आधीच निम्मी पराभूत झालेली असतात. ती अपयशी ठरतात. लक्ष जिंकण्याकडं ठेवावे. कारण पराभव पहिल्यांदा रणात नाही; तर मनात होतो. जी माणसं मनाने पराभूत असतात, ती रणात जिंकूच शकत नाही आणि जी मनाने जिंकलेली असतात; ती रणात पराभूत होतच नाही !

                                            
Yashacha Password Nitin Bangude Patil

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने