यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही | Nitin Banugade Patil | Success Story in Marathi

 

यशाचा पासवर्ड - भाग 11

( ध्येय )

अपयशाला अर्थशून्य ध्येयच कारणीभूत असतात...!

               एखाद्याला विचारावं, काय हवं ? तो सांगतो,'सुख !' आपण पुन्हा विचारावं,तुझं सुख कशात आहे ? तो म्हणतो,'मला हवं आहे त्यात !' हो, पण तुला काय हवं ?' मला सुख हवं आहे.' बस्स ! माणसं आयुष्यभर एवढंच म्हणत राहतात त्यांना त्यांचं सुख कशात आहे, तेही समजत नाही आणि काय हवं हेही उमजत नाही. अशी माणसं आयुष्यभर नुसतीच भरकटत चालत राहतात. मात्र पोहचत कुठेच नाहीत. कारण कुठं जायचं,हेच त्यांना ठाऊक नसतं. 

                                                         
businessman Suvichar Tata Group


               निश्चित ध्येय ठरलं कि प्रवासाला दिशा मिळते. असलेलाच नव्हे;तर अजिबात नसलेला रस्ता तयार करण्याचा निर्धार उरात येतो. रोरावत येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी क्षमताबळ विकसीत होतं. ध्येय हेच एकमेव लक्ष्य बनल्याने साऱ्या ऊर्जा त्याच दिशेने केंद्रित होतात. ध्येय पूर्णत्वासाठी निश्चित कालमर्यादा आखल्याने आयुष्यातील मोलाचे क्षण निरर्थक गोष्टींकडे वळतच नाही. ध्येय हाच श्वास नि ध्यास झाल्याने अंगी जणू झपाटलेपण राहतं. हे ध्येयवेडंच जगण्याला शिस्त आणतं. जगण्याला एक रोखतेक स्पष्टता मिळवून देत. ध्येयाच्या दिशेनं पडणारं प्रत्येक कृतीयुक्त पाऊल यशाच्या जवळ घेऊन जातं. आत्मविश्वास, प्रेरणा, चैतन्य, सुखाची अनुभूतीही त्यातूनच येतं. नवनिर्मितीनंतरचा सार्थ आनंद समाधानाची शांतता बहाल करतो. तितकीच नव्या जबाबदारीची जाण देत वैश्विक कल्याणाचा ध्येयसिद्धीचं भानही देतं. त्यातूनच माणसं उत्तम, सर्वोत्तम, सर्वोत्कृष्ट आणि सर्वोच्च अशी घडत जातात. त्यांची ध्येयच त्यांना घडवतात. नंतर तीच माणसं समाज घडवत जातात. जे.आर.डी टाटा ना कुणी विचारलं एवढ्या कंपन्या, एवढे उद्योग ! तुमच्याकडे आधिच इतकं सगळं आहे. मग हि आणखी नवीन कंपनी कशासाठी ? टाटांनी उत्तर दिले,'मी एक नवीन कंपनी काढली कि, पाच हजार लोकांना रोजगार मिळतो. त्यातून पाच हजार कुटुंब उभी राहतात. संपन्न होतात. हे मी करतो ते तुमच्यासाठी नाही,माझ्या देशबांधवांसाठी ! देशाच्या सायंपूर्णतेसाठी!

                                          


                  एका ध्येयातून नवीन ध्येय प्रकट होतात. माणसं कार्यशील राहतात. जग मोठं करत जातात. एका ध्येय प्राप्ती नंतर जिंकलो म्हणणं तुमचा शेवट असू शकतो. खरं तर, एका ध्येयाची प्राप्ती हि नव्या ध्येयाची सुरुवात असते. मी आत्तापर्यंत काय केलं, याची गोळाबेरीज म्हणजे आयुष्य नव्हे मी पुढे काय करणार आहे, या आकांशा म्हणजे आयुष्य !

                  यासाठी ध्येय विशाल असावेत, ती बलाढ्य ठेवावीत. कारण ध्येय जितकं मोठं तितकंच यशही मोठं ! कदाचित, अधेमधे पराभव वाट्याला येतीलही. पण ते तात्पुरते असतील. प्रबळ ध्येय निष्ठा तुम्हाला तुम्हाला ध्येयापर्यंत नेतेच. ध्येयनिष्ठ माणसं पायाशी कधीच नसतात. कारण ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकलं कि, ते परतीचे दोर कापून टाकतात. पर्याय दोनच लढा किंवा मरा..! माणसं मरणं पसंत करत नाही, ती प्रचंड तीव्रतेने लढणं पसंत करतात. परिणामी, जिंकतात ! कोंढाणा गडावर नरवीर तानाजी पडल्यावर सूर्याजीने तेच तर केलं ! त्यापाठीमाघे शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ठरवल आणि साऱ्यांचं बनवलेले स्वराज्यस्थापनेचं ध्येय होत. 

                                          
Tanhaji , Maratha warrior ,


                   ध्येयपूर्तीसाठी असा नियोजनबद्ध आराखडा महत्वाचा ! छोट्या-छोट्या उदिष्ठांच्या टप्प्याने ध्येयायच्या दिशेनं सरका. चंद्रावर जायचं ध्येय ठरवलं तर, तिथपर्यंत तुम्हाला नेणारं यान बनवणं, हे उद्दिष्ट आधी ठरवावं लागेल. उदिष्ठांच्या पायऱ्यांअभावी ध्येय, म्हणजे उंच उडी मारून चंद्रावर जाण्याचा प्रकार ठरेल. ध्येय वास्तववादी असु द्या. अपयशाला अर्थशून्य ध्येयच कारणीभूत असतात. माणसं ज्या ध्येयाला काही अर्थच नसतो, अश्या ध्येयामाघे धावतात. आणि स्वतः ची उरफोड करून घेतात. लोखंडाचं सोनं बनविणारा ' परिस ' मी मिळवणारच ! अशी भीष्मप्रतिज्ञा करून मुळातच अस्तित्वात नसलेला कल्पनेतला परीस शोधायला निघणं, हि अर्थशून्य ध्येयताच ! हात लावीन त्या क्षेत्राचं सोनं करिन, अशी कर्तृत्वसंपन्नता मिळवणं हि खरी ध्येयसिद्धी होय....!!!

                                                
नितीन बानुगडे पाटील | www.Nitinbanugadepatil.com

प्रा.नितीन बानुगडे पाटील

(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)

All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने