पतीसाठी कोणत्याही संकटाशी झुंजायची त्यांची तयारी होती | Lata bhagwan kare story in marathi | Nitin Banugade Patil
byProf. Nitin Banugade Patil•
0
यशाचा पासवर्ड १७ - उत्कटता (Passion)
जे करायचे ते झपाटून करा...
पराकोटीच्या उत्कटतेने करा...
तीव्र उत्कटातच यशाकडे नेते...!
नुकतीच घडलेली हि कहाणी आहे, एका अफाट जिद्दीची ! लता भगवान करे. वय वर्ष ६६. मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या. घरी दारिद्रय. होतं नव्हतं तेवढं सारं तिन्ही मुलींच्या लग्नात खर्च झालं. वृद्ध पती आणि त्याचे वृद्धत्वाचे आजार. आजारपणाचा खर्च,प्रचंड आर्थिक ओढाताण. तरीही मोलमजुरी करून चालवलेला,कसाबसा सांधलेला फाटका संसार.
त्यातच पुन्हा पतीची तब्येत खचली. लगबगीने डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी उपचार सुरु केले. एम.आर.आय. स्कॅन करण्यास सांगितले. खर्चाचा आकडा ऐकला आणि लताबाईंचा पायाखालची जमीन सरकली. हातावर ज्याचं पोट त्यांनी कुठून आणावं पैसे ? काय करावं सुचेना ! पती आजारातून उठला पाहिजे, हि आशा. त्याला वाचवण्याची विलक्षण धडपड चाललेली. खरं तर, पैशाअभावी होणारी ती तडफड होती.
पतीला कसंही करून बरं करायचं, या भावनेने झपाटलेल्या, अगदी अडाणी, मोलमजुरी करणाऱ्या लताबाई हरल्या नाहीत. त्यांना रडणं माहीत नव्हतं. माहिती होतं फक्त लढणं ! रानात राबवणाऱ्या त्यांच्या हातांना माहिती होतं, पेरल्याशिवाय काही उगवत नाही. काही केल्याशिवाय काही मिळत नाही ! पतीसाठी कोणत्याही संकटाशी झुंजायची त्यांची तयारी होती.
अचानक त्यांच्या कानावर बारामती म्यॅरेथॉनची बातमी गेली. बक्षिसाची रक्कम कळली आणि त्यांचे डोळे चमकले. बक्षीस मोठं होतं. त्या पैशात आजारपणाचा खर्च भागेल, एवढंच गणित त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच कुणाला तरी विचारलं, मी भाग घेऊ शकते ? समोरच्याने होकार भरला. आणि तीन किलोमीटर अंतराच्या या म्यॅरेथॉनमध्ये ६६ वर्षांच्या या माऊलीने भाग घेतला.आपल्याला पळणे जमेल का? आपल्या वयाला ते पेलेल का ? काही काही विचारच नव्हता मनात. फक्त ध्यास एकच. जिंकलं पाहिजे. बक्षीस मिळवलं पाहिजे. तरच पतीला वाचवता येईल. जगवता येईल !
यापूर्वी शर्यतीत लताबाई कधी धावल्या नव्हत्या. कुठलीही म्यॅरेथॉन कधी बघितली नव्हती. धावण्याचा सराव बिलकुल नव्हता. तयारी काहीच नव्हती. पण उरात विलक्षण जिद्द होती-जिंकायचंय ! त्या स्पर्धेत उतरल्या. आजूबाजूला स्पोर्ट्स शूज घालून रोजच्या सरावाने कसलेल्या, आहारविहार आणि साधन संपत्तीने संपन्न असलेल्या स्पर्धकांसोबत त्या पळू लागल्या. रोज सकाळी शेतात जाणं. दिवसभर काम करणं आणि जे असेल ते खाणे, हाच त्यांचा डायट आणि अनुभव. पण पावलं पुढे पडू लागली. अंतर कापू लागली.
६६ वर्षांची हि माऊली धावू लागली. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक जणू बरा बरा होत जाणारा पती त्यांच्या नजरेसमोर तरळू लागला. त्यांना बरे करायचं तर पळलंच पाहिजे. जिंकलेच पाहिजे, म्हणत त्या धावत होत्या. पुढे पुढे अगदी पुढे. अखेर आपल्या जिद्दीच्या बळावर लताबाई म्यॅरेथॉन जिंकल्या. पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
अंथरुणाला खिळलेल्या आपल्या पतीला बरे करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत, वाऱ्याने उडणारा पदर दातांत धरून नऊवारी लुगड्यात अनवाणी पायाने धावणाऱ्या या माऊलीच्या विलक्षण जिद्दीला पाणावल्या डोळ्यांनी सलाम केला. हि जिद्द उत्कटतेतून निर्माण होते व समर्पणवृत्तीत सामावते. पतीला बरी करण्याची उत्कटता आणि त्यासाठी हाती घेतलेल्या कामात स्वतः ला पूर्णपणे झोकून देण्याची समर्पणवृत्ती लताबाईंना विजयी करून गेली.
यश मिळवायला हेच तर हवं असतं. पाण्यात बुडणार्याची श्वास घेण्यासाठी चाललेली जीवघेणी धडपड असो किंवा प्रेमात पडलेल्यांचे 'त्या' व्यक्तीसाठी वाटेल ते करण्याचे झपाटलेपण असो; त्यातील तीव्रता अफाट असते. तीच तीव्रता तहान-भूक विसरायला लावते. वाटेल तो त्रास सहन करायला सक्षम बनवते. अशक्य ते शक्य करते. हि काही हवं असण्याची तीव्रता जेवढी जास्त, तेवढं यश मोठं.
कोणतीही गोष्ट जीव ओतून करणं म्हणजेच उत्कटता ! जे करायचं ते झपाटून करा. पराकोटीच्या उत्कटतेने करा. उत्कटतेची ऊर्जा यशाकडेच नेते...!
प्रा.नितीन बानुगडे पाटील
(इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ता)
All this Content Copyrights Reserved | www.Nitinbanugadepatil.com
सदर
लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात
परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून
पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध
पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.